एका गोष्टीमागची गोष्ट

२०१९च्या ऑगस्ट महिन्यात कधीतरी पालकनीतीच्या प्रियंवदा बारभाई यांचा एक मेसेज व्हॉट्सअप वर आला. या वर्षीचा पालकनीतीचा दिवाळी अंक कथा विशेषांक म्हणून प्रसिद्ध होतो आहे त्यासाठी कथा पाठवा, असें त्यांनी कळवले होते. या विशेषांकात पुढील तीन प्रकारच्या कथा पाठवता येतील असे ही त्या मेसेजमध्ये लिहिले होते .

१. प्रौढांनी बालकांसाठी लिहिलेल्या कथा

२. प्रौढांनी बालकांच्या भावविश्वाबाबत लिहिलेल्या कथा

३. मुला मुलींनी लिहिलेल्य कथा

लहान मुलांसाठी लिहिलेली एक कथा माझ्या हाताशी तयार होती, ती लगेच मी श्रीमती बारभाई यांना पाठवून दिली. पण ती कथा होती सचित्र पुस्तकासाठी लिहिलेली. दिवाळी अंकाच्या साच्यात तिला बसवणे जरा अवघड होऊ लागले. म्हणून नव्याने कथा लिहायचा निर्णय घेतला. काय लिहावे हे बराच काळ सुचत नव्हते. पण इतक्यात डोक्यात अनेक दिवस घोळत असलेला बऱ्याच वर्षांपूर्वीचा एक विषय आठवला. या विषयावर ‘प्रौढांनी बालकांच्या भावविश्वाबाबत लिहिलेल्या कथा’ या विभागासाठी कथा लिहिता येईल असे वाटले म्हणून लिहायाला सुरुवात केली आणि त्यातून ही गोष्ट तयार झाली. बऱ्याच वेळा उलट सुलट विचार केल्यावर  कथेचे सांभाळ हे नाव निश्चित झाले आणि आता ही कथा पालकनीतीच्या २०१९ सालच्या दिवाळी अंकात प्रसिध्द झाली आहे.

गोष्ट तुम्हा सर्वांच्या सोयीसाठी इथे देत आहे. ( कथा डाउनलोड करण्यासाठी शेजारच्या लिंकवर क्लिक करा.)

या कथेत तशी दोनच मुख्य पात्रे आहेत. संजी आणि शिल्पाताई. संजी खरोखरच माझ्या शाळेतली विद्यार्थिनी होती आणि कथेतील शिल्पाताई ही खरोखरच तिच्या कोच होत्या. कथा लिहिताना त्यांची नावे बदलावीत असे एकदा मनात येऊन गेले. पण कथेच्या मुळाशी असणाऱ्या अनुभवांशी मी इतका घट्ट जोडला गेलो आहे की वेगळी नावे घेऊन लिहिणे माझे मलाच पटेना. त्यामुळे शक्य तितके खऱ्या घटनांशी प्रामाणिक राहून कथा लिहायची असे ठरवले. अर्थातच कथा म्हणून लिहिताना लागणारे स्थळ-काळाच्या तपशिलाचे स्वातंत्र्य मी घेतले आहे.

मी आदिवासी भागात काम करायला लागल्यावर एका वेगळ्याच संस्कृतीचे दर्शन मला घडले. या संस्कृतीतल्या दोन बाबी मला फारच भावल्या. अनाग्रह आणि असंग्रह.  अमुक एका प्रकारेच जगले पाहिजे, अमुक एक मिळालेच पाहिजे असा आग्रह फार कोणी धरत नाही.  माझ्या सारख्या समाजाच्या अतिआग्रही वर्गातून आलेल्या व्यक्तीला आदिवासींची ही अनाग्रही वृत्ती चकित करून टाकयची. अजूनही टाकते. अनाग्रहाची ही वृत्ती अगदी लहान-मोठ्या सगळ्यांच्यात ठायी ठायी दिसते. सुरुवातीला विचित्र वाटेल असे या लोकांचे वागणे काही काळाने आपल्याला पटू लागते. माझे ही असेच झाले. या संस्कृतीचा अनाग्रह शिकण्याचा प्रयत्न मी करतोय, पण आज २२ वर्षांनीही तो म्हणावासा साधत नाही.

तर अशा अनाग्रही संस्कृतीतल्या एका मुलीची ही कथा आहे. तिच्या जागी मध्यमवर्गीय मुलगी आहे अशी कल्पना केली तर बहुदा ही कथा घडणारच नाही. म्हणूनच संजीचे हे वेगळे भावविश्व कथा रूपाने सर्वांपर्यंत  पोहचवावेसे वाटले. अनवट वाटच्या वाचकांना  हे भाविश्व कसे वाटले हे जाणून घेण्याची खूपच उत्सुकता आहे.

6 thoughts on “एका गोष्टीमागची गोष्ट

Add yours

 1. गरूजी
  आजच्या लेखातील घटना खूप काही शिकवून जाते.
  खरंच आपण किती संग्रही आणि आणि आग्रही असतो असा प्रश्न पडलाय..
  ज्या बाबी इतर लोकांच्या लेखी कितीतरी महत्वाच्या होत्या संची च्या नैसर्गिक स्वभावाने त्या किती साध्या ठरवल्या…
  आदिवासींची अनाग्रही आणि असंग्रही वृत्ती दाखवणारे अजून भरपूर उदाहरणे असतील जी माझ्या सारख्या लोकांना जगण्याची शिकवण देणारे ठरतील.कदाचित त्यामुळेच सो कॉल्ड विकासापासून दूर असताना देखील हे लोकं इतक्या आनंदात जगत असावेत. कृपया जमेल तसं लिहाल plz…
  पूर्ण प्रसंग डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहिला व विचार करायला भाग पडणारा होता.
  संची च पुढं काय झालं ते सांगाल.

 2. मुळात माझी लढाई जगण्याची – खरं तर लढाई तरी कुठे, नुसतंच जगत तरी रहाण्यासाठी नाईलाजास्तव प्रयत्न – अस्तित्व तयार झालंय आणि त्याचं काय करायचं हे सुद्धा जिथे माहिती नाही, तिथे जिंकणं आणि हक्क या तर स्वप्नात सुद्धा नसलेल्या गोष्टी! आणि शिवाय हे वर्षानूवर्ष चालत राहिलेलं, मग तिथे आग्रह कुठून असणार. अनाग्रह, खूपच समर्पक आणि यथायोग्य शब्द…..
  सांभाळ म्हटलं, तरी सांभाळायचं काय?

 3. नमस्कार सर,
  संजीची गोष्ट वाचत असताना पूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला..
  गोष्टीतील संजी खूप काही सांगून जाते..
  आणि गोष्ट वाचत असताना कुठंतरी वीटभट्टीवरील राधीचीही आठवण झाली.. ती पण अशीच आहे..

 4. गोष्ट वाचता वाचता प्रसंग समोर उभा राहिला.या समाजाला मी पण खूप जवळून पाहिलं आहे.वाचता वाचता ब-याच संजी माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.मीच गोष्टीत हरवून गेले आणि डोळे पाणावले.
  दहावीच्या रिझल्ट नंतर मी एका पाड्यावर तुमची मुलगी पास झाली म्हणून सांगायला गेले.जाताना खूप काही मनात होतं.घरच्यांना किती आनंद होईल वगैरे.तिची आई घराच्या अंगणात लाकडे फोडत होती.ताई तुमची मुलगी चांगले गुण मिळवून पास झाली आहे. “होल तं काय,इतकं दिस त जाय साळत.”आई म्हणाली.त्याच्या पुढची कोणतीही गोष्ट मी आईला न सांगताच निघून आले.मनात व डोक्यात मात्र खूप विचार होते.
  “सांभाळ” पण खूपच अनुभवातून आलेली गोष्ट आहे.त्यामुळे मनाला खूप भावते.
  धन्यवाद सर.

Leave a Reply

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: