निष्काम कर्मयोगाची मोफत शिकवणी

आज खर्चीचा ( आठवडी पगाराचा)  दिवस होता. त्यामुळे कामाला सुट्टी होती. मालकाकडून पैसे घेऊन बरेच पालक आज बाजारात जाणार होते.  मी आणि किशोर भट्टीवर पोहचलो तर सगळीकडे सामसूम होती. मुलेही कुठे दिसेनात. म्हणून शोधत शोधत दोघेही जरा भट्टीच्या मागच्या बाजूला गेलो तर तिथे उमेश गोट्या खेळताना दिसला. किशोर त्यांना म्हणाला, “चला.” 

तर सगळे म्हणाले “आज नय इयाचु आमी”

किशोर म्हणाला,” का रे ?”

” आज तं खर्ची ना ? ” सगळ्यानी उत्तर दिले.

किशोरने सगळ्यांना बोलावायचा बराच प्रयत्न केला. मी आणि तो मुद्दाम त्यांना शिकवायला इतक्या लांबून आलो आहे असे सांगितले. तर सगळे म्हणाले, “आज कशा आलास?”  किशोरच्या वाटाघाटींना काही यश येईना. सगळेजण आमच्याकडे साफ दुर्लक्ष करून खेळत बसले.

मुलांचे हे वागणे पाहून आम्हा दोघांनाही  राग आला आणि जरा वाईटही वाटले. सगळे काम धाम सोडून यांना शिकवायला म्हणून इथे यायचं आणि वरून ‘कशाला आलास’ हे ऐकून घ्यायचं? माझा इगो तर चांगलाच दुखावला होता. आम्ही काही न बोलता एकमेकांकडे पाहिले आणि आलेला राग मनातल्या मनात गिळला.

तसंही रागावून काय फायदा? मुलांनी थोडंच आम्हाला येऊन शिकवा असे म्हटले होते? हौस आमचीच! शिवाय उद्या खर्ची आहे, आमची सुट्टी असते, येऊ नका, असे सांगण्याची अपेक्षा मुलांकडून किंवा पालकांकडून करणे व्यर्थच होते. खरे तर आम्ही विचारले नाही, म्हणून त्यांनी सांगितले नाही! विचारले असते तर खेप वाचली असती कदाचित. असे म्हणून आम्ही दोघेही जमेल तितक्या शांतपणे मुलांचा खेळ पाहत उभे राहिलो.

उम्या भराभर गोट्या टिपत होता. त्याचा नेम पाहून मी चकित झालो. त्याच्याकडे चांगल्या अर्धा डबा भरून गोट्या होत्या. मी त्याला विचारले, “कुठून आणल्यास?” तर म्हणाला, ‘मीह्यान जिकल्या.’

“कशा जिकायच्या रे गोट्या ?” मी विचारले.

तशी सगळी फिदी फिदी हसू लागली. मला इतकी साधी गोष्ट माहीत नाही याचे त्यांना भारीच आश्चर्य वाटले.

” खेलता नाय ये तुला?” उम्याने विचारले.

चला. मगाशी आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून गोट्या खेळण्यात मग्न असलेल्या मुलांना मी काय बोलतोय यात रस वाटू लागला  याचे मला बरे वाटले.

” मला नाही रे येत. तुम्ही शिकवाल का मला?” मी विचारले

“बारीक होतास तहां नाय खेललास?” उमेशने विचारले.

मला एकदम माझे लहानपण आठवले. मी नुसते गोट्या खेळायचे नाव जरी काढले असते तरी चांगली धुलाई झाली असती. खरे तर गोट्या हा कसा ‘निम्न दर्जाचा’ खेळ आहे हे माझ्या आसपासच्या लोकांनी आपल्या बोलण्यावागण्यातून मनावर इतके ठसवले होते की मी कधी त्या वाट्यालाच गेलो नाही. आयुष्यात हा आनंद घ्यायचा राहूनच गेला.  मग मी उमेशकडे ‘गोट्या शिकव’ असा जरा हट्ट केला, तसा तो तयार झाला. मग सगळ्यांनाच भारी उत्साह आला. माझ्याकडे गोट्या नव्हत्या, त्यामुळे दोन गोट्या उसन्या घेऊन खेळायला सुरुवात केली. मी गोट्या जिंकल्या किंवा हरल्या तरी ज्याच्या त्यालाच परत द्यायच्या असे ठरले. मग मुलांनी मला ‘ढुशा’ नावाचा गोट्यांचा खेळ शिकवला. माझा अचाट नेम पाहून सगळे मनसोक्त हसले. थोडा वेळ खेळून झाल्यावर मी त्यांना एक प्रश्न विचारला.

समजा माझ्याकडे १४ गोट्या आहेत आणि मला त्या मला अमित, उमेश, मंग्या आणि गुऱ्याला सारख्या वाटायच्या आहेत. तर प्रत्येकाला किती गोट्या मिळतील?

मुलांनी खेळ थांबवला ! गोट्यांचा डबा घेऊन त्यातून १४ गोट्या काढून वाटणी सुरू केली. एकूणच या नव्या खेळाची त्यांना बरीच मजा वाटत होती असे दिसले. मग एका मागोमाग एक गुणाकाराची आणि भागाकाराची तीन चार उदाहरणे मी गोट्यांचा आधार घेत पदरात पाडून घेतली. आजची खेप अगदीच वाया नाही गेली म्हणायची.

चौदा गोट्या चार मुलांना सारख्या वाटल्या तर प्रत्येकाला किती मिळतील ?


गोट्या खेळण्याच्या निमित्ताने पोरांकडून अभ्यास करून घेण्याच्या माझ्या चलाखीचे मलाच जरा कौतुक वाटले. पण  हा आनंद मुलांनी फार काळ टिकू दिला नाही. दुसऱ्या दिवशी भट्टीवर गेलो असता मुलांच्या खिशात बोरे होती. कालचा गोट्यांचा अनुभव लक्षात घेऊन मी आज बोरे वाटण्याची उदाहरणे मुलांना सांगू लागलो. पण कसचं काय? बोरे वाटून झाल्यावर, उत्तर काय आहे हे सांगायच्या आतच कोणाला तरी वाटलेल्या बोरातले बोर खायची इच्छा झाली. त्याने सरळ वाटलेल्या बोरांपैकी एक बोर तोंडात टाकले. ते पाहताच ज्याची बोरे होती त्याने खाणाऱ्याच्या पाठीत एक गुद्दा हाणला. त्यावरून मुलांची जी जुंपली ती सोडवता सोडवता माझ्या आणि किशोरच्या नाकी नऊ आले. प्रत्यक्ष बोरे वापरून शिकवण्याचा आमचा प्रयत्न फसल्याने काल मोठ्या चलाखीने कामी लावलेला दिवस आज सपशेल  वाया गेला.

मुलांची भांडणे सोडवून झाल्यावर माझ्या लक्षात आले की आज उमेश आलेला नाही. मी त्याच्याबद्दल मुलांकडे चौकशी केली तर कळले की त्याचे कुटुंब भट्टी सोडून निघून गेले. कारण काय, तर त्याच्या वडिलांचे शेटच्या सोबत भांडण झाले. कुठे गेले आहेत याची चौकशी केली तर काही पत्ता लागला नाही.

माझ्या मनात एकदम निराशा दाटली. इतक्या अस्थिर वातावरणात मी आणि किशोरने इथे येऊन शिकवण्याने काय साध्य होणार आहे? ज्या मुलांसाठी आम्ही हा खटाटोप मांडलाय त्यांना तरी याचा काय फायदा होणार आहे? आम्ही जे करतोय ते खरेच या मुलांच्या प्रश्नांचे उत्तर आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहिले.

भट्टीवरून परतताना मी किशोरला विचारले, ” आपल्या कामातून खरंच काही घडणार आहे का रे ?”

“माहिती नाही. पण करत राहू या. होईल काहीतरी.” अनाग्रही संस्कृतीत वाढलेल्या किशोरने सहज उत्तर दिले.

मग माझ्याही मनातली निराशा दूर झाली. डोक्यात विचार आला आमचे हे काम म्हणजे ‘निष्काम कर्मयोगाची मोफत शिकवणी’च नाहीय का? अशी संधी आयुष्यात परत परत येत नाही. मी हसलो आणि उद्या भट्टीवर काय करू या,  याबद्दल किशोरशी बोलू लागलो.

11 thoughts on “निष्काम कर्मयोगाची मोफत शिकवणी

Add yours

 1. अजून चार पाच आठवड्यात ही सर्वच कुटुंब निघून जातील . क पुढील वर्षी कदाचित वेगळीच मुले असतील .
  सगळ्या अनवट वाटा अशाच असतात …
  आपल्याला त्रास होईल पण वाट तयार होण्यासाठी कुणाला तरी पहिल्यांदा जावेच लागते ……….

 2. नमस्ते सर, मुलांना समजून घेऊन त्यांना शिकवण्यासाठी किती संयमाची आवश्यकता आहे हे लक्षात येते.यश नजरेत येत असताना अचानक वेगळा अनुभव येतोय हे खरेपणाने मांडणे हे कौतुकास्पद,आपले अनुभव आम्हाला खूप काही शिकवणारे आहेत,धन्यवाद

 3. कठीण आहे कायम विश्वास ठेवून काम करणं, पण हे असं घडत राहणार आहे, यावर आपण तरी हतबल आहोत, पण समोर असेल त्याला लाभ देत राहणं आपल्या हातात आहे.

 4. नमस्कार आज हा लेख वाचल्यानंतर बराच वेळ विचार केला की यापूर्वीसुद्धा ऊस तोडणीच्या कामगारांच्या मुलांच्या, वीटभट्टीवरील मुलांसाठीच्या शाळा असे प्रयोग शासनाने केले परंतु आपण जो प्रयोग करत आहात तो शाळेचा नसून त्या मुलांसाठीच शिकण्याचा प्रयोग आहे आणि हा लेख वाचल्यानंतर आपल्या मनात जे विचार आला खरेच अनवट वाट या शब्दाला साजेसा कदाचित अनवट वाट अशीच असेल का? कदाचित हळू ही सगळीच मुले नव्हे कुटुंब ही भट्टी सोडून जातील परंतु आपण केलेला प्रयोग आणि आपण त्यांच्या सोबत घालवलेले क्षण विविध आलेले अनुभव हे शिक्षण शास्त्राच्या दृष्टीने आणि राज्यातील शिक्षणावर काम करणाऱ्या आमच्यासारख्या शिक्षकांना ही अनवट वाट म्हणजे एक प्रेरणादायी वाट आणि मार्गदर्शक वाट ठरणार आहे. म्हणून आपण केलेले हे कार्य निश्चितच निष्काम कर्मयोग आहे. तो येणाऱ्या काळामध्ये एक मार्गदर्शक म्हणून ठरेल. आणि या लेखांमध्ये एक आणखी सुद्धा मनाला भावलेली गोष्ट म्हणजे मी शिक्षक म्हणून किती संयमी असले पाहिजे कारण ज्यावेळी माझा इगो दुखावला जातो त्यावेळी मी वेगळाच विचार करत असतो आणि मूळ कार्यापासून परावृत्त होत असते परंतु आपण तसे न करता त्यावर काय केले त्याचे यश काय हे या ठिकाणी लक्षात आले.
  आणि ज्या प्रमाणे एखाद्या खडतर वाटेचा शोध लावताना एखाद्याला खूप मेहनत घ्यावी लागते परंतु येणाऱ्या पुढील वाटसरूला ती वाट सहज आणि सुलभ होते त्याचप्रमाणे आम्ही शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या सर्वच शिक्षण प्रेमींना ही वाट आपण सुलभ करून द्याल अशी आशा बाळगतो आणि……

 5. नमस्कार! तुमचा प्रयोग खरच खूप सुंदर आहे.. 2 वर्षांपुर्रवी मी सुद्धा वीटभट्टी कामगारांच्या मुलांना शिकवायला जायचे.. काही हुषार मुले होती ज्यांना शिकण्यात खरच रस होता.. पण खुप सांगून सुध्दा जेव्हा ती इथून बाहेर गेली तेव्हा कुणीही नव्या जागेचा पत्ता दिला नाही.. काहीतरी करता आले असते..

 6. मुलांची आवड व त्यांचे भावविश्व समजून घेऊन त्यांना शिकतं करणं खूप आव्हानात्मक असतं . आपण निवडलेली अनवट वाट आम्हालाही खूप काही शिकवत आहे…..

 7. याची फळं तुमच्या सहवासात आलेल्या मुलांना केव्हा ना केव्हा, कुठे ना कुठे तरी आणि कोणत्या तरी रुपात नक्की मिळणार आहेत. फळं तुम्हाला दिसणार नाहीत कदाचित, पण मुलांना याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. बी पेरलय, उगवल्याशिवाय रहाणार नाही

  अथक आणि सतत

 8. स्वातीताई,
  पत्ता ने देण्याचे काही कारण असू शकते. कारण मी काम करत होते तेव्हा पहिल्या ठिकाणी तर मला फार अडचण आली नाही. पण दुसऱ्या वर्षी आम्ही भिंवडीच्या परिसरात जाणार आहेत, तिथे पण येशील का तू असा प्रश्न मला विचारला आणि मी हो म्हणाल्यावर आपल्या बरोबर असणाऱ्या लोकांचे मोबाईल नंबर, आणि आम्ही कोणत्या परिसरात चाललो हे तीन चार लोकांनी एकत्र येऊन सांगितले; आणि माझे काम सोपे झाले.

  सर,
  या मुलांचे संपूर्ण आयुष्यच असे अस्थिर असल्याने असे चढउतार येणारच……
  अजून एक या प्रकारच्या मुलांना शिकविण्याची संधी आपल्या आयुष्यात येऊ शकेल. पण या मुलांच्या आयुष्यात असं कोणीतरी शिकवलं होतं हा अनुभव मिळणे फारच कमी असेल नाही का.

 9. नेहमीपेक्षा वेगळा झाला आहे तुमचा लेख. एरवी तुम्ही सहज बोलता, मधेच एखादी फिरकी घेता तसं. मजा आली वाचायला.

  माझ्या जुन्या आठवणीही जाग्या झाल्या. सहसा आपण सहेतुकच भेटतो मुलांना. प्रत्येक भेटीचं एक ठरलेलं उद्दिष्ट. ते साध्य होण्यात अडचणी दिसायला लागल्या की येणारी अस्वस्थता, निराशा. आपल्यासाठी अपरिहार्य असतात या गोष्टी पण मुलांच्या गावीही नसतात. समोरासमोर असूनही दोन वेगवेगळ्या प्रतलांवर किंवा जगात असल्यासारखं. तुम्ही मात्र साक्षीभावानं बघितलं आहे या अनुभवाकडे.

 10. नीलेश सर, ही अनवट वाट ह्या मुलांसाठी अगदीच खडतर आहे. सातत्याने होणारे स्थलांतर, असुरक्षितता ह्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून कायम दूर राहिली आहेत. ज्या मुलांसोबत आज आपण काम करताय ती मुलं पुढल्या वर्षी नेमक्या कोणत्या गावी असतील हे त्यांनाही ठाऊक नसावे. जगण्याच्या संघर्षात शिक्षणाबरोबरच आपलं बालपण हरवून बसलेली मुलं त्यापरिस्थितीतही आपल्या जीवनात आनंद शोधत असतात.
  आपण त्या मुलांसाठी केलेले शैक्षणिक प्रयोग कथित शिक्षणाच्या भिंती मोडून मुक्तपणे आपल्या जीवन व्यवहाराशी जोडलेले शिक्षण मिळाल्याने निश्चितपणे मुलांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण झाली असेल. आपल्या प्रयोगांतून अशा परिघाबाहेरच्या मुलांकरिता नवी शैक्षणिक रचना निर्माण होण्यास, धोरणात्मक बदल होण्यास निश्चित मदत होईल. आपल्या ह्या अनवट वाटेस अनेकानेक शुभेच्छा!

 11. निलेशजी छान झालाय लेख..
  मला वाटतं आपत्परभावाने काम करताना प्रत्येकाला निष्काम कर्मयोगाची एकेक पायरी वर चढायला लागते.. पण तुमच्या अनुभवात त्या क्षमतेचीही कसोटी लागली… निलेशजी तुम्ही हे खूपच सहजतेने मांडले …

Leave a Reply

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: