आम्ही वाचतो.. लिहितो…

गेल्या काही दिवसांत मुलांनी वाचन-लेखनाच्या बाबतीत बरीच मजल गाठली आहे. या बाबतीत काही काम आम्ही नियोजनपूर्वक केले तर काही उत्स्फूर्तपणे. वाचायला लिहायला शिकवताना काही बाबी फार कळीच्या ठरतात. एक तर मुलांच्या हातात पुस्तके पोहचायला हवीत. दुसरे म्हणजे चांगल्या वाचनाचा नमुना मुलांच्यासमोर सतत रहायला हवा. आणि तिसरे म्हणजे मुले मोठ्याने वाचत असताना त्यांना योग्य ती मदत करायला हवी.

गेल्या काही दिवसांत  मी आणि किशोरने मिळून जवळ जवळ १५ पुस्तके मुलांना वाचून दाखवली. या वाचनादरम्यान प्रत्येक पुस्तकाचे लेखक, चित्रकार, कथेतील पात्रे याबाबत भरपूर चर्चा मुलांसोबत करत होतो. खरे तर तयारी करण्याच्या निमित्ताने आम्ही एखादे पुस्तक आधी दोनदा तरी वाचलेले असायचे. पण मुलांसमोर वाचताना मात्र आम्ही जणू काही ‘प्रथमच ते पुस्तक वाचतो आहोत’ अशाप्रकारे वाचून दाखवायचो. पुस्तकात पुढे काय होईल या बाबत मुलांसोबत आम्हीही आपापले अंदाज सांगयचो. एखाद्या ठिकाणी अर्थ लावायला कठीण असा काही भाग आला तर थांबून अर्थ कसा लावला जातो हे करून दाखवायचो. यातील काही पुस्तके एखाद-दोन दिवसांत  संपणारी तर काही चांगली आठवडाभर चालणारी होती.

का का असे प्रश्न विचारून भंडावून सोडणारी महाश्वेता देवींची मोयना मुलांना फारच भावली.

महाश्वेता देवींची ‘का का कुमारी’ किंवा ‘इतवा मुंडाने लढाई जिंकली’ यासारखी पुस्तके भट्टीवरल्या मुलांना फार भावली. ऐतवारी (रविवारी) जन्माला आलेला म्हणून कथा नायकाचे नाव इतवा. यासारख्या बाबी मुलांना फारच भावल्या. मंगल्या, बुधी,  गुऱ्या, शिणवारी अशी वारांवरून नावे ठेवण्याची पद्धत या मुलांच्या आई वडिलांच्या काळात अगदीच रूढ होती. या चर्चेत  केवळ वारांवरूनच नाही तर महिन्यावरून चैती, सरावनी अशी नावे ठेवली जातत असे मुलांच्या लक्षात आले. याबाबत किशोरने मला त्याच्या एका आदिवासी मित्राची आठवण सांगितली. त्याचा हा मित्र डी. एड्. च्या वर्गातला. त्याचे नाव तुळश्या झिपऱ्या राठोड. डी. एड्. ला आल्यावर एका प्राध्यापिकांनी त्याचे नाव तुळशीराम झिपरू राठोड असे केले. हे बदललेले नाव कागदोपत्री आणायला त्याला  बरीच उठाठेव करायला लागली. तसे बघायला गेले तर तुळश्या आणि तुळशीराम, किंवा झिपऱ्या आणि झिपरू यात असा काय फरक आहे? माझ्या मते, बोलण्याची एक लकब सर्वसामान्यांची तर दुसरी अभिजनांची. पण अभिजन सर्वसामान्यांच्या लकबीला कनिष्ठ मानतात आणि म्हणून त्यांना ती त्याज्य वाटते. किशोरच्या मित्राचे नाव बदलणाऱ्या प्राध्यापिकांनी अगदी सद्भावनेने केलेल्या या लहानशा बाबीची मुळे मात्र अभिजनांच्या उच्चगंडाशी जोडलेली आहेत असेच म्हटले पाहिजे. बहिष्कृत समाजातील मुलांसोबत काम करताना आपल्याकडूनही अशा काही चुका घडतील याची धास्ती मला सतत वाटते. चांगल्या हेतूने केलेल्या कृत्याला ही दुसरी बाजू असू शकते याची जाणीव अशावेळी सतत ठेवावी लागते. शिक्षकाचे काम नीट करायचे म्हटले, तर तारेवरच्या कसरतीसारखे आहे, हे पदोपदी जाणवते. 

मुलांना वाचून दाखवण्यासोबत त्यांना स्वतःला वाचायला देणेही गरजेचे होते. ओघवते वाचता यावे यासाठी आम्ही संवाद हा लेखनप्रकार वाचायला द्यायचे ठरवले. एकतर संवादाची भाषा बोलण्याच्या भाषेला तुलनेने जवळची असते. दुसरे म्हणजे संवादात दोन जण बोलत असतील तर वाचनही दोन जणांना भूमिका घेऊन करता येते. त्यामुळे एकट्याने बसून वाचण्याच्या ताणातून मुलांची थोडी सुटका होते. मुले आलटून पालटून भूमिका घेतात आणि त्यामुळे संवादातला वेगवेगळा भाग त्यांना वाचायला मिळतो. म्हणून मी मुलांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित विषयांवर काही संवाद लिहिले. यात बोरे पिकल्यावर खायला जाणाऱ्या मुलांच्या गप्पा, पाहुण्यांनी आणलेल्या खाऊ बाबत झालेले बोलणे, वीटभट्टीवरच्या एखाद्या कामाबाबत झालेले बोलणे असे अनेक विषय होते. प्रत्येक संवादात दोन किंवा तीनच पात्रे असतील हे आम्ही कटाक्षाने पाहिले होते. संवादाची भाषा कधी मुलांच्या घरची, कधी शाळेची तर कधी संमिश्र अशी ठेवली होती.

यातील काही  लहान लहान संवाद आम्ही प्रथम मुलांना ओघवते वाचून दाखवले. कधी कधी मी आणि किशोर वेगवेगळ्या भूमिका घेऊन संवाद वाचायचो तर कधी पूर्ण संवाद मी एकटाच वाचायचो. या वाचून दाखवण्यानंतर संवादात किती पात्रे आहेत, त्यांचे एकमेकांशी काय नाते असेल,  संवाद कोणत्या ठिकाणी झाला असेल, त्यात नेमके कशाविषयी बोलले गेले आहे या बाबात आम्ही मुलांना प्रश्न विचारायचो. यानंतर हळूहळू मुलांना संवाद वाचून न दाखवता त्यांचे त्यांना वाचून समजून घ्यायला दिले. अर्थातच या पहिल्या वाचनाचा हेतू मजकूर समजून घेणे हा होता. मजकूर समजून घेण्यापर्यंतचा हा भाग आम्ही सर्व मुलांना एकत्र घेऊनच करायचो.

यानंतर मुलांच्या जोड्या किंवा लहान गट करून मुलांना एकेक संवाद वाचायला सांगायचो. मुले गटात किंवा जोडीने वाचायला बसली म्हणजे आम्ही आळीपाळीने गटापाशी जाऊन मुलांना मदत करायचो. मुले वाचत असताना एखाद्या ठिकाणी अडली तर आपण ते वाक्य वाचून दाखवणे, वाचताना जर वाक्य चुकीच्या जागी तोडले तर अर्थ लागायला अडचण कशी येते हे लक्षात आणून देणे अशा स्वरूपाची ही मदत होती. या सगळ्याचा सुपरिणाम हळू हळू दिसायला  लागला आहे. मुले आता प्रमाणभाषेतील संवादही बऱ्यापैकी वाचू लागली आहेत.

राधी आणि चंद्रिका या दोघींनी  ‘मला काय ? ताईला काय?” हा संवाद कसा वाचला ते  पुढील व्हिडिओत पाहा.

मुलांना ओघवते वाचता यावे या साठी संवाद-वाचन खूपच उपयुक्त ठरते

या व्हिडिओवरून एक बाब नक्कीच लक्षात येते की संवादवाचनासारख्या उपक्रमातून  मुलांना ओघवते आणि भावभावनांसहित वाचायला बरीच मदत मिळते. आता हे लहान लहान संवाद वाचून झाल्यावर पुढचे लक्ष्य एखादे लहानसे नाटुकले लिहून मुलांना त्याचे प्रकटवाचन करायला देणे हे ठरवले आहे. या सगळ्यातून मुलांची वाचनाची गती जरा वाढली की इतर लेखन प्रकार वाचण्याकडे वळायचे असे सध्याचे नियोजन आहे. पाहू या कसे जमते ते.

परवा भट्टीवरून निघताना एक हृद्य गोष्ट घडली. काम उरकून आम्ही सगळे गाडीत बसत होतो. इतक्यात अश्विनी  नावाची एक मुलगी हाका मारत धावत धावत गाडीपाशी आली. तिने गाडीच्या खिडकीतून एक चिठ्ठी माझ्या हातात दिली आणि म्हणाली ‘घरां जान वाच.’ आणि ती आली तशी पळत पळत खेळायला निघून गेली. दुसरीतल्या  अश्विनीला अजून नीटसे लिहिता येत नाही. पण ती भट्टीवरच्या आमच्या कार्यक्रमात बरीच नियमितपणे येते. तिने काय लिहिले आहे याची मला उत्सुकता होती.

भेट …

अश्विनीला काय म्हणायचे आहे हे तिच्याबरोबर रोज काम न करणाऱ्या व्यक्तीला कदाचित कळणार नाही. पण मला आणि किशोरला तिचे म्हणणे अगदी पहिल्या वाचण्यात लक्षात आले.

सर थॅंक यू. तुम्ही आमच्यासाठी

 खूप करता. पण आम्ही तुमच्यासाठी

 काहीच करत नाही. फक्त

अभ्यास दाखवतो. पण असं नाही.

मी तुमच्यासाठी बघा काय केले

आहे.  थॅंक यू सर.

 धन्यवाद. सगळ्या सरांचे आभार

 मानते. आमच्यासाठी काही

 नाही.

या पत्राच्या शेवटी काढलेले फूल, झाडे आणि पत्राभोवतीची फुलांची नक्षी ही अश्विनीकडून आम्हाला मिळालेली भेट होती. आम्ही तिच्यासाठी खूप काहीतरी करतो म्हणून तिने आमच्यासाठी केलेले काहीतरी!

अश्विनीची अभिव्यक्ती प्रमाण भाषेतील नाही. तिची वाक्यरचना विस्कळीत आहे. जसे मनात विचार आले तसे ते कागदावर उतरवायचा प्रयत्न तिने केला आहे. लिखाणाचे फारसे नियोजन केलेले नाही. पण म्हणून काय झाले? आपल्या भावना लिहून दुसऱ्यापर्यंत पोहचवता येतात हे तिला नेमके उमगले आहे. सरांसाठी काहीतर करायची तिची भावना अगदी अस्सल आहे. अशावेळी तिच्या लिखाणातल्या चुका काढत बसणे अगदी करंटेपणाचे ठरेल.

अश्विनीचे आई-वडील उत्तर प्रदेशातले. ते म्हशी राखतात. त्यांचा तबेला भट्टीला अगदी लागून आहे. अश्विनी आणि तिच्या चार बहिणी भट्टीवरच्या मुलांसोबतच वाढतात. जून महिन्यात अश्विनी किशोरच्या वर्गात आली तेव्हा तिला १० पर्यंतच्या मोजणीशिवाय काही येत नव्हते. अश्विनीचे लिखाण वाचून मला अगदी भरून आले. तिचे पत्र वाचून,  मी आणि किशोरने आरंभलेला खडकावर पेरणी करण्याचा उद्योग अगदीच निरर्थक नाही, याची खात्री आम्हाला पटली. अनेकांनी आमच्या या खटाटोपातून काय साध्य होणार असे स्पष्टच विचारले देखील. या उपक्रमाचे भवितव्य काय अशी रास्त चिंताही काही जणांना सतावते आहे. माझ्या मनात आले, अशा  विचारी जगाला काय म्हणायचे असेल ते म्हणो. पण या मुलांसाठी इथे येत राहिले पाहिजे. नाही, मुलांसाठी नाही, तर स्वतःसाठी. असे आनंदाचे क्षण वेचण्यासाठी.

7 thoughts on “आम्ही वाचतो.. लिहितो…

Add yours

 1. सुंदर लेख आहे. भट्टी वरील मुलाना शिकवण्याचे अवघड काम तुम्ही करत आहात.

 2. सर अभिनंदन मुलांकडून तुमच्या कामाची पावती मिळाली

 3. आपल्याला जो आनंद आज मिळाला तो खूप मोठ्ठा आहे.
  या अस्थिर जीवनात आपल्यासाठी कोणीतरी धडपडतय ही जाणीव त्यांना झाली त्यामुळं भविष्यात कुठंतरी आपल्या आई वडिलांच्या सारखे आपले आयुष्य अस्थिर राहणार नाहीत यासाठी हे मुलं प्रयत्न करतील असं वाटतंय आणि अर्थातच तुम्ही त्यांना इतक्या सहज सोडणार नाही हे माहितीच आहे.
  मागे आपण म्हंटल्याप्रमाणे आता यांच्यासाठी निवासी शाळेची व्यवस्था झाली तर ही पिढी मुख्य प्रवाहात नक्की येईल.
  आज या मुलीच्या भावनेतून इतकं नक्की कळलं की निष्काम कर्मयोगाला फळं नक्की मिळतात.

 4. न मोजता येणारा आनंद आहे. ‘याचसाठी केला होता अट्टहास..’या जातीचा.

  मुलांबरोबर वाचन करण्याचे बारकावे या लेखातून छानच उलगडले आहेत. एरवी अनेकदा पुस्तक वाचून दाखवले जाते किंवा मुलांना वाचायला सांगितले जाते पण वाचता-वाचता मुलांना किती गोष्टींचा, किती प्रकारे विचार करायला उद्युक्त करता येते हे लक्षात आले.

  मुलांना लिहायला देतानाही आपला कशा प्रकारचा वैचारिक home work व्हायला हवा याचाही वस्तुपाठ मिळाला.

 5. नमस्कार
  आज हा लेख वाचताना आपल्याला मिळालेला आनंद आणि आम्हाला सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकवून जाणारा असा हा लेख आहे. या मुलांसोबत काम करत असताना किती बारीक बाबींचा विचार करावा लागतो आणि तो जर त्या पद्धतीने केला तर श निश्‍चित मिळते हे लक्षात येते.
  या लेखात दोन शब्द आले आहे अभिजन आणि सर्वसामान्य किती महत्त्वाचे शब्द आहे कारण आम्ही समाजात वावरत असताना या दोन शब्दांची नेहमी सरमिसळ होत असते आणि त्यात वरचढ ठरतो तो अभिजनांचा शब्द . आणि ज्या ठिकाणी असे घडते त्याठिकाणी सर्वसामान्य विचार करतो नको माझं काही स्वीकारले जात नाही आणि तो या प्रवाहापासून दूर जातो आपण दिलेले उदाहरण हीसुद्धा एक त्याचेच प्रतीक आहे.
  परंतु पुढे गेल्यानंतर या मुलांसोबत वाचन करत असताना किती बारीक बारीक गोष्टींचा विचार करावा लागतो पुस्तकं निवडताना नेमकी त्यांच्या भावविश्वातील पुस्तके त्यांच्या जीवनाशी जुळणारे अनुभव आणि संवाद हे आपण निवडली म्हणजेच मुलांना वाचायला काय आवडते हे जास्त महत्त्वाचे आहे त्यांना वाचायला शिकवत असताना आम्ही वाचायला देतो परंतु आम्हाला जे आवडते आणि मग विचार करतो की मुले वाचनात मागे का आहे? मुलांना वाचायला का आवडत नाही? परंतु आपल्या अनुभवाप्रमाणे जर मला जे आवडते ते वाचायला मिळालं तर निश्चित त्याचे परिणाम चांगले दिसतात.
  पुढे ज्यावेळी अश्विनी चिठ्ठी वाचली त्यावेळी तर निश्चितच आपल्या कामाच्या यशाची पावती जणू मिळाली असे लक्षात येते कारण तिने तिच्या भावना कागदावर उतरवले आणि आपण सुद्धा त्या जशाच्या तसा स्वीकारल्या . यामुळे निश्चितच या मुलांच्या अंधारमय आयुष्यात कुठेतरी ज्ञानाचा दीप पेटवण्याचे कार्य आपल्या हातून घडले आणि आम्हाला सुद्धा यातून एक वेगळी प्रेरणा मिळाली .
  धन्यवाद

 6. खूप सुंदर,अप्रतिम काम चालू आहे.

  वाचन लेखन कसे शिकवावे ह्याचा एक सुंदर प्रत्यक्षिल नमुना तुम्ही समोर ठेवत आहात,
  हे काम वयानुरूप साठी आदर्श आहे.

 7. हा लेख वाचल्यावर मला बहिष्कृत समाजातील मुलांसोबत काम करताना आपल्याकडूनही अशा चुका घडतील याची धास्ती मला सतत वाटत राहते हे वाक्य अनुभवल्या सारखे वाटते. मी याच समाजातील मोठ्या मुलांबरोबर काम करत असताना त्यांच्या रोजच्या जीवनातील घटनांना आपल्या कडून कमी लेखले जाणार नाही याची काळजी सतत काळजी घ्यावी लागते. उदा. दिवाळीला त्यांच्या कडे बनवलेल्या सावल्या भाकरी माझ्या करंज्यान इतक्याच महत्वाच्या आहेत हे लक्षात असायलाच हवेत. नाहीतर शिक्षण होणे अशक्यच आहे.
  खूपच छान उपक्रम आहे.

Leave a Reply

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: