आज भट्टीवर गेल्या गेल्या मुलांच्या खाद्यसंस्कृतीचे दालन आम्हाला खुले झाले. अमितने काकडीची भजी कशी करायची ते लिहिले होते तर राधीने तिळगुळाची पाककृती लिहिली होती. “सक्रातीला मीनी तिलगूल केला होता.” असे तिने ठसक्यात सांगितले. पूजाने भात कसा शिजवायचा हे लिहिले होते आणि चंद्रिकाने मटाराची भाजी कशी करायची हे लिहून आणले होते. पूजाला जवल्याच्या भाजी बद्दल लिहायचे होते तर वैशालीला सोया वड्याच्या भाजी बद्दल. पण त्यांनी किशोरला सांगितले, आम्हाला लिहिता येत नाही तर तूच लिहून दे. मग किशोर त्यांच्यासोबत लिहायला बसला.
मुलींच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्यांना खूप काही सांगायचे होते. त्या भाजी करताना इकडचे तिकडचे बरेच काही सांगायच्या. भाजी करताना आधी काय केले, मग काय केले, शेवटी काय केले असा काही क्रम त्यांच्या सांगण्यात येत नव्हता. ‘तीन उकल्या आल्यावर जवला शिजतो’ हे आधी सांगतील तर ‘जवल्यात घालायला कांदे कापावे लागतात’ हे नंतर! त्यांना थोडावेळ बोलू दिल्यावर तुम्ही भाजीला सुरुवात कशी करता, मग काय करता, शेवटी भाजी कशी तयार होते, असे प्रश्न विचारून त्याच्या सांगण्यातला फापटपसारा कमी करून किशोरने दोघींनाही त्यांच्या त्यांच्या भाज्या कशा करतात हे लिहून दाखवले.
अमित, राधी, चंद्रिका, पूजा, राहुल यांनी बऱ्यापैकी लिखाण केले होते. त्यांचे लिखाण पाहता त्यांना पाककृती हा लेखन प्रकार कसा असतो हे सांगावे असा निर्णय आम्ही घेतला. मी सगळ्यांना समोर घेऊन बसलो आणि म्हणालो,
“तुम्ही आज पदार्थ कसा बनवायचा हे लिहिलेत ना? तशीच मोठी माणसंपण लिहितात.”
“कशाला?” मुलांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसले.
“कारण, ज्यांना तो पदार्थ बनवता येत नाही ते वाचतात आणि तो पदार्थ बनवतात” मी सांगितले. मुलांनी मान डोलावली. विषय पुढे नेण्यासाठी मी म्हणालो,“ एखादा पदार्थ कसा बनवायचा हे लिहून ठेवले तर त्याला त्या पदार्थाची पाककृती म्हणतात. राधीने तिळगूळाची पाककृती लिहिली आहे.”
मी हे सांगताच सगळी फिदी फिदी हसू लागली. मला काही कळेना ती का हसतायत ते.
“ आता यात हसण्यासारखे काय आहे?” मी दटावले. तरी यांचे हसणे काही थांबेना. मग त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मी अमितला विचारले, “ तू कशाची पाककृती लिहिली आहेस सांग बरं.”
“पाककुत्री?” अमितने विचारले. त्याने पाककुत्री म्हणताच सगळी खदाखदा हसत सुटली.
“अच्छा, म्हणून मघापासून खसखस पिकली होती होय?” मग मी आणि किशोर ही त्यांच्या हसण्यात सामील झालो. आमच्या एक गोष्ट लक्षात आली की मुले शब्दांतील आवाजांशी खेळतायत, त्यातून होणाऱ्या विसंगतीवर हसतायत. पाककृती ऐवजी ते पाककुत्री असे परत परत म्हणून हसत होते. खरेतर भाषाशिक्षणाच्या दृष्टीने ही बाब फार महत्त्वाची आहे. पण दुर्दैवाने असा भाषिक विनोद करता येणे ही क्षमता आपण शिक्षणव्यवहाराच्या परिघाबाहेरच ठेवली आहे.
हसण्याचा भर जरा ओसरल्यावर आम्ही त्यांना सांगितले की काही माणसे पदार्थ कसे बनवतात याची पुस्तके लिहितात. इतर माणसे त्यांची पुस्तके वाचून पदार्थ बनवू शकतात. पण त्यांना ते फारसे पटल्यासारखे दिसले नाही. म्हणून पाककृतीचे एखादे पुस्तक नेऊन त्यांना दाखवायचे असे आम्ही ठरवले. दुसऱ्या दिवशी पाककृतीचे एक पुस्तक घेऊन आम्ही भट्टीवर गेलो. त्या पुस्तकातील कांद्याच्या भज्यांची पाककृती वाचून दाखवली. पाककृतीची भाषा कशी असते हे मुलांना लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला. पण तो काही फारसा यशस्वी झाला नाही. भाषेपेक्षा ‘भज्यां’भोवतीच चर्चा जास्त घुटमळली. पुस्तकात भजी करण्याची दिलेली पाककृती आणि त्यांच्या घरची भजी बनवण्याची रीत यांची तुलना मुले करू लागली.
पाककृतीच्या पुस्तकासोबत आज भट्टीवर येताना किशोरने मुळ्याच्या भाजीची पाककृती लिहून तिच्या पट्ट्या कापून आणल्या होत्या. त्या पट्ट्या चटईवर पसरून त्यांचा क्रम लावण्याचे काम झाले. आणि मग उद्या येताना तुम्ही तुमच्या पाककृतीचा दुसरा खर्डा लिहून आणा असे सांगितले.

मुलांच्या लिखाणाचा दुसरा खर्डा पाहिल्यावर एक बाब लगेचच लक्षात आली. त्यांनी पदार्थ बनवण्याच्या पायऱ्या अगदी अचूक क्रमाने लिहिल्या होत्या. आमची पट्ट्यांचा क्रम लावण्याची शक्कल बऱ्यापैकी कामी आली. राधीने लिहिलेली पाककृती अजून ही अनुभवाच्या स्वरूपातच आहे. फक्त आधी साहित्य लिहणे तिने पुस्तकातल्या सारखे केले आहे. आणि त्यातही तिळगूळ हे साहित्य म्हणून लिहिले आहे.

अमितने क्रमाने पायऱ्या लिहिल्या आहेत आणि भाषा ही स्वकेंद्री नसून बरीचशी औपचारिक भाषेसारखी आहे. काल पुस्तकातील पाकृती वाचून दाखवल्यावर त्यातील भाषा लक्षात आणून देताना मुलांनी ज्या प्रकारचा उदासीन प्रतिसाद दिला होता तो पाहता आजच्या दुसऱ्या खर्ड्यात ती इतकी प्रगती करतील असे वाटले नव्हते. अजून एक बाब म्हणजे आपले लेखन स्केचपेन वापरून सजवण्याची सगळ्यांना भारी हौस वाटते आहे. लिखाणाइतकाच वेळ त्यांनी या सजावटीत घालवला. ‘स्केचपेन सारखे साधन मुबलकपणे वापरायला मिळणे’ इतक्या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीचे मुलांना वाटणारे अप्रूप पाहून माझ्या मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ सुरू झाला. सजावटीच्या निमित्ताने सगळे इतका वेळ एका जागी बसले याचा आनंद मानावा, की असले बारीक सारीक आनंदही आजवर त्यांच्यापर्यंत पोहचले नाहीत याचे वाईट वाटून घ्यावे ? काही कळत नाहीये.
कोणत्याही प्रक्रियेचे लेखन करणे हा मुलाच्या लेखन प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असतो. आपण जे लिहितो आहोत ते वाचकाला नीट समजायला हवे हे उद्दिष्ट अशावेळी मुलांच्या समोर अगदी स्पष्ट असते. आता मुलांना विटा कशा बनवायच्या, गोट्या कशा खेळायच्या, चपला कापून त्याची गाडी कशी बनवायची असे छोटे छोटे विषय देऊन ‘प्रक्रिया लेखन’ करायला सांगायचे असे आम्ही ठरवले आहे. यातून लेखन विषयाचे नियोजन करणे, क्रम ठरवणे, अचूक शब्द निवडणे अशा काही बाबी साध्य होतील असे वाटते आहे.
एरवी लिहायला अळम् टळम् करणाऱ्या मुलांनी अगदी नेटाने पाकृतीचा दुसरा खर्डा बनवला आहे. लिखाणाचा आशय जर मुलांच्या आयुष्याशी जोडलेला असेल तर त्यांचा उत्साह टिकून राहतो, हे आम्हाला सैद्धांतिक पातळीवर माहिती होते. पण प्रत्यक्षात काम करताना येणारी त्या सिद्धांताची अनुभूती ही काही वेगळाच आनंद देऊन गेली हे नक्की !
मुलांचा दिनक्रम ,वातावरण , भावभावना यांचे आस्थेवाईक निरीक्षण ही तुमच्या प्रयोगातील अतिशय महत्वाची गोष्ट वाटते . या कारण त्यातून शिकवण्याची सामग्री मिळत जाते .मूल समजल्याशिवाय सरधोपटपणे शिकवणे किती व्यर्थ आहे हे यातून पुन्हा अधोरेखित होते .
LikeLike
लिहिता येण्यासाठी कितीतरी तयारी करावी लागते हे मुलांच्या नक्कीच लक्षात आले असेल.
बरेचदा आपण इतकी मोठी मुलं असून लिहिता येत नाही असं सहज म्हणून जातो. पण लिहून दाखविण्याची संधी न मिळणे, आपण लिहिलेले बरोबर आहे किंवा नाही या विषयीची चर्चा न होणे, यामुळे हा प्रकार घडत असावा.
मला वाटते वाचणे आणि लिहिणे यो दोन्ही गोष्टीला सारखेच महत्व द्यायला हवे.
LikeLike
लिहता येणे चा अर्थ अनेकदा अनुलेखन किंवा श्रुतलेखन असाच घेतला जातो. निबंधलेखन तर अनेकदा पाठ करून घेतला जातो त्यामुळे मुलांना लेखन येतच नाही . नोकरीसाठी आलेल्या उमेदवारांना नोकरीसाठीचा अर्ज ही धड लिहता येत नाही हे वास्तव आहे .
अशा प्रकारच्या भावविश्वातील संधी देणे व ते लिहलेले तपासणे त्यावर अभिप्राय / सुचना लिहणे . असे झाल्यास मुले लिहती होतील . ज्या मुलांचे भाषविश्व अगदी तुटपुंजे आहे अशा मुलांनाही हे शक्य करून दाखवत आहात .
आमचे एक कारण तुम्ही कमी केलेत …..
LikeLike
मुलांना लिहितं करणं हे एक आव्हान आहे आणि त्या साठी हा छानच मार्ग आहे. मुलांच्या चश्म्यातून जग बघितलं की हे पर्याय सुचत जातात.
एक विचार असा की कुत्री आणि कृती यात मुलांचा होणारा गोंधळ सहाजिकच आहे, पण मथळा जर ‘पाककुत्री – नव्हे पाककृती’ असा असता तर वाचकांना निश्र्चित दिशा मिळाली असती.
LikeLike
मूळात मुलांना स्वतःचे विचार, लिहून मांडावे या साठी प्रेरणा देऊन उद्युक्त करणे हेच खूप मोठे काम आहे. त्यातून त्यांच्या जीवनाशी जोडून पाककृती लीहिण्या साठी प्रोत्साहित करणे ही लेखना साठी अगदी योग्य गोष्ट आहे असे वाटते. आम्ही सुद्धा आमच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मोठ्या बालवाडी
च्या मुलांना त्यांनी शाळेत बनवलेल्या पदार्थांची नवे, आणि कृतीचा क्रम लावायला सांगतो तेव्हा तीही त्या मध्ये गढून गेलेली दिसतात. तेव्हा मुलांच्या जीवनाशी जोडले गेले तर भाषा शिकणे जास्त सोपे जाते.
LikeLike
मनातल्या पाककृतीच्या टप्प्यांना शब्दात व्यक्त करणे, लेखन करणे मुलांना अडचणीचे जाते कारण तशा अभिव्यक्तीच्या संधी उपलब्ध झालेल्या नसतात. पहिल्यांदाच ही कृती करताना मुलांना खुप आनंद होतो हे लिंबाच्या सरबताच्या पाककृती लेखनाच्या वेळी अनुभवलय… कधीतरी या मुलांना भेटायला नक्की आवडेल.
LikeLike
राधाच्या लेखनातील शेवटच्या दोन ओळी फारच भावल्या.या मुलांना अक्षर ओळख आहे आणि लिहीता येते ही फारच जमेची बाब आहे. कदाचित शाळेची सक्ती नव्हती म्हणून मुलं लिहायला कचरली नाहित आणि त्यांचा आत्मविश्वास शाबूत आहे / राहू शकला का ? असा एक विचार हे काम वाचताना मनात आला.
LikeLike
It is very heart touching.It is very challenging to mould a human being from Zero base . The passion with which Nilesh is doing it is unmatchable.
LikeLike
नमस्कार सुरुवातीला असे वाटले की कदाचित टाईप करण्यामध्ये कृती ऐवजी कुत्री हा शब्द टाईम झाला असेल परंतु ज्यावेळेस लेख वाचण्यासाठी घेतला त्यावेळेस लक्षात आले की पाककुत्री हा शब्द कसा आला आणि मलासुद्धा थोडेसे हसायला आले खरच ज्या पद्धतीने मुलांनी पाककृती लिहिल्या ते पाहिल्यानंतर मुलांच्या मध्ये होणारा भाषिक विकास हा त्यांचा अनुभव विश्वावर किती अवलंबून असतो हे लक्षात येते. आणि अशा मुलांसोबत काम करत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे काय काय प्रक्रिया घडते आणि मुले कशी होतात मुलांच्या लेखनात होणाऱ्या सुधारणा या कोणत्या टप्प्यावर होतात आणि एक शिक्षक म्हणून मी काय काय करायला पाहिजे हे अत्यंत सुंदर असे उदाहरण आपण या द्वारे सादर केले कारण राधेचा तिळगुळ आणि नितीनचे काकडी चे भजे दोन्ही लिखाण पाहिल्यानंतर पहिला खर्डा आणि दुसरा खर्डा यात जाणवलेला फरक आणि आपण पहिला स्वीकारून ज्यावेळी त्यांना दुसऱ्या पाककृतीचे पुस्तक वाचून दाखवले त्यानंतर झालेला अनपेक्षित बदल हा खूपच छान होता. आपल्या या अनवट वाट या मालिकेचा उपयोग आम्हाला लेवल बेस्ट लर्निंग प्रोग्राम म्हणजेच एल बी एल राबवताना निश्चित होत आहे . कारण अशाच पद्धतीचे काम कुठेतरी जी मुले लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी होणे गरजेचे आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक अनुभवाची शिदोरी आपण देत आहात त्याबद्दल आपले खरेच मनःपूर्वक धन्यवाद.
LikeLiked by 1 person
खूप छान आणि वेगळा अनुभव वाचनात आला.आणि तो मनाला भावला,पटला आणि आवडला. प्राथमिक शिक्षक म्हणून मी, शिक्षण क्षेत्रात 27 वर्षे झाली कार्यरत आहे, रोज एक नवा अध्याय अनुभवास मिळतो, माझ्याकडे अनाथ आश्रमातील मुले आहेत तयांना सांभाळणे, बोलते करणे, लिहा-वाचायला लावणे, चांगल्या सवयी रुजवणे खूप जिकिरीचे काम असते. त्यांच्या आवडीचा कल लक्षात घेऊन अभ्यास क्रमात नियोजन करावे लागते, आपला लेख खूपच उद्बबोधक, मार्गदर्शनपर मौलिक असा वाटला.
खूप खूप छान स्तुत्य उपक्रम आपण राबवित आहात. धन्यवाद🙏
LikeLike
खुसखुशीत आणि अध्ययन अनुभवाचा परीघ रुंदावणारा अनुभव.
LikeLike
भाषा शिक्षणाची ही पद्धत फारच आवडली. मुलांना त्यांच्या पद्दतीने करु दिलेला प्रयत्न फार आवडला. ही मुले भाषिक विनोद कर्तात आणि तुम्ही तो आनंदाने स्वीकारला हे महात्वाचे.
LikeLike
खूपच interesting आहे हे. खरं तर या मुली जेव्हा प्रत्यक्ष स्वयंपाक करत असतील तेव्हा एखादा पदार्थ करण्याच्या कृतीचा क्रम अचूकपणे त्यांच्या डोक्यात असत असणार. म्हणजे त्या क्रमबद्ध विचार करू शकत नाहीत असे मुळीच नाही पण डोक्यातला हा विचार शब्दबद्ध करायची वेळ आली तेव्हा मात्र त्या गडबडल्या, त्यांना मदतीची गरज लागली. याचा अर्थ क्रमबद्ध विचार करणं आणि तो शब्दांत मांडणं या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि कदाचित पातळीच्या क्रिया आहेत. हे या पोस्टमधून नीटच कळले.
पाककुत्री या शब्दांतला विनोद समजून (मुलांच्या फिदीफिदी हसण्यासह) स्वीकारण्याची संवेदनशीलता आणि openness शिक्षकांनी दाखवायला पाहिजे हाही महत्त्वाचाच धडा.
LikeLike
तुमचे म्हणणे अगदी खरे आहे. एखादी गोष्ट क्रमाने करता येणे आणि आपण काय केले हे लिहिता येणे या स्वतंत्र बाबी आहेत. त्यासाठी बरीच भाषिक तयारी लागते. खरे तर ही सारी पायाभरणी बालवाडी पासूनच व्हायला हवी. लिहायला सुरुवात करण्या आधी समृद्ध तोंडी भाषेचा पाया रचला गेला तर लेखन करताना त्याचा फायदा होतो.
LikeLike
स्केचपेन सारखे साधन मुबलकपणे वापरायला मिळणे हि गोष्ट कुणसाठी तरी इतकी आनंददायी असु शकते हा विचार वाचताच नकळत डोळ्यात पाणी आले.तुमचा उपक्रम स्तुत्य तर आहेच पण त्यापेक्षा परमेश्वराने तुम्हालाा हि संधी दिली याबद्दल हेवा वाटतो.
LikeLike
निर्मला ताई अशा परिस्थितीत राहणारी हजारो मुले आहेत आपल्या राज्यात. पण त्यांच्या दारिद्र्यामुळे ती अजिबात लाचार झालेली नाहीत. परिस्थितीशी दोन हात करत ती कणखरपणे उभी असतात. त्यांच्या या क्षमतांची आपण शाळेत दखलच घेत नाही. या मुलांचे जगणे आणि त्यांची ताकद समोर यावी याच साठी हा ब्लॉग प्रपंच !
LikeLike
एक अतिशय सुंदर आणि उपयुक्त प्रयोग या निमित्ताने घडत आहे, मी आज पहिल्यांदाच पोस्ट वाचली, खूपच आवडली, भाषिक तयारी करताना किती प्रयोगशील राहता येईल याचा हा वस्तुपाठच!
मनापासून धन्यवाद
LikeLike
I have been a learner and teacher all my life, especially of language. That it happens I teach/ have taught English is another matter. Your experience with language learning is immensely important and interesting. To have a command over at least one language, opens the flood gates of information and knowledge. But, much more importantly, to my mind, is the fact that one can express oneself and as one does this, thoughts form, new ideas quietly come in, words form, organisation and coherence takes place. You have been very wise and patient with these first generation ( I guess) learners. Food is a daily neccesity, language connected with food will be learnt well and relatively easily.
I wish I was staying nearby. I would have loved to work with you in some way.
All strength to you all there.
LikeLike