पालक सभा

मुलांची अनियमित उपस्थिती ही आमच्या वीटभट्टीवरील वर्गाची मोठीच समस्या आहे. मुले न येण्याची जी अनेक कारणे आहेत त्यापैकी  एक महत्त्वाचे कारण म्हणजे पालकांना आमच्या या वर्गाचे महत्त्व न वाटणे. चार-पाच तास शाळेत घालवून आल्यावर मुलांनी आता घरकामात थोडा हातभार लावावा अशी काही पालकांची इच्छा आहे, तर काहींना या सगळ्या खटाटोपातून  काही घडणार आहे का, याचीच शंका वाटते. एखादे मूल भट्टीवरच्या आमच्या वर्गात मित्राशी भांडले आणि रडत त्याच्या पालकाकडे गेले तर त्याची समजूत काढून त्याला परत पाठवण्याऐवजी ‘भांडायचे असेल तर जाऊ नकोस’ असाच सल्ला मिळतो. क्वचित एखादा पालक मुलांच्या भांडणाचे कारण देत दुसऱ्या पालकाशी भांडायला येतो. मग हे सारे सावरणे कठीण होऊन बसते. एकूणच कितीही काळजी घेतली तरी आमचा वर्ग पालकांच्या कामात अधेमधे व्यत्यय आणतो असे आम्हाला सारखे जाणवते.

भट्टीवरच्या बऱ्याचशा  पालकांना मुलांनी शिकण्याचे महत्त्व जाणवत असले तरी आयुष्याचा झगडा इतका तीव्र असतो की मुले शिकावीत म्हणून स्वतःहून काही प्रयत्न करणे त्यांना जमत नाही. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाला पालकांनी मदत करायला हवी ही अपेक्षा त्यांच्याकडून कशी करायची, हा आमच्यासमोरचा प्रश्न होता. किशोरने सांगितले की या पालकांपैकी कोणीच शाळेच्या पालकसभेला वगैरे येत नाही. त्यामुळे या पालकांची पालकसभा भट्टीवरच घेऊ या असे मी सुचवले. पण मग प्रश्न पडला की रोज आम्ही जे करतो आहोत ते या पालकांच्या समोरच तर घडते आहे. सभा घेऊन आम्ही वेगळे काय सांगणार आहोत? पालकसभा घ्यावी असे मला आणि किशोरला वाटत होते, पण या सभेत नेमके करायचे काय हा प्रश्न होता. शिवाय अहोरात्र चालणारे आपले काम थांबवून कोणी पालक सभेला येईल का, अशी शंका होतीच.

पालकसभेत काय करावे याचा विचार करता करता मला अचानक हीराताई आठवली. हीराताई लहानपणी भट्टीवरच वाढली. त्यावेळी तिच्या भट्टीवर भोंगाशाळा असायची. हीराताई कधी मधी त्या शाळेत जायची, तर कधी चिखलाची भांडुली बनवत खेळत राहायची. त्यामुळे तिला थोडीफार अक्षर ओळख झाली होती. लग्नानंतर ती आणि तिचा नवरा बाळू दोघेही भट्टीवर जात असत. हीराताईचा मोठा मुलगा शाळेत जाऊ लागला तेव्हा ती त्याला घरी सासऱ्यांच्या सोबत ठेवून भट्टीवर जाऊ लागली. हळूहळू तिची दुसरी मुलगीही शाळेत जाऊ लागली. आता मात्र भट्टीवर जाण्याने मुलांच्या शिकण्यात खंड पडणार हे हीराताईच्या लक्षात येऊ लागले. मग आता भट्टीवर जायचे नाही असा निर्णय हीराताई आणि बाळूने  घेतला. पैसे मिळवण्यासाठी म्हणून हीराताई दारू बनवून विकू लागली. बाळू मजुरीची कामे करू लागला. अधेमधे तो आमच्या संस्थेतील बांधकामावर पाणी मारण्याचे काम करण्यासाठी येई.  काही दिवसांनी बाळू आणि हीराताई आमच्याकडे नियमित कामाला येऊ लागले. त्यांची मुले संस्थेत चालणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होऊ लागली. त्या मुलांचे शालेय शिक्षण आता बऱ्यापैकी मार्गी लागले आहे.

केवळ मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून भट्टीवरचे काम सोडण्यचे धाडस करणारी हीराताई जर पालकांशी बोलली तर त्याचा फायदा होईल अशी कल्पना माझ्या मनात आली. किशोरचेही तेच मत पडले. म्हणून पालक सभेत हीराताईला बोलावायचे ठरवले. तीही तयार झाली. पण तरीही पालक सभेसाठी पालक जमतील का, हा प्रश्न होताच. किशोरने सुचवले की काहीतरी करमणुकीचा कार्यक्रम ठेवला तर पालक येण्याची शक्यता वाढेल. म्हणून मग आमच्या संस्थेत चालणाऱ्या ‘गोष्टरंग’ उपक्रमातील एक नाटुकले सादर करावे असे ठरले. मुलांना महाश्वेता देवींची ‘का का कुमारी’ ही गोष्ट आवडली होतीच; त्याच पुस्तकाचे नाट्यरूपांतर सादर करावे असे नियोजन केले. किशोर पालकसभेच्या आधीच्या दिवशी भोंग्याभोंग्यात जाऊन कार्यक्रमाची कल्पना देऊन आला. तेव्हा बऱ्याच जणांनी यायची तयारी दाखवली. मुलांनाही पालकांना घेऊन यायचे आहे अशी सूचना दिली.

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे गोष्टरंगचा चमू भट्टीवर पोहोचला. त्यांनी आपल्या नाटकाची तयारी सुरू केली. मुले कुतूहलाने गोळा झाली. पण पालकांच्यापैकी कोणीही फिरकले नाही. सगळे आपापल्या कामात गर्क होते. काल मुलांसोबत पाठवलेल्या निरोपाचा, किशोरने जाऊन सांगून येण्याचा फारसा फायदा झालेला दिसला नाही. मग वेशभूषा केलेला गोष्टरंगचा चमू आणि मुले यांनी भट्टीवर एक फेरी मारली. प्रत्येक कोपऱ्यात जाऊन नाटक सुरू होते आहे याची कल्पना दिली. पण तरी लोकांचा निर्णय होईना. हातचे काम टाकून या पोरखेळात जावे की न जावे असा प्रश्न त्यांना पडला असावा. शेवटी शाळेच्या भोंग्याजवळ येऊन गोष्टरंगचे गाणे सुरू केले. मुले ठेका धरून टाळ्या वाजवू लागली. गाण्याचा आवाज कानावर पडल्यावर मात्र एकेक पालक गोळा होऊ लागले. थोड्याच वेळात बहुसंख्य लोक आले, पण आल्यावर पुढे येऊन न बसता नाटक दिसेल अशा बेताने कुठे कुठे उभे राहिले. उभ्या उभ्याच सगळ्यांनी नाटक पाहिले. मग किशोर आणि हीराताई बोलायला उभे राहिले.

किशोरने हीराताईची ओळख करून दिली आणि तिने तिच्या पद्धतीने संवाद साधायला सुरुवात केली. अगदी उत्स्फूर्त अनियोजित संवाद. जे जे जसे जसे मनात येईल तसे तसे हीराताई मुद्दे मांडत होती. तिच्या बोलण्याला पालकांकडून हळूहळू प्रतिसाद मिळत होता.

पालकसभेतील हीराताईचे भाषण

हीराताईने तिच्या भाषणात तिची स्वतःचीच गोष्ट सांगितली. मुलांच्या शिक्षणासाठी तिने घेतलेला भट्टीवर न जाण्याचा निर्णय अवघड कसा होता हेही सांगितले. तसा तो घेणे सगळ्यांनाच शक्य नसले तरी ‘मुलांच्या शाळेकडे लक्ष द्या’ असे कळकळीचे आवाहन केले. या साऱ्याचा काही ना काही परिणाम पालकांवर होईलच अशी आम्हाला आशा वाटते आहे. तिच्या भाषणात तिला स्वतःला वाचायला-लिहायला शिकायची किती तीव्र इच्छा आहे हे तिने बोलून दाखवले. भाषण झाल्यावर मी तिला म्हटले, ‘तुला जर इतके वाचायला-लिहायला शिकावे वाटते, तर रोज तासभर अभ्यासाला येशील का ? मी नाहीतर संस्थेतील इतर कोणीतरी शिकवेल तुला.’  ते ऐकून हीराताई प्रसन्न हसली आणि दुसऱ्या दिवशी आठाच्या ठोक्याला वही पेन्सील घेऊन दारात हजर झाली. हीराताई ज्या चिकाटीने शिकते आहे ते पाहून मला खूपच आश्चर्य वाटते आहे

गेल्या काही दिवसात तिने भलत्याच वेगाने प्रगती केली आहे. आपण रोज ज्या व्यक्तीला भेटतो, जिच्याशी दिवसातून अनेकदा बोलतो, तिची इतकी साधी पण तीव्र इच्छा असू शकेल असे माझ्या कधी डोक्यातच आले नव्हते.  पण हीराच्या निमित्ताने मी मात्र अधिक जागरुक झालो. साक्षरतेवर अहोरात्र चर्चा करणाऱ्या आमच्या संस्थेत हीरा गेली काही वर्षे वावरते आहे. पण तिला लिहायला-वाचायला शिकायची हौस आहे हे आमच्यापैकी कोणाच्याही कधी लक्षात आले नाही याची खंत वाटली. पालकसभेचा भट्टीवरच्या वर्गाला नेमका काय फायदा झाला हे अजून समजलेले नाही. पण आपण अजून बरेच संवेदनशील व्हायला हवे याची जाणीव हीराताईच्या भाषणाने मला करून दिली.

6 thoughts on “पालक सभा

Add yours

  1. शिक्षण म्हणजे काय ह्या प्रश्नाचे उत्तर हिरा ताईकडून घेतले पाहिजे, तिला जे कळलंय ते इतरांना कळेल तेव्हा आपले प्रश्न सुटतील. शिक्षण म्हणजे अनेक वर्षांची मेहनत आहे,त्यातही भविष्य असेल याची ग्वाही नाही,त्यामुळे हातच सोडून पळत्याच्या मागे लागण्याचे धाडस गरीब लोक करू शकत नाही.
    आपण या विषयावर चिंतन सुरू ठेवले पाहिजे.

  2. सर पालक सभेचा नक्कीच फायदा होईल. आणि हिरा ताईच्या भाषणाचा पालकांवर सकारात्मक परिणाम होईल.पालकाना मुलांच्या शिक्षणाचे महत्व कळले आणि ते आपल्या मुलांना नियमितपणे शाळेत पाठवतील.

  3. हिराताईच्या बोलण्यात हृदयातली तळमळ दिसतेच आहे. नक्कीच पालक हा विचार करतील. अशा अनेक हिराताई आपल्या मदतीला तयार होवोत. आपण करीत असलेल्या कामात खारूताईचा वाटा आम्हाला मिळो व मिळतोय हे ही नसे थोडके..

  4. हिराताईनी केलेली विनंती पालकांमध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणेल .

  5. वीटभट्टी वरील हिराताईनी पालकांना केलेले आवाहन खरंच कौतुकास्पद आहे. प्रत्येक शाळेत पालकसभा होतात आणि या पालकसभांमध्ये पालकांनी आपल्या मुलांना शाळेत घालावं,त्यांनी नियमित शाळेत यावं असे शिक्षक सांगतांना दिसतात. माझ्या मते पालकांनी यापलीकडे जाऊन विचार करायला हवं. नियमित शाळेत यावं यासाठी जेवढा आग्रह धरला जातो त्यापेक्षा मुलांसोबत घरात असतांना शिक्षणा बद्दल सकारात्मक वातावरण निर्माण करावं यावर भर दिला जावा. आजच्या घडीला मी पाहिलेले काही पालक असे आहेत की त्यांनी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शिक्षकांवर टाकून मोकळे झालेत व घरी आल्यावर मुलांना हाणून मारून अभ्यासाला बसवायचे. मुळात त्यांना मुलांच्या प्रगतीत आपले योगदान काय असले पाहिजे आणि कसे असावे हे आजवर सांगितल्या गेले नसेल.किंवा पालक अशक्षित असल्यामुळे हा परिणाम असेल.चांगली बाजू अशी की या निमित्ताने का होईना पालक मुलांसाठी चांगला विचार करतात असे दिसते. हिराताई मध्ये असलेली शिक्षणाप्रतीची ओढ आणि आवड त्यांनी भोगलेल्या यातनांमधून आलेली आहे असे दिसते आणि इतक्या दुर्गम भागात एका स्त्री ने मनात असलेल्या ईच्छाना निर्भीड पणे वाचा फोडणे ही बाब खूपच कौतुकास्पद वाटली. सुज्ञ पिढी घडवण्यासाठी जेवढी शिक्षकांची गरज आहे त्याचबरोबर पालकांची सुद्धा गरज आहे असे मला वाटते आणि हिरताई ह्या खूप उत्तम उदाहरण आहेत. निलेश सर आपण करत असलेल्या कार्याला दाद द्यावी तेवढी कमीच आहे.

Leave a Reply to रोशना काठोलेCancel reply

Powered by WordPress.com.

Up ↑

Discover more from The Road Less Travelled

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading