राधी

गेले काही दिवस राहुल आणि अमितसोबत आम्ही काम करत असताना राहुलची बहीण राधी तिच्या भोंग्यात काहीतरी काम करत बसायची. मी राहुलाला प्रश्न विचारला की ती आतून ती उत्तर देई. पण ती समोर येऊन आमच्यासोबत बसायला काही तयार नव्हती.  दोन दिवसांपूर्वी किशोरने तिला बोलवल्यावर ती आली आणि आमच्यात सामील झाली. किती खड्ड्यांना किती राख किंवा राबिट लागेल याचा हिशेब करू लागली. हाताची बोटे मोजत राधी हिशेब करते. त्यावेळी तिची एकाग्रता बघण्यासारखी असते. आसपास काय चालले आहे याने तिला काही फरक पडत नाही. गेल्या वर्षी राधी किशोरच्या वर्गात आली तेव्हा अक्षरओळखीपासून तिने शिकायला सुरुवात केली होती. वर्षभराच्या काळात तिने बरीच प्रगती केल्याचे किशोरने मला सांगितले.  

जबाबदार राधी

आज आम्ही भट्टीवर गेलो तर राधीच्या भोंग्यासमोरची जमीन तिने सारवून ठेवली होती. आम्ही आलेले पाहून ती पळत पळत भोंग्यात गेली आणि तिच्याकडच्या दोन चटया घेऊन आली.  काल मुलांसोबत काम करताना आपल्याला वाचायला बसायला जागा नाही याबाबत बोलणे झाले होते. दहा-अकरा वर्षांच्या जबाबदार राधीने कोणी ही न सांगता आमची ही समस्या आज सोडवून ठेवली होती. भट्टीवरच्या खडतर आयुष्यात मुलांना स्वतःचे प्रश्न स्वतःच सोडवावे लागतात. वयाच्या मानाने पेलावी लागणारी जबाबदारी फारच मोठी असते. त्यामुळे त्यांच्यात एकप्रकारचा समजूतदारपणा येतो. आता या लहान मुलांनी असे मोठ्यांसारखे वागणे चांगले म्हणायचे की वाईट हे मला अजून ठरवता आलेले नाही.

सगळेजण राधीच्या भोंग्यासमोर जमले आणि आम्ही खड्ड्यांतले राबिट मोजायची उदाहरणे सुरू केली. ‘एका खड्ड्यांत १५ घमेली राबिट टाकायचे तर अशा सहा खड्ड्यांत किती घमेली राबिट टाकावे लागेल’ या प्रश्नाचे उत्तर राधीने नीट विचारपूर्वक दिले. त्याचा किशोरने केलेला व्हिडिओ पुढे दिला आहे.

राधी १५ च्या पटीत मोजत जेव्हा सत्तरावर आली तेव्हा मला वाटले आता ही चुकणार. पण ती चुकली नाही. पाच घमेली राबिट बाजूला ठेवून तिने आपला प्रश्न सोडवला. पण तिचे हे कौशल्य शाळेच्या परीक्षेला मोजता येत नाही, इथेच खरी मेख आहे. तू हे उत्तर कसे काढलेस असे विचारल्यावर तिने ते व्यवस्थित समजावून सांगितले. अशा प्रकारे सांगता येणे हे मुलांसाठी बऱ्यापैकी अवघड काम असते. कारण यात स्वतःच्या विचारांवर विचार करावा लागतो, आणि आपण काय विचार केला हे  भाषेच्या माध्यमातून मांडावे लागते. अगदी सुस्थितीत वाढणाऱ्या मुलांपैकी बऱ्याच जणांनाही हे जमत नाही. राधी हे काम अगदी उत्तम करू शकते आहे.   

एकदा मी असाच मुलांसोबत गप्पा मारत बसलेलो असताना राधी आणि माझ्यात झालेला संवाद मोठा मनोरंजक होता.

“तुमचे आई बाबा वीटभट्टीवर काम करतात. किशोर गुरुजी शाळेत शिकवण्याचे काम करततात. तसं मी कोणतं काम करत असेन?” मी सहजच मुलांना विचारले.

राधी म्हणाली, “तू कॅम्पुटर मधे लिवत असशील.”

“ पण लिहायचं कशासाठी?” मी कुतूहलाने विचारले.

“ तुला हौस वाटं तय.” राधीच्या उत्तराने मला हसू लोटले.

“अस्सं ! पण काय लिहित असेन गं मी?” मी विचारले.

“ सांगू,  तू आम्हाला काय शिकवंस त्यां” राधी उत्तरली.

“ ते कशाला लिहायचं ?” मी तिला कोड्यात टाकण्यासाठी विचारले.

“ मग बीजीकडची पन पोरां असतील ना ? तेंचे सर वाचतील. ना मंग ते पन शिकवतील ते पोरांना. तू तं किशोरसरांचा पन सर हायेस ना?”  राधीने मला थक्क केले.

माझी ओळख करून देताना ‘मी जसे तुम्हाला शिकवतो तसे हे सर आम्हाला शिकवतात’ असे किशोरने सांगितले होते. राधीने त्याचाच आधार घेऊन मी काय काम करत असेन याची कल्पना केली होती! राधी केवळ चुणचुणीतच नाही तर म्होरकी सुद्धा आहे. जबाबदारी घेणे तिला आवडते. काल उमेश नी देवारामची मारामारी झाली तर हिने मध्ये पडून ती सोडवली. किशोरच्या वर्गात बसलेली असताना बाकीच्या मुलांची वकिली करण्यातही ती पुढे असते. पण भट्टीवरचे अस्थिर आयुष्य तिच्यातल्या या अंगभूत गुणांना फुलवू शकेल?

14 thoughts on “राधी

Add yours

  1. सर नमस्ते, मुलांना अवकाश किती द्यावा लागतो याचे भान कायम आपल्या बोलण्यातून आणि कृतीतून येत असते ,राधी च्या proactive पणाला व विचारांचा विचार करून तो मंडण्याला ही सलाम

  2. राधी खुपच समजूतदार आहे.तू तर किशोर सरांचा पण सर हायेस.किती साहसी मुलगी वाटते ,निलेशदा. ग्रेट !खूप प्रेरणा मिळते तुमचं काम वाचून

  3. छानच राधाचा व्हिडिओ टाकल्याने अधिक स्पष्ट झाले .
    ६० च्या पुढे १५ मोजण्यापेक्षा १० वाढविणे तिला सोयीचे वाटले असावे . किंवा राबीट आणि राख यांचे जर १०:५ असे काही प्रमाण असेल तर ती त्या अंगाने ही गेली असावी . उत्तर काढण्याची विचारप्रक्रिया समजून घेणे खूप महत्वाचे असते . सर ह्या अनवट वाटेवरील अनुभव आम्हाला खूप मोलाचे व मार्गदर्शक आहेत …

    असाच कॅंप्युटर मदी लिवित जा म्हंजे आमी वाचू ना तसाच शिकवू …….

  4. खरंतर राधाच्या चेहऱ्यावरचा आनंद.. मला जमतय याचे मोल कशातच नाही… तिचं आयुष्य फुलवणाऱ्या आपणास सलाम..

  5. नमस्कार सर,
    आज राधीची गोष्ट वाचली आणि विचार मनात आला की अभ्यासक्रम तयार करत असताना किंवा पाठ्यपुस्तके तयार होत असताना ही सर्वसमावेशक तयार होत असतात परंतु मी शिक्षक म्हणून मुलांना कसे स्वीकारावे आणि राधेने ज्या पद्धतीने उत्तराचा विचार केला तसा स्वीकार कुठेतरी माझ्या पाठ्यपुस्तकात आहे का नसला तरी मी तो करतो का नाही कारण मी सुद्धा पाठ्यपुस्तका प्रमाणेच मला एका चाकोरीत बांधून ठेवले मूल विचार करत असताना एकाच गोष्टीचा किती अंगाने विचार करते त्याच्या अनुभवाशी कैसे जोडते हेच राधेच्या उदाहरण सोडवण्याच्या प्रक्रियेतून लक्षात येते आणि अशाच पद्धतीने जर मी स्वीकार केला तर कदाचित राधेसारखी बरीच मुलं वेगळा विचार करतात परंतु त्याला मी चुकीचे समजतो ते समजणार नाही आपल्या या प्रयत्नातून एक वेगळ्या पद्धतीचे अध्यापन पद्धती ही प्रत्यक्ष वाचायला मिळत आहे आणि ती कशी परिणामकारक आहे हेसुद्धा अनुभवायला मिळत आहे ज्यावेळी राधीचा व्हिडिओ आम्ही बघितला त्यावेळी लक्षात आले की माझा संयम सुद्धा फार महत्त्वाचा आहे कदाचित आपण तिने 70 म्हटल्यानंतर मध्येच काही बोलले असता तर ती पुढे काय विचार करते हे लक्षात आले नसते म्हणून मी अध्यापन करत असताना माझा संयम किती महत्त्वाचा आहे.
    पुढे आपण तिच्याशी गप्पा मारता मारता वेळ छान असा प्रश्न विचारला विचारला आणि त्याचे उत्तर तिने ज्या पद्धतीने दिले त्या पद्धतीने उत्तर देण्यामागचा खरं कारण आपण आधीच सांगितल्याप्रमाणे की ही मुले वयाने जरी लहान असतात तरी त्यांच्या गाठीशी परिस्थिती आणि अनुभव अशा असतात की ज्यामुळे ही मुले आपोआपच समजदार आणि त्यांच्या वागण्यात एक प्रौढावस्था असते हे लक्षात येते आणि कुठेतरी वाड्या-वस्त्यांवर काम करणाऱ्या मुलांसोबत काम करत असताना ह्या सर्व बाबींचा विचार मी शिक्षक म्हणून करायला हवा आणि हे जर मी स्वीकारले तर एक नवीन आणि अशा पद्धतीने सुद्धा शिक्षण मुलां पर्यंत पोहोचू शकते माझी चाकोरी कुठेतरी मला बाजूला ठेवावी लागेल आणि चाकोरीबाहेरचा शिक्षण हेच या मुलांसाठी परिणामकारक आहे हे लक्षात येईल
    आज राधी वाचत असताना प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला आपण करीत असलेले हे काम आम्ही आमच्या परिसरातील आमच्या जिल्ह्यातील लोकांसमोर सुद्धा शेअर करत आहोत त्यांच्या सुद्धा इथून पुढे यासंदर्भातील प्रतिक्रिया मिळतील आणि हे काम निश्चितच एक दिशादर्शक म्हणून असेल असे वाटते.

    1. देविदास सर,
      आपण एक महत्वाचा मुद्दा मांडलाय की संयम किती महत्वाचा आहे.
      या मुलांबरोबर किंवा कोणत्याही मुलांबरोबर काम करताना शिक्षक म्हणून संयम प्रचंड आवश्यक असतो.त्या दिवशी विट भट्टीवर गेलो असता मला त्याची प्रचिती आली. अमित बरोबरच विटा मोजण्याचे काम चालले असता ‘एका घोडीत 25 विटा तर दोन घोडीत किती?’ ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायला अमित ने तबल 15 मिनिटे घेतली त्यावेळी गुरुजीनी दाखवलेला संयम कमालीचा होता.
      या 15 मी अमित काय करत होता तर मोजण्याचे डावपेच करत होता जसे आधी 4 च्या टप्याने मोजण्याचा प्रयत्न, नाही जमल्यावर एक एक विट मोजली त्याने आणि पुढच्या टप्यात थेट पन्नास पन्नास असे टप्पे केले त्याने.
      आपण आपल्या वयाच्या मेंदूने मुलांचे मूल्यमापन करू पाहतो व उत्तराची घाई करतो याउलट मुले स्वतःचे डावपेच आखत असतात म्हणून आपण संयम बाळगायला हवा घाई करून किंवा अधिकची मदत करून आपण त्यांचे शिक्षण थांबवत तर नाही ना याचा विचार नक्की करायला हवा…

  6. गुरुजींबरोबर वीट भट्टीवर गेलो असता राधी ची भेट झाली गुरुजींनी वर लिहिल्याप्रमाणे राधी आहे. तिला पाहताक्षणी तिच्यातला आत्मविश्वास स्पष्टपणे जाणवतो.
    मी गेलो त्याच्या आदल्या दिवशी त्यांच्या शाळेचं स्नेहसम्मेलन झालं होतं त्यात तिनं अगदी उस्फुर्त सहभाग घेतल्याचे समजले त्यामुळे ती थकली असणार तरीही ती थोड्या वेळाने वर्गात हजर झाली.काल स्नेहसंमेलन झाल्यावर किशोर सरांनी तिला त्यासंबंधी लिखाण करायला सांगितले होते. रात्री उशिरा घरी येऊनही तिने ते पूर्ण केले होते यातच तिची इच्छाशक्ती प्रतीत होते.
    तो कागद गुरुजींनी वाचायला सांगितला टेंव्हा ती किशोर सरांना म्हणाली की,’किशोर सर,तू इथंच बस नाहीतर हे हसतील’. मग किशोर सर बसले तेंव्हा राधीन कागद वाचायला सुरुवात केला.तीने तिच्या शब्दात केलेले लेखन मला संपुर्ण स्नेहसंमेलन कसे झाले असेन याचे चित्रीकरण दाखवणारे होते.शेवटी तिने उल्लेख केला की कुणीतरी त्यांच्या शाळेला पन्नास हजार रुपये किमतीची पुस्तके देण्याचे घोषित केले आहे.
    अत्यंत अस्थिरता व मनाची घालमेल जाणवलेल्या विटभट्टी वर राधीच्या रूपाने एक आदर्श उभा राहू शकतो.राधी मध्ये प्रचंड समजूतदार पणा व आत्मविश्वास दिसला.गुरुजींची साथ लाभली तर ‘राधी’ची ‘मती’ होणार नाही याचा विश्वास वाटतो.

  7. राधीन जे तुम्हाला उत्तर दिल की तुम्ही का लिहता तर “आम्हाला म्हणजे आम्ही ब्लॉग वाचणाराना त्याचा उपयोग होतो “हा विचार ती करते म्हणजे ती खरच खुप समृद्ध विचार करत आहे. आणि नेहमी मुलांना विचार करायला वेळ दिला पाहिजे,त्यांनी कसा विचार केला हे समजून घेता आलं पाहिजे

  8. राधी खरोखरच चुणचुणीत आहे .तिच्यासारख्या मुलींसाठी मूल्यमापनाची कोणती पद्धती विकसित करता येईल?अशी काही पद्धत आहे का ?

  9. शिवाजी घोडराज जनार्थ आदिवासी विकास संस्था, शहादा, धडगांव. says:

    सर नमस्कार

    राधीने जो काही विचार केला तो विचार धाडसाने तुमच्या पुढे मांडला. राधीने जे धाडस दाखविले ते खुप महत्वाचे आहे. बहुतेक मुलं जे त्यांना समजलेलं असतं ते मांडायचं धाडस करीत नाहीत. कोणतीही कृती करायला धाडस लागतं हे करण्यायासाठीचं प्रोत्साहन शाळांमध्ये दिले जात नाही, म्हणून मुलं पुढे येऊन बोलण्यास घाबरतात. राधीला तुम्ही संधी /पोषक वातावरण उपलब्ध करुन दिले हे महत्वाचे आहे.

  10. कोणतीही कृती करायला धाडस लागते हे तुमचे म्हणणे खरे आहे, शिवाजी सर… पण मला वाटतं इथे नीलेश सर प्रामुख्याने राधीच्या metacognitive (thinking about thinking) क्षमतेविषयी बोलत आहेत. बरीच धाडसी मुलं सुद्धा स्वतःचा विचार व्यक्त करू शकत नाहीत. अंगी धैर्य असूनही त्यांना ‘मी काय विचार केला’ याबद्दल काय आणि कसे सांगावे हा प्रश्न पडतोच. हे मेटाकॉग्निशन मुलांच्या ठायी विकसित होण्यासाठी फार मोकळं, भयमुक्त वातावरण लागत हे तर आहेच. तुम्हाला काय वाटतं?

  11. अतुलच्या मताशी मी सहमत आहे. राधी जो विचार करते आहे.तो तिने कसा केला हे अगदी व्यवस्थित मांडत आहे. आपल्या विचारांचा विचार करता येणे ही बर्याच वरच्या लेवलची क्षमता तिच्याकडे दिसून येते. माझ्या स्वतःच्या मुलीबाबतचाही अनुभव इथे सांगावासा वाटतो. बर्याचदा एखादी गोष्ट तिने केल्यावरा ती कशी केली हे तिला सांगता येत नाही.उत्तर बरोबर असते पण ते कसे ?असे विचारल्यावर कुणास ठावूक असं म्हणून ती रिकामी होते.कधी कधी असं विचारल्यावर चिडते ही.एकूणच खूप मोकळे वातावरण असूनही मुलं विचारांराचा विचार करण्याइतपत पोहचतील असे नाही. पोषक वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट नक्कीच आहे.पण राधी जो आपल्या विचारांचा विचार मांडतीय, किंबहूना तिच्याकडे असलेल्या शब्दसंपत्तीचा विचार करता असे मांडणे थक्क करणारे आहे.

  12. राधीत आलेला समजूतदारपणा हा तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदरतून आलेला आहे, खरंच जबाबदारी मुलांना लहानपणीच मोठे बनवते.
    मोठ्या माणसांसारखी वागणारी ही मुले वाचायला लिहायला शिकतातही लवकर असा माझा अनुभव आहे.

  13. किशोर आणि नीलेश,
    राधीचं “स्पश्टीकरण” फारच भारी आहे. आकडेमोड करतांना round off करण्याची tendency अनेक अभ्यासांत, अनुभवामध्ये दिसते. त्याचं हे अजून उदाहरण.
    मला दिल्लीच्या *निरंतर* संस्थेने प्रकाशित केलेलं ‘Exploring the Every Day’ हे पुस्तक आठवलं. “अशिक्षित किंवा प्रौढसाक्षर श्रमिक महिला-पुरुश” त्यांच्या दैनंदिन जीवनात लिखित भाशा व गणित कसं हाताळतात, याविशयी छोट्या छोट्या ethnographies या पुस्तकात आहेत.
    ‘त्यातला एक अभ्यास ‘बीजीव्हीएस;च्या कोमल श्रीवास्तव यांनी केलाय. बांधणीच्या ओढण्या रंगवणाऱ्या महिला एका ओढणीसाठी सतरा रुपये मिळत असतील तर तीन ओढण्या रंगण्याबद्धल मिळणारा मेहनताना कशा ठरवतात, हे फार उद्बोधक आहे.
    ओडिशामधल्या साओरा या आदिवासी समुदायाच्या बाजारातल्या व्यवहारांचा अभ्यास जे. एन. यू.च्या प्रा. मिनाती पांडा यान्नी केला होता. त्यातल्या एकाचं भाशांतर सहा-सात वर्शापूर्वी ‘शैक्षिक संदर्भ’ मध्ये प्रकाशित झालं होतं. ते पण बघ.
    दुसऱ्या एखाद्या सेटिंगमधलं उदाहरण राधी कशी सोडवेल, याचं मला कुतूहल आहे. काही आडाखे आहेत पण ते सांगून पूर्वग्रह तयार करू इच्छित नाही.
    एकूण लेखमाला छान होतीय.

Leave a Reply to ARUN BAISCancel reply

Powered by WordPress.com.

Up ↑

Discover more from The Road Less Travelled

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading