भाकर

मुलांच्या साक्षर होण्यात त्यांना वाचून दाखवण्याचे अपार महत्त्व असते. ज्या मुलांना लहानपणापासून वाचून दाखवले जाते अशी मुले चटकन साक्षर होतात. कारण चांगले वाचायचे कसे याचा नमुना सतत त्यांच्या समोर असतो. लिपीचे स्वरूप कसे असते, वाचून काय साध्य करता येते हे अशा मुलांना नेमके ठाऊक झालेले असते. म्हणूनच वाचनाचा उपयोग काय असतो हे माहिती असणारी मुले तुलनेने लवकर व कमी श्रमात वाचायला लागतात. 

भट्टीवर राहणाऱ्या या मुलांपैकी कोणाचेच पालक फारसे शिकलेले नाहीत. आणि जरी कोणाला थोडेफार वाचता येत असले तरी मुलांना वाचून दाखवत बसण्याची चैन त्यांना परवडणारी नाही. भट्टीतल्या विटेवर कोरलेली KBK किंवा तत्सम निरर्थक अक्षरे सोडली तर लिपीचे कोणतेही अस्त्तित्त्व परिसरात नाही. अशा वातावरणात वाढणाऱ्या मुलांना वाचायला लिहायला शिकण्यात अडचणी आल्या तर त्यात नवल वाटायला नको.

मुलांना परिसरात काहीतरी अर्थपूर्ण वाचायला मिळावे म्हणून किशोरने प्रत्येकाच्या कुटुंबातील सदस्यांची नावे त्यांच्या भोंग्यावर लिहून लावायचे ठरवले. किशोर कल्पकतेने संसाधने वापरत असतो. त्याच्या शाळेत येणाऱ्या गणवेशांच्या प्लास्टिकच्या पिशव्या त्याने सांभाळून ठेवल्या होत्या. भट्टीवर काम करायचे ठरवल्यावर केलेल्या सर्वेक्षणांत सर्वांची नावे आलीच होती.  मग   कुटुंबातील माणसांची नावे लेऊन प्रत्येकाचा भोंगा साक्षर झाला.

उमेशचा साक्षर भोंगा

या मुलांना भरपूर वाचून दाखवल्याशिवाय त्यांचे वाचनावर प्रभुत्त्व येणार नाही हे मला आणि किशोरला लगेचच उमगले होते. पण  या मुलांना वाचून दाखवायला नेमके काय न्यावे हा मोठाच प्रश्न होता. एक तर भट्टीवर आमच्या वर्गात येणारी मुले दुसरी ते सहावीपर्यंतची आहेत. त्यामुळे सगळ्यांना रस वाटेल असे काहीतरी वाचायला हवे. मोठ्या मुलांचा वाचनाचा स्तर जरी त्यांच्या वर्गाला अनुरूप नसला तरी अगदी लहान मुलांच्या गोष्टी त्यांना आवडतील का असाही एक प्रश्न समोर होताच. शेवटी त्यांच्या परिचयातील आशय असणारे काहीतरी वाचून दाखवावे म्हणून ‘भाकर’ नावाचे एक पुस्तक आम्ही वाचून दाखवायला न्यायचे ठरवले.

‘भाकर’ पुस्तक

मी पुस्तक उघडून मुलांसमोर ठेवले आणि वाचायला सुरुवात केली. पुस्तकात वाक्य आले ‘मग ताई पिठाचा गोळा बनवते. भला मोठा आणि मऊ मऊ.’ मी मुलांना विचारले, “मऊ मऊ म्हणजे कसा?” तर मुलं म्हणाली, “मातीसारखा.” मला चटकन हसू आले. मातीचा मऊपणा  विटभट्टीवर काम करणाऱ्या मुलांइतका दुसऱ्या कोणाला कळेल? माझ्या लहानपणी गणपती बनवायला माती आणत ती ‘पिठासारखी’ मऊ मळ म्हणून आम्हाला सांगितले जायचे! शेवटी जो तो आपल्या अनुभवांचा चष्मा लावूनच जगाकडे पाहणार ना!

मुलांना त्यांच्या घरातल्यासारखी माणसे, भांडी पुस्तकात दिसल्यावर त्यांचा पुस्तकातला रस वाढला. वाचता वाचता पुस्तकात एके जागी भाकर मोडल्याचा उल्लेख आला.

मी मुलांना विचारले, “आता भाकर मोडेल का रे?”

“मोडंल.” चंद्रिका म्हणाली.

त्यावर  राधी फटकन म्हाणाली, “माझीतं नाय हव मोडं.”

“तुला भाकर येते?”,  मी कुतूहलाने विचारले.  

“येते” राधीने सहज उत्तर दिले.

यावरून मग कोणाकोणाला काय काय बनवता येते यावर चर्चा झाली आणि मग प्रत्येकाने आपल्याला कोणता पदार्थ रांधता येतो हे लिहून काढायचे ठरले. मुलांच्या खाद्यसंस्कृतीत शिरायची आयतीच संधी समोर आली. आता उद्या येताना मुले काय लिहून आणतायत याची उत्सुकता मला आणि किशोरला लागून राहिली आहे.

12 thoughts on “भाकर

Add yours

 1. पिठासारखी मऊ माती व मातीसारखा मऊ पीठाचा गोळा यातच सारे आले . भट्टीवरील जीवन ज्यान्नी पाहिले नाही त्यांना ह्याची कल्पना तेवढी येणार नाही . खरच ज्यांना आजही अन्न हीच भ्रांत आहे अशा पाटल्यावरील मुलांत खऱ्या अर्थाने आपण शिक्षित करत आहात …..
  मुलांना वाचून दाखवण्याची चैन …. पहाटे चार पासून थंडीत गार मातीच्या विटा थापणारे १० वाजता काम उरकल्यावर काय त्राण उरत असेल ….. ?
  अशा परिस्थितीतील मुलांचे भावविश्व जाणून त्यांच्यातही वाचण्याची आवड निर्माण होऊ शकते व त्यातून अभिव्यक्ती निर्माण करण्याचे खूप मोठे काम आपण उभारत आहात हे आमच्यासाठी मार्गदर्शक आहे .

  1. तुमचं लेखन हे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांसाठी शैक्षणिक साहित्य किंवा संदर्भ साहित्यच वाटतं मला. प्रत्येक लेख वाचताना आधी वाचलेल्या/ऐकलेल्या कोणत्यातरी शैक्षणिक सिद्धांताचा किंवा परिभाषेचा अर्थ सगुण साकार होऊन अवतरल्यासारखा वाटतो. धन्यवाद.

 2. भाकर , पीठ, आणि माती किती सहज आपल्या वातावरणात रमतात मुलं!निलेशदा आणि किशोर सलाम भोंगा परिसरातील मुलांना. हे काम खूप कल्पक आणि प्रेरणादायी आहे

 3. सर आपल्या लेखनातील जिवंतपणा भावतो. संदर्भीकरण समजून घेऊन साक्षर वातावरण कसे करावे याचा उत्तम नमुना आपल्या लेखनातून आला ,लहान मुलांचे शिक्षक खूपच ताकदीचे हवे हे मात्र खरे. आपल्या अनुभवाने दिवसाची सुरुवात छान झाली .धन्यवाद

 4. कोणतेही तयार उत्तर बऱ्याच वेळा फारसे उपयोगी ठरत नाही . पण ते शोधण्याचा प्रवास समजला तर त्यातून आपण काय करायचे चांगले उमजत .या ब्लॉगवर अडचणी आणि उपाय या दोन्हीचे वर्णन आल्यामुळे या परिस्थितीत शिक्षक म्हणून भूमिका असणाऱ्या व्यक्तींसाठी मार्गदर्शक ठरणार आहे . राधी कशी कशी शिकते याकडे आमचं लक्ष आहे .

 5. सर, तुम्ही सुद्धा पीठासारखी मऊ मळत आहात शिक्षणोत्सुक परिस्थिती. वीटभट्टीवरची शैक्षणिक मोहीमेची भाकर थापता थापता मोठीच होणार पण ती तुम्ही मुळीच मोडू देणार नाही ह्याची खात्री आहे आम्हाला अन् तुम्हालाही…..

  मुले काय लिहून आणणार ह्याची उत्सुकता आहेच!!

 6. माती सारखा मऊ मऊ, हा अनुभव खूप छान आहे, आणि ज्याचा त्याचा अनुभवाचा चश्मा वेगळा आहे, या अनुभवात वीटभट्टीवरील मुलांचे स्वाभाविक ज्ञान आणि निरागसता याचीच जाणीव होते, जर हे स्वाभाविक ज्ञान आणि वाचन यांची सांगड घालून या मुलांना लवकर साक्षर करता येतील…. नाहीतर ही मुले आपापल्या ठिकाणी हुशार आहेतच.

 7. मुलांच्या आजूबाजूच्या परिसरातील आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील गोष्टींशी शिक्षणाला जोडून त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करताय ही खूपच छान पद्धती आहे निलेश सर. आम्हाला उद्या मुलं काय लिहून आणतात याची उत्सुकता आहे

 8. नमस्कार आजचा लेख वाचल्यानंतर असे लक्षात आले ते आपण म्हणता त्याप्रमाणे मूल हे वाचायला वाचूनच शिकेल म्हणजेच मुलांसमोर मुलांच्या भावविश्वातील जर काही दिले तर निश्चितच मुलांना ते आवडतात.
  आणि वाचता वाचता ज्यावेळी म‌ऊ म‌ऊ हा शब्द आला त्यावेळी मुले लगेच मातीच्या मऊ पणावर गेले आणि ज्यावेळी भाकर मोडते का असे विचारले त्यावेळीच भाकर हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि राधेने लगेच सांगितले की मला सुद्धा भाकरी येते आणि त्यावर चर्चा पुढे गेली म्हणजेच मुलांच्या भावविश्वाला सहजच हात घातला गेला आणि जी मुले बोलायला सुद्धा मागे पुढे करत होती ती मुले आता ते बनवत असलेले पदार्थ त्यांच्या घरात तयार होणारे पदार्थ याबद्दल मनमोकळेपणाने गप्पा मारायला लागली
  म्हणजेच अशा मुलांसोबत काम करत असताना त्यांचे भावविश्व जपणे किती महत्त्वाचे आहे आणि हे जर लक्षात घेतले तर या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायला फार मोठी मदत मिळेल.

 9. मला वाटते या प्रकारच्या कृतीमुळे मुले मे महिण्यापर्यंत वाचनासाठीची घडपड करायला नक्की लागतील!!!!!
  दुसरी ते सहावी पर्यंतची ही मुले वेगवेगळ्या वयाची जरी असली तरी सध्या त्यांच्या वाचनाच्या स्तरात फार काही विविधता नसेल असे मला वाटते. त्यामुळे छोट्या गोष्टीची पुस्तके सुध्दा मुलांना नक्कीच आवडतील. आपण म्हटल्या प्रमाणे घर, परिसराशी संबंधीत गोष्टींचे विषय असेल तर, मुलांची उत्सुक्ता वाढेल, गोष्ट ऐकतानाची शांतता वाढेल, गोष्टी त्यांना वाचाव्याशा वाटतील….

  या मुलांना बी लावलं. काका कुमारी, लिओ टॉलस्टाय च्या गोष्टी, मंगूचा भोवरा, अट्टू गट्टू, चिऊताई आण सुरवंट. काबुलीवाला, बसवा आणि प्रकाशाचे ठिपके, गावका बच्चा, गोष्ट पावसाची ( विलास गोगटे)..या पुस्तकातील गोष्टी पण वाचून दाखवायला हरकत नाही.

 10. भाकर !! किती जिव्हाळ्याचा विषय!!
  एकदम मस्त सुरुवात👍👍

 11. भट्टीवर प्रत्यक्षात गेलो असता एका मुलाची भेट झाली.मला त्याचं नाव अमित आहे हे तिथे चाललेल्या एका उपक्रमामुळे समजले. आम्ही जेंव्हा त्याच्या घराकडे गेलो तेंव्हा मला तिथे एक नवीन गोष्ट लक्षात आली की प्रत्येक घराच्या बाहेर त्या घरातील सर्व सदस्यांची पूर्ण नावे त्यांच्या वयाच्या उतरत्या क्रमाने लावलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक मुलाला स्वतःचे व इतरांच्या घरातील सर्व सदस्यांची नावे वाचता येतात.अमितने त्याच्या भोंग्याजवळ गेल्यावर मोठ्या कुतूहलाने त्याच्या घरावरची पाटी दाखवली आणि वाचायला सुरुवात केली.वरून नावं वाचत आल्यावर तो एका ठिकाणी बोट ठेवून म्हणाला ‘हा मी अमित’. त्यातला मी हा त्यानं प्रचंड आनंदात सांगितला.मला वाटत ही जाणीव की माझं काहीतरी आहे हे फार महत्त्वाचे आहे.
  हा उपक्रम अतिशय लहान जरी असला तरी सामाजिक दृष्ट्या मला अत्यंत महत्त्वाचा वाटला कारण सामान्य कुटुंब किंवा शहरातील कुटुंबांना स्वतःच्या घरावर जितका अभिमान असतो तितक्याच अभिमानाने अमितने मला हे माझं नाव असं सांगितलं त्यावरून वीटभट्टीवर चाललेले काम हे केवळ शैक्षणिक स्वरूपात मर्यादित न राहता प्रचंड मोठ सामाजिक काम असल्याची जाणीव मला झाली.

Leave a Reply

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: