विटा मोजणे हा आमच्या भट्टीवरील वर्गातील महत्त्वाचा उपक्रम आहे. या एकाच उपक्रमाच्या आधारे मुलांनी गणितात बरीच प्रगती केली आहे. मजुरीचा हिशेब ठेवण्यासाठी मुलांच्या पालकांना विटा मोजाव्याच लागतात. म्हणूनच विटा मोजणे हे या मुलांसाठी अत्यंत अर्थपूर्ण काम आहे. दुसरी एक बाब म्हणजे विटा मोजण्यासाठी एका जागी बसायची गरज नसते. इकडे तिकडे फिरून, धावत पळत हे काम करायचे असते म्हणून ते या मुलांच्या सहज वृत्तीला चांगले मानवते. त्यामुळे विटा मोजण्यासाठी सगळ्यांचीच तयारी असते. जरा बसून, पुस्तक वगैरे वाचून कंटाळा आलाय असे लक्षात आले की मी, “विटा मोजू या का?” असे विचारतो आणि मग सगळ्यांमध्ये एकदम उत्साह संचारतो.
सुरुवातीला विटा मोजताना मुले अगदी एकेक वीट मोजायची. आता मात्र दोनाच्या, चाराच्या , पंचवीसच्या आणि शंभराच्या टप्प्यांनी मोजण्यावर मुलांनी चांगलेच प्रभुत्त्व मिळवले आहे. यालाही एक कारण आहे. २५ विटांचा एक घोडा असतो. या घोड्यात दोनाचे बारा थर आणि वर एक वीट अशी रचना असते. या घोड्यातील विटा आता मुले २ च्या टप्प्यात मोजतात. ५५ विटांच्या घोड्यात ४ विटांचा एक थर असे १३ थर आणि वर ३ विटा अशी रचना असते. या रचनांचा आधार घेऊन मुले मोजणी करतात. मोजणी करताना ते आपापले डावपेचही वापरतात. ५५ विटांच्या तीन घोड्यांत एकूण किती विटा असतील याचे उत्तर राहुलने कसे दिले आहे ते पाहा.
आता मुलांना अजून थोडे पुढे न्यावे असे मी आणि किशोरने ठरवले. आज भट्टीवरील आमचा वर्ग पाहायला आमचा मित्र अरुण आला होता. तो स्वतःही शिक्षकच आहे. त्यामुळे तोही शिकवण्यात सहभागी झाला. त्याने आमच्या या प्रयत्नांच्या सविस्तर नोंदीही घेतल्या. अमितच्या घरासमोर कच्च्या विटांचे घोडे रचलेले होते. या घोड्यांसोबत आमचा आमचा गणिताचा तास सुरू झाला. अमितचा सोबती राहुलही त्याच्याबरोबर आला. त्यांच्यात आणि माझ्यात झालेला संवाद काहीसा असा:
मी : एका घोड्यात किती विटा?’
अमित : पंचवीस.
मी : मग या दोन घोड्यांत किती विटा?
यावर अमित बराच वेळ विचार करत होता काहीतरी पुटपुटत बोटांची हालचाल करत होता. शेवटी अरुणचा पेशन्स संपला आणि त्याने न रहावून अमितला मध्येच टोकले.
अरुण : या बाजूच्या घोडीत किती विटा रे?
अमित : पंचवीस
अरुण : मग आता सांग ना या दोन घोड्यात किती विटा ते ?
अरुणने असे म्हणताच अमितने एक एक वीट मोजायला सुरुवात केली. आता अरुणला अगदीच राहावेना. त्याने अमितच्या लक्षात आणून दिले की 4 च्या टप्प्याने मोजले तर विटा पटकन मोजून होतील. अमितनेही तसे करून 50 विटा मोजल्या. मी हसून अरुणकडे पाहिले. त्याला जाणवले की अशी घाई करायची काही गरज नव्हती. अमितला एकेक करून विटा मोजून दिल्या असत्या व नंतर चारच्या टप्प्यातील मोजणीने काम कसे पटकन होते हे सांगितले असते तरी चालले असते. मुलांच्या विचार प्रक्रियेत शक्यतो अडथळा आणायचा नाही हे ऐकायला साधे वाटणारे तत्त्व शिक्षक म्हणून काम करताना पाळणे किती अवघड बनते हे आम्हा सर्वांनाच जाणवले. मग पुढील संवादाची सूत्रे मी माझ्या हातात घेतली.
मी : दोन घोड्यात 50 विटा तर मग या चार घोड्यात किती असतील?
अमित : शंभर (हे मात्र त्याने चटकन सांगितले)
मी : मग या पूर्ण हारोलीत किती विटा असतील रे? (‘हारोली’ म्हणजे विटांच्या घोड्यांची रांग), मी राहुल आणि अमित यांना पुढे खेचायचे ठरवले.
आता दोघांनी मिळून विटांच्या घोड्यांना हात लावत मोजायला सुरुवात केली. ‘शंभर न शंभर मिलून दोनशे न शंभर मिलून तीनशे…..’ अशी त्यांची मोजणी सुरू झाली. पण मधेच एखादा घोडा मोजायला विसरायचे किंवा एकच घोडा दोनदा मोजायचे. चूक झालेली कळली की मग परत पहिल्यापासून मोजणी सुरू करायचे. त्यांची ही धडपड पाहून मी एक युक्ती सुचवली. 100 विटा मोजून झाल्या की त्या घोड्याला एक काडीचा तुकडा लावायचा. ही युक्ती चांगलीच कामी आली आणि अमित व राहुल भराभर विटा मोजायला लागले.
मोजता मोजता राहुल म्हणाला, ‘दहाशे’. अरुणला त्याचे दहाशे म्हणणे जरा खटकले. त्याने विचारले, “दहाशे म्हणजे किती?” यावर राहुल जरा गोंधळला. मी मध्ये पडून त्याला मोजणी पुढे चालू ठेवायला सांगितली. अरुणच्याही लक्षात आले की हजारच म्हटले पाहिजे हा आग्रह इथे कामाचा नाही; त्याने मुलांच्या मोजणीत व्यत्यय येऊ शकतो. मुलांचे एका हारोलीत ‘बाराशे विटा’ इथपर्यंत मोजून झाले. आता मी त्यांना पुढचे आव्हान द्यायचे ठरवले.

मी विचारले, “आता मला सांगा ह्या सगळ्या हारोलीत किती विटा असतील?” मी हा प्रश्न विचारताच दोघेही त्या विटांच्या घोड्यावर चढून बसले आणि मोजू लागले. आता विटा मोजताना मात्र दोघांनीही बरेच डावपेच वापरले. उदाहरणार्थ ३६०० विटांत १२०० विटा मिळवायची वेळ आली तेव्हा अमित म्हणाला,
“छत्तीसशे ना बाराशे मिलवायचे ना? मग छत्तीसशे ना दहाशे झाले…… शेचालीसशे आनि दोनशे मिलवंल का झाले अठ्ठेचालीसशे !” हे आणि असे बरेच डावपेच वापरून दोघेही ‘सात हारोलीत चौऱ्याऐंशीशे विटा’ इथपर्यंत पोचले व खाली उतरले.
आता मी ही सगळी मोजणी एका तक्त्याच्या रूपात त्यांच्यासमोर मांडायचे ठरवले. हाताशी लिहायला काही नव्हते म्हणून तिथेच धुळीवर हारोल्यांची संख्या आणि त्यांच्यातल्या विटांची संख्या यांचा एक तक्ता मुलांच्या मदतीने बनवला. तक्ता बनवाताना कधी दोघे मनातल्या मनात हिशेब करून उत्तर देत होते तर कधी उठून प्रत्यक्ष हारोल्यांकडे बघत आकडेमोड करत होते. हा तक्ता बनवताना ते मूळ मोजणीच्या प्रक्रियेतून पुन्हा एकदा गेले. पण या वेळी बऱ्याच वेगाने.

या मुलांसोबत काम करताना जाणवलेली एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना जाणवणारी संख्यानामांची अडचण. मराठी आणि बऱ्याच उत्तर भारतीय भाषांत संख्यानामे थोडी विचित्र आहेत. या मुलांना ८० नी ४ असे सांगणे सहज जमते. मात्र चौंऱ्यांशी असे संख्यानाम विचारले की गोंधळायला होते. खरे तर आपण चौऱ्यांशी ला ऐंशीचार किंवा पंचाहत्तरला सत्तरपाच अशी नावे देऊ शकतो. पण तसे संकेत मराठीत रूढ नाहीत हा प्रश्न आहे. सात हारोल्यांत ८४०० विटा आहेत हे मोजणारे राहुल आणि अमित १०० पर्यंतच्या संख्यानामांत मात्र अजूनही घोटाळे करतात.
प्राध्यापक मनोहर राईलकर यांनी या बाबत एक सविस्तर लेख लिहिला आहे. मराठी व एकूणच उत्तर भारतातील भाषांवरील संस्कृतच्या प्रभावामुळे १०० पर्यंतच्या संख्यांची नावे किचकट झाली आहेत. ज्या घरांमध्ये पाठांतराची, दैनंदिन जीवनात संख्यावापराची परंपरा असते अशा मुलांना ही अडचण विशेष जाणवत नाही. मात्र भट्टीवरच्या आमच्या मुलांनी यावर प्रावीण्य मिळवावे म्हणून आम्हाला बरीच मेहनत करावी लागणार असे दिसते आहे. पण आम्ही जिथून सुरुवात केली होती ते लक्षात घेता बरीच मजल मारली आहे असे म्हणायला हरकत नाही. ही प्रगती मला आणि किशोरला सुखावणारी आहे हे निश्चित.
अत्यंत धिराचे काम आहे,खूप कसब वापरावे लागणार.
,मला वाटते रोज जे एक उद्दिष्ट घेऊन तुम्ही लोक शिकवायला जाता ते उद्दिष्ट पण क्रमवार लिहून ठेवावे जेणेकरूम पुढे या मुलांचा अभ्यासक्रम तयार करण्यात मदत होईल.
LikeLiked by 1 person
कृतिका तू म्हणतेस इतके नियोजन अजून साधतच नाहीये सगळ्या परिस्थितीशी झगडताना बरचसे काम उत्स्फुर्तपणे करावे लागते आहे
तरी ही प्रयत्न करतो. अत्यंत उपयुक्त सूचना केल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
LikeLike
फारच धीराचे आणि दमाचे काम आहे.पुढे कसे आणि कधी ,किती जायचे म्हणजे मुलांचा रस आणि आत्मविश्वास कायम टिकवता येईल ,हे त्या त्या वेळी शिक्षकांच्या लक्षात येणे कौशल्याचे कार्य आहे. हे आपण कसे ठरवता याचा लेखात शेवटी समावेश केला तर आपल्या विचारप्रक्रियेचा अंदाज येईल.धन्यवाद
LikeLiked by 1 person
पुढच्या लेखात प्रयत्न करून पाहतो. सध्या पोस्टची लांबी वाढत चालली आहे आणि जास्त विश्लेषण केले तर फार तांत्रिक होईल अशी भीती वाटते आहे. पण पाहतो जमतय का. धन्यवाद !
LikeLike
नमस्कार
अनवट वाट या सत्रातील प्रत्येक लेख वाचताना आपले अनुभव वाचत असतांना एक वेगळा अनुभव आम्ही सुद्धा घेत आहोत आज ज्यावेळी प्रगती हा लेख वाचला त्यावेळी एक आणखी गोष्ट अशी लक्षात आली की मुलांपर्यंत गणित कसे जावे म्हणजेच मी विचार एका अंगाने करतो आणि शाळेत शिकवले जाणारे गणित हे वेगळेच जसे त्या मुलाने तीन घोड यातील किती विटा हा प्रश्न विचारल्यानंतर जी प्रोसेस त्याच्या मनामध्ये तयार झाली कदाचित मी तुम्ही आपण सुद्धा व्यवहारात विचार करत असतांना याच पद्धतीचा विचार करत असतो परंतु शाळेत जावे असा प्रश्न मला विचारला जातो त्या वेळी उत्तर मात्र मला वेगळे अपेक्षित असते पद्धती वेगळी अपेक्षित असते आपण त्या मुलाने केलेला विचार जर लक्षात घेतला तर मी सुद्धा बाजारात गेल्यानंतर किंवा काही व्यवहार करत असताना याच पद्धतीने गणिती क्रिया करत असतात म्हणजेच ह्या मुलांच्या बाबतीत ते जो विचार करतात तो जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे आणि त्यालाच पुढे घेऊन जर गेलो तर अशा पद्धतीचा बदल आपल्याला दिसून येतो हे लक्षात आले.
तसेच आपण जो संयम या ठिकाणी दाखवता हा संयमच कदाचित शिक्षकांच्या अध्यापन पद्धती मध्ये अत्यंत मोलाचा आहे कारण पुढे उदाहरणात आल्याप्रमाणे अरुण सरांनी केलेली घाई अशीच काही कुठेतरी आम्हीसुद्धा करत असतो आणि त्यामुळे मुलांची वेगळा विचार करण्याची वृत्ती ही कुठेतरी थांबवली जाते आणि मूल करत असलेला विचार हा दडपला जातो म्हणून आपल्यावरील लेखांमध्ये आणखी सुद्धा एक महत्वाची बाब या ठिकाणी निदर्शनास आली आहे ती म्हणजे इंग्रजी अंक मुलांना सहज येतात परंतु मराठी अंक येण्यास खूप मोठा अडथळा येतो एवढेच काय १९,२९,३९,४९,५९,६९,७९,८९, हे अंक जर आमच्या सारख्या मोठ्या व्यक्तीला सुद्धा वेगात सांगितले गेले तर आम्ही सुद्धा काही सेकंद थांबून मग तो अंक लिहितो. मग असे असताना मुलांनी एकवीस म्हणण्याऐवजी त्याने वीस एक म्हटले तर काय बिघडले हा विचार आम्ही स्वीकारणे गरजेचे आहे हे सुद्धा लक्षात येते आणि असाच बदल कुठेतरी पाठ्यपुस्तकात करण्याचा प्रयत्न होत आहे आणि तो आम्ही का स्वीकारावा हे यावरील लेखांमधून लगेच लक्षात येते कारण मुलांना अंक लक्षात ठेवण्यासाठी काय सहज आहे मुलं विचार कसा करतात हा विचार आमच्यासारखे शिक्षकांनी करणे गरजेचे आहे.
आपण केलेल्या सातत्याने प्रयत्नातून व मुख्य म्हणजे संयमाच्या सहाय्याने झालेले प्रयत्न याचे निश्चित हे फळ आहे आणि ह्या मुलांसाठी एक वेगळा विचार करण्याची गरज आहे हे या लेखातून लक्षात येते. धन्यवाद
LikeLike
गोष्टरंग च्या सादरीकरणाच्या वेळी खुप मेहनतीने या लोकांना आणि तिथल्या मुलांना एकत्र केले…नाटक बघायला या, चला चला ,फक्त १५ मि.वेळ काढा असं म्हणत किशोर सर अत्यंत तळमळीने भट्टीवरील लोकांना नाटक बघण्यासाठी बोलवत होते. मी मात्र फक्त त्यांना बघत होतो…विचार करत होतो, कारण मी आत्तापर्यंत मुल शाळेत येत नाही म्हणुन पालकांना शाळेत बोलावून दाखला घेऊन जा म्हणणारे शिक्षक बघितले होते.पण इथे तर शिक्षक च या मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी धडपडताना बघत होतो.त्यांच्या डोळ्यात एका शिक्षकापेक्षा पालक म्हणुन असणारे भाव स्पष्ट दिसत होते…. तेव्हा विचार केला कि कशी येणार हि मुलं शाळेत? पण हा विचार करत असतांना मी तिथे असणारा तुमचा गणिताचा वर्ग बघु शकलो नाही..आज लेख वाचताना लक्षात आलं कि मुलं आणि शाळा तिथेच होती फक्त हि शाळा शोधणा-या एका शिक्षकाची गरज होती…..
LikeLike
निलेश
तुमचं काम खूपच छान चालु आहे. तुझ्या लेखामुळे आमच्याही ज्ञानात भर पडतेय. वीटभट्टीवरील वातावरण डोळ्या पुढे उभं राहातयं. छान लिहीतोय तू. शिक्षकांनी खूप धीराने शिकवावे लागते. मुलांकडून हवे ते उत्तर काढून घेण्यासाठी क्लूप्त्या वापराव्याच लागतात..
LikeLike
Ek shanka aahe. Kadachit mi vachayache rahile asel.
Mule pade mhantat ka?
LikeLike
गेल्या काही काही आठवड्यात काही जणांची गाडी 6 च्या पढ्या पर्यंत गेली आहे. पण अधून मधून विसरतात ही. पंचे, त्रिक, साती असले शब्द अजूनही नीट लक्षात राहत नाहीत. पाढे एकत्र बसून मोठ्याने म्हणत राहिले तर जाता येता पाठ होतात पण असे वातावरण भट्टीवर नक्कीच नाही. एकटे बसून जमेल तेव्हडे करण्याचा प्रयत्न काही जण करतात पण बऱ्याच जणांना त्यात अजिबात रस वाटत नाही.
LikeLiked by 1 person
Tumcha upakram khoop stutya. Shubechha.
Mage mhanje don dashka purvi amhi (mi ani majha navra) eka zopadpattiteel shala dattak ghevoon ganita sathi kahi prayatna kelet.
mulanche ani shala mastaranche mind set badalane ha sarvat motha prashnna hota.
Tumhala shubechha.
LikeLike
चांगले होते आहे लेखन… यातून मलाही लिहायची स्फुर्ती निळतो आहे…
LikeLike