मोजच्या भट्टीवरून

माझा मित्र किशोर काठोले पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातल्या मोज नावाच्या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवतो. काही दिवसांपूर्वी सहज गप्पा मारताना त्याने मला त्यांच्या शाळेतल्या कातकरी पाड्यावरील मुलांबाबात सांगितले. या मुलांनी शाळेत यावे, टिकावे, रमावे म्हणून गेली दोन वर्षे किशोर आणि त्याचे सहकारी प्रयत्न करतायत. ही मुले शाळेत येऊ लागली आहेत हे खरे, पण अजून म्हणावी अशी रुळलेली नाहीत. काही जण सारखी गैरहजर राहतात, आणि जी हजर राहतात त्यांनाही शाळेच्या कामकाजात फार रस वाटत नाही. या मुलांपैकी बऱ्याच मुलांचे  पालक गावाच्या जवळच असणाऱ्या वीटभट्टीवर काम करतात आणि या कामानिमित्त तिथेच भोंगा बांधून राहतात. मुलेही तिथेच जाऊन राहतात आणि मग त्यांना शाळेत आणणे अजूनच कठीण बनते. परिणामतः शाळेतील इतर मुलांच्या तुलनेत ती बरीच मागे पडली आहेत.   

खरेतर किशोर एक संवेदनशील व प्रगल्भ शिक्षक आहे. तो आणि त्याचे एक सहकारी वाघ गुरुजी यांनी स्वतःच्या मुलांना त्यांच्या जिल्हा परिषद शाळेतच दाखल केले आहे. त्यांच्या शाळेत चांगले शिकवले जाते हे पाहून आसपासच्या गावातील काही मध्यमवर्गीय पालकांनी त्यांची मुलेही मोजच्या शाळेत घातली आहेत. पण या सगळ्या यशाच्या पार्श्वभूमीवर किशोरला खंत वाटत होती ती या कातकरी मुलांच्या मागे पडण्याबाबत. आम्ही दोघे या विषयावर जवळ जवळ तासभर बोललो. त्यातून एक बाब जाणवली ती म्हणजे शाळेत आपण जे शिकवू पाहतो आहोत ते आणि या मुलांचे आयुष्य यात फारसा संबंध दिसत नाही. कदाचित म्हणूनच त्यांना शाळेच्या शिक्षणात रस वाटत नसावा.  शिक्षणाचा आशय आणि पद्धत जर मुलांच्या जीवनाशी सुसंगत केली तर या मुलांना शिकण्यात रस वाटू शकेल, आणि हे करायचे असेल तर या मुलांचे जगणे आधी समजून घ्यायला हवे असे आम्हाला वाटले. 

त्यासाठी आम्ही दोघांनी जमेल तसे वीटभट्टीवर जायचे ठरवले आणि चार दिवसांपूर्वी सकाळी सात साडेसातच्या सुमारास वीटभट्टीवर पोहचलो. किशोर गुरुजी  आलेला पाहून राहुल धावत आमच्या गाडीकडे आला तर बाकी काही मुले गुरुजी आलेला पाहून पळून जाऊन भोंग्यात लपली. कडाक्याच्या थंडीत अंगात स्वेटर घालून, कान बांधून आम्ही भट्टीवर पोचलो होतो. तिथे बहिणीने उचलून घेतलेल्या लहानग्या वृषालीला पाहून मनोमन लाज वाटली. तशा त्या थंडीत अंगात झबलेही न घातलेली वृषाली आमच्याकडे कुतूहलाने पाहत होती.

पळत आलेला राहुल उत्साहाने आम्हाला भट्टीवर काय काय कामे चालतात ते दाखवू लागला. विटा बनवण्यासाठी माती भिजवायचे खड्डे कुठे आहेत, राबिट बनवायचे यंत्र कुठे आहे, एका घोड्यात किता विटा असतात, हारोली म्हणजे काय, विटांच्या मातीत किती राबिट घालायचे – अनेक गोष्टी त्याने आम्हाला दाखवायला सुरुवात केली.

राहुलच्या मदतीने मला आणि किशोरला या मुलांच्या जगाचे दार किलकिले झाले आहे.आम्ही ठरवले आहे की या जगात शिरायचे, शिक्षणशास्त्राचे भिंग वापरून त्यांचे जग निरखायचे आणि या मुलांना शिकवण्याची वाट शोधायची. आम्ही आमच्या प्रयत्नात यशस्वी होऊ की नाही हे आम्हाला माहिती नाही. पण हे नवे आव्हान आम्हाला दोघांनाही खुणावते आहे एवढे नक्की.

भट्टीवरचा भोंगा

                                                                    क्रमशः

15 thoughts on “मोजच्या भट्टीवरून

Add yours

 1. श्री. किशोर सरांसारखे शिक्षक आहेत म्हणून जिल्हा परिषद शाळा अजूनही तग धरून आहेत. तुम्ही ज्या कामाला सुरुवात केली आहे, ते खरोखरीच कौतुकास्पद आहे आणि लेखाची मांडणी पण छान केली आहे. तुमच्या या सुंदर कामाला खूप शुभेच्छा.

  1. नक्कीच! किशोर सारखे अनेक शिक्षक आपल्या नोकरीच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन काम करत आहेत.त्यांच्यासाठी सपोर्ट सिस्टीम म्हणून समाजाने उभे राहण्याची गरज आहे. शिक्षकांच्या कामाला व्यवसायिकाची प्रतिष्ठा मिळायला हवी आहे.

 2. निलेश सर, तुमचं काम खुपच मूलभूत आहे. तुमच्या या पोस्टमधलं वर्णन वाचून वीटभट्टीवर राहणाऱ्या मुलांचं विश्व आणि प्रश्न डोळ्यासमोर उभे राहिले. आणि मी ‘आता तुम्ही पुढे काय करणार’ या उत्सुकतेने पुढच्या पोस्टची वाट पाहते आहे.

 3. By मूलभूत I mean fundamental. कोणत्याही गोष्टीच्या अगदी मुळाशी जाऊन तुम्ही काम करता. मग ते वीटभट्टीवर जाऊन, तिथल्या गोष्टी समजून घेणं असो की साधनाला शिकवण्यासाठी स्वतः नेपाळी भाषा शिकणं असो. हे मुळाशी जाणं आम्हा नवीन काम करणाऱ्यांना प्रेरणादायी आहे

  1. मुक्ता प्रश्न सोडवायचा असेल तर त्याच्या मुळाशी जाण्याशिवाय दुसरा काय मार्ग असणार? हा मार्ग जरा वेळखाऊ आणि कष्टाचा असतो पण तितकाच समाधान देणारा ही असतो असा माझा अनुभव आहे.

 4. तुमचे करू पाहत असलेले काम आव्हानात्मक आहे पण अशक्य नक्कीच नाही..!
  तुमच्या कामासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचे अभिनंदन..! 💐💐👌👌

 5. दुर्लक्षितांकडे पाहण्याचा व त्यांच्या समस्यांचा मूलभूतपणे विचार करण्याचा सर,आपला हा दृष्टिकोन नक्कीच मौलिक आहे.आमच्या देपिवली-पारोळ पंचक्रोशीत(ता. वसई) पातल्या वर(वीटभट्टीवर)काम करणाऱ्या आदिवासींच्या मुलांची शैक्षणिक अवस्था दयनीय आहे. शिक्षणक्षेत्रातील एक संवेदनशील माणूस म्हणून हे पाहून त्रास होतो.ह्यासंदर्भात काही वैचारिक दिशा सापडल्यास आनंद होईल. त्यातून ह्या कामाचा हिस्सा बनायलाही आवडेल.

  1. हा एक लहानसा प्रामाणिक प्रयत्न आहे. अजूनही फार बारकावे हाती आलेले नाहीत. पण काही एक दिशा निश्चित होते आहे. अजून काही आठवड्यांनी जरा जास्त स्पष्टता येईल असे वाटते.

 6. मुलांबरोबर काम करायला मिळणं हे आपलं टॉनिक आहे गुरुजी हे माहिती आहे आम्हाला.
  ही प्रक्रिया आम्हाला आपल्या बरोबर अनुभवता येईल.
  यावर होणारी चर्चा फारच महत्वाची ठरेल.

 7. मी स्वतः शासकीय अधिकारी आहे. आपणास शासकीय स्तरावर कोणतीही मदत लागली तर माझ्याशी संपर्क करू शकता. माझा इ मेल samir.shaikh1988@gmail.com. खूप मोलाचं काम करत आहात. धन्यवाद.

 8. अत्यंत मुलभूत काम करत आहात सर.जे केले तेच सांगायचे आणि त्यामागचे शिक्षण शास्त्र सांगायचे ही आपली हातोटी. आता आम्हाला नाविण्याने शिकायला मिळणार. धन्यवाद

 9. सर्वात आधी नियमित लिहायचं ठरवल्याबद्दल अभिनंदन! तुमच्यासारख्या शिक्षण शास्त्राच्या अभ्यासकानं लिहितं होणं महत्त्वाचे आहे. हंगामी स्थलांतरितांच्या मुलांच्या शिक्षण प्रश्नावर सामाजिक अंगाने लिहिलं- बोललं जातं पण तुमचा लेख वाचताना cultural capital ची theory आठवली. शिक्षणाचा प्रश्न मांडतानाच तुम्ही या मुलांकडे काय आहे यावर प्रकाश टाकलात. जे त्यांच्याकडे आहे ते शिक्षण प्रक्रियेचा भाग कसा होऊ शकतं याबद्दल तुम्ही पुढे लिहाल असा अंदाज आहे. Looking forward to next post

  1. राजश्री अगदी खरे आहे. मुलांचे सांस्कृतिक भांडवल आणि शाळेच्या अपेक्षा यात ताळमेळ नसेल तर ही मुले नेहमीच अयशस्वी असल्याचे दिसणार. मुलांना काय येत नाही हे परीक्षा सातत्याने सांगत राहतात पण काय येते शोधायचा कधीच प्रयत्न करीत नाहीत

Leave a Reply

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: