“अंगणवाडी माझ्या घरी” भाग 2

“बाबा घरच्या घरी माझ्याशी खेळत आहेत ! जमिनीवरून सरपटताना कपडे मळतील याची चिंता न करता !!”

लॉकडाऊनच्या काळात घरातल्या घरात मुलांच्या शारीरिक विकासाला चालना देण्यासाठी खेळ कसे घेता येतील याचे काही व्हिडिओ पाठवले होते. आपल्या लहानशा घरात मुलाला दोरी खालून सरपटत जायला शिकवणारे, मुलाशी प्रेमाने बोलून त्याच्या खेळात सहभागी होणारे वडील ग्रामीण भागात तरी अजून अभावानेच पाहायला मिळतात. शाळा बंद असताना व्हिडिओंच्या मदतीने पालकांनी मुलांचे शिक्षण चालू ठेवण्याची कल्पना सुरुवातीला फारच साधी सरळ वाटली होती. पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यावार मात्र त्यात काय काय अडचणी आल्या ते सांगणारा हा ब्लॉग.

‘अंगणवाडी माझ्या घरी’ या कार्यक्रमाचे कागदावर केलेले नियोजन आणि त्याची प्रत्यक्षातील कार्यवाही  यांच्यात काही एक अंतर असेल असे सुरुवातीपासूनच  वाटत होते.  पण नियोजनाच्या वेळी  अनेक बाबींचा आपल्याला अजिबात अदमासच नव्हता ही जाणीव क्वेस्टच्या टीमला लवकरच झाली.

लॉकडाऊनचे नियम थोडे शिथिल झाल्यावर पालकांना या कार्यक्रमाचा नेमका काय फायदा होतो आहे हे जाणून घ्यायला  क्वेस्टच्या टीमने गावागावांत फिरायला सुरुवात केली. मुलांच्या घरी जाऊन चौकशी करायला सुरुवात केल्यावर अनेक मुलांच्या आयांनी सांगितले की असा काही कार्यक्रम सुरू आहे हे त्यांना माहितीच नाही. सुरुवातीला वाटले की मुलाचे नाव  आणि त्यांच्या पालकांचा व्हॉट्सप नंबर यात काही गडबड झाली असावी. नाही तर किमान काहीतरी कार्यक्रम सुरू झाला आहे इतके तरी पालकांपर्यंत पोहचायलाच हवे होते.  म्हणून मुले व त्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर योग्य आहेत ना याची खातरजमा करून घेतली, तर अगदी थोडे अपवाद वगळता मुलाचे नाव आणि पालकांचा  व्हॉट्सअप नंबर व्यवस्थित जुळत होते.

शेवटी नेमकी काय गडबड आहे हे समजून घेण्यासाठी अंगणवाडीत पालकसभा घेण्याचे ठरले. या सभेत या कोड्याचा उलगडा झाला. अंगणवाडी ताईंच्या सांगण्यावरून मुलांच्या आया  पालकसभेला आल्या. त्यांच्यापैकी बऱ्याच जणींनी सांगितले की मोबाईल मुलांच्या वडिलांकडे असतो. ते दिवसभर बाहेर असतात आणि असा काही कार्यक्रम सुरू झाल्याचे त्यांनी कधी सांगितलेच नाही. काही जणी म्हणाल्या की आमच्याकडे बायांना मोबाईल वापरायची परवानगी नाही आणि आम्हाला तो वापरताही येत नाही. मग कार्यक्रम सुरू झाल्याचे आम्हाला कसे कळणार?

आता या परिस्थितीत बायांनी मोबाईल वापरायला मागणे हाच एक उपाय होता. मग पालकसभांतून आपण हा कार्यक्रम का करत आहोत आणि तो पुढे नेण्यासाठी मोबाईल कसा गरजेचा आहे हे सांगणे सुरू केले. अंगणवाड्या जरी सुरू नसल्या तरी आपल्या मुलाचे वय वाढतच राहणार आणि या वयात त्याला जे शिकायला मिळायला हवे ते मिळणार नाही. म्हणून मोबाईलवरचे व्हिडिओ वापरून घरच्या घरी शिकवायला हवे अशा आशयाचे बोलणे आयांनी मुलांच्या वडिलांसोबत करायचे असे ठरले. त्या नुसार काही बायांनी घरी हे बोलणे केले आणि मग संध्याकाळी व्हिडिओ बघण्यापुरता का होईना, मोबाईल त्यांना मिळू लागला.

हा सारा अनुभव क्वेस्टच्या टीमला खूप काही शिकवून गेला. अठरव्या शतकातल्या आणि एकविसाव्या शतकातल्या प्रश्नांना  आपल्याला एकाच वेळी तोंड द्यायचे आहे याची जाणीव झाली. शहरी भागात ज्या बाबी आपण सर्रास गृहीत धरून चालतो तशा त्या ग्रामीण भागात धरता येणार नाहीत हे लक्षात आले. समाजातील स्त्री आणि पुरुषांतील असमानता गावागावांत काम  करणाऱ्या या टीमला  माहिती नव्हती असे बिलकुल नाही. पण अगदी साध्या साध्या गोष्टींतून ती अवचितपणे कशी प्रतीत होत राहते याचे नवल आणि वाईट मात्र नक्कीच वाटले.

मुलांच्या परिस्थितीची अजून चांगली माहिती व्हावी म्हणून मग सर्वांशी विचार विनिमय करून गृहभेटींचा कार्यक्रम करायचे ठरले. या निमित्ताने थेट मुलांच्या घरी जाण्याची संधी मिळाली. मुलांच्या घरी जाऊन पोहचल्यावर अजूनही काही अडचणी समोर आल्या. आम्ही व्हिडिओसोबत ज्या सूचना पाठवत होतो त्या अनेक पालकांना वाचून समजतच नव्हत्या. नुसते व्हिडिओचे अनुकरण करून मुलांना शिकवणे त्यांना जड जात होते. कारण एखाद्या पालकाच्या मुलाने व्हिडिओतल्या मुलापेक्षा वेगळा प्रतिसाद दिला तर अशा वेळी काय करायचे हे अनेक पालकांना सुचेना! मग अशा न समजलेल्या बाबी गृहभेटींच्या वेळी प्रत्यक्ष करून दाखवायच्या असे ठरवले. या प्रात्यक्षिकांचा बराच उपयोग होऊ लागला. काही पालक आवर्जून आम्हालाही गटात घ्या असे म्हणून लागले.

या  निमित्ताने एक चांगली गोष्ट होईल अशी आशा  मात्र सगळ्यांना वाटते आहे. ‘लहान मुलांना काय कोणीही शिकवू शकते’  ही पालकांची आणि पर्यायाने समाजाची धारणा थोडीफार तरी मोडून पडेल. अंगणावाडी ताईचे बालशिक्षणाचे काम किती गुंतागुंतीचे आहे याची कल्पना पालकांना येईल. तिच्या मेहनतीचा अंदाज येईल आणि पालकांच्या नजरेत अंगणवाडी ताईची प्रतिष्ठा थोडी तरी उंचावेल.

काही ठिकाणच्या ‘बाबा’ पालकांनी मात्र अंगणवाडी माझ्या घरी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. हा आशादायक प्रतिसाद दाखवणारा हा अजून एक  व्हिडिओ.

मुलांना संख्यानामे क्रमाने म्हणता यावीत म्हणून पावले टाकत ती मोजण्याचा क्वेस्टने पाठवलेला हा व्हिडिओ
अंक गोलावरील मोजणीच्या व्हिडिओला एका पालकांनी दिलेला कल्पक प्रतिसाद !

शेतावर सोबत आलेल्या स्वतःच्या मुलीला उत्साहाने शिकवणारे तेजलचे बाबा पाहून खूप बरे वाटले. हाती असलेल्या भाजीचा शैक्षणिक साहित्य म्हणून वापर करण्याची त्यांची कल्पना भन्नाट आहे. अमुक एक वस्तू माझ्याकडे नाही म्हणून ते अडून बसलेले  नाहीत.  संख्यानामे म्हणण्याच्या कृतीचा मूळ हेतू लक्षात घेऊन जाता जाता मुलीच्या शिक्षणाची योजना करण्याची तेजलच्या बाबांची हातोटी एखाद्या व्यावसायिक शिक्षकालाही चटकन साधणार नाही.

आता या व्हिडिओत दिसणाऱ्या पालकांसारख्या ‘बाबा’ पालकांची संख्या कशी वाढवायची हा खरा प्रश्न आहे. हे काम कसं करावं या बाबत तुम्ही काही सुचवू शकाल का? तुमच्या सूचना या ब्लॉगला प्रतिसाद म्हणून नक्की कळवा, कारण वाचकांच्या सूचनांमधूनच ‘अंगणवाडी माझ्या घरी’ ही कल्पना हळू हळू पुढे विकसित होईल.    

18 thoughts on ““अंगणवाडी माझ्या घरी” भाग 2

Add yours

 1. खुपचं छान. अंगणवाडी ताई ,मदतनीस यांचा तसेच शाळेतील शिक्षकां चा पालकांशी चांगला संपर्क असतो. शहरात शाळा बंद असल्या की शिक्षकांचा प्रत्यक्ष संपर्क कमी येतो. ग्रामीण भागात ताई , शिक्षक विद्यार्थी संख्या कदाचित कमी असल्याने म्हणा ,तुलनेनं जास्त संपर्कात असतात. या ताई व शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षित करता येईल यात पालकांना ही समाविष्ट करता येईल

  Like

  1. खूप छान लेख …….ग्रामीण भागातील अनेक मुलांच्यापर्यंत पोहचून त्यांना आपल्या उपक्रमात सहभागी करून घेण्यात तुम्ही यशस्वी होत आहात .त्याकरता तुम्ही घेत असलेले कष्ट जाणवतात.
   वाचताना जाणवल की हे काम कठीण आहे.अनेक अडचणींवर मात करीत तुम्ही पुढे जाताय आणि म्हणूनच तुम्हाला कायम यश मिळो हीच शुभेच्छा🙏🏻

   Like

 2. खूपच भन्नाट उपक्रम आहे…! आम्ही सुद्धा युनिसेफ आणि विक्रमशिला संस्थेच्या माध्यमातून संवेदनशील पालकत्व जाणीव जागृती कार्यक्रम पुणे आणि पालघर जिल्ह्यात 1027 अंगणवाड्या सोबत राबवत आहोत तर आम्हाला ही अशा प्रकारचे अनुभव येत आहे… काही ठिकाणी तर उत्साहपूर्वक प्रतिसाद पालकांकडून मिळत आहे… तशा काही अडचणी सुद्धा आहेत…

  Like

  1. निवृत्ती भाऊ,
   तुम्ही करत असलेल्या उपक्रमाबद्दल पालकांच्या प्रतिसादाबद्दल जरा सविस्तरपणे इथे लिहाल का? तुम्ही पालकांसोबत नेमके काय काय करता, त्यात काय अडचणी येतात, त्या तुम्ही कशा सोडवता या बाबत जरूर लिहा. सर्वांनाच त्याचा उपयोग होईल.

   Like

   1. संवेदनशील पालकत्व जाणीव जागृती कार्यक्रम…!
    युनिसेफ कडून हा प्रकल्प महाराष्ट्रात पुणे आणि पालघर जिल्ह्यातील काही अंगणवाड्यामध्ये साधारणपणे ऑक्टोबर 2018 पासून ते ऑगस्ट 2020 पर्यंत ग्राममंगल संस्थेच्या माध्यमातून सुरू होता. यामध्ये lockdown च्या अगोदर महिन्यातून दोन पालकसभा प्रत्येक अंगणवाडीत होत होत्या. या पालकसभांमध्ये पालकांना बालशिक्षणाचे महत्व पटवून देणे, अनुभवाच्या आधारे मुलं कसं शिकतं..? घरातील किंवा परिसरातील वस्तूंच्या आधारे मुलांसोबत उपक्रम कसे घ्यायचे..? बालकांच्या मेंदूच्या विकासाचं जाळं कसं विकसित होतं..? मुलांशी कसं वागायला पाहिजे..? मुलांच्या सर्वांगीण विकासात घरातील इतर सदस्यांची जसे की, बहीण-भाऊ, आजी-आजोबा, काका-काकू यांची भूमिका कशी आणि किती महत्त्वाची आहे..? तसेच मूल 24 तासांपैकी अंगणवाडीत फक्त 2 किंवा 3 तास असतं परंतु तेच मूल आपल्याकडे बाकी दिवसरात्र असतं त्यामुळे मुलांच्या विकासात पालकांची भूमिका खूप महत्वपूर्ण ठरते. अशा खूप साऱ्या मुद्द्यांवर पालकांचे प्रबोधन केल्या जात होते. त्यांना पालकसभेत प्रत्यक्षात ते करून दाखवल्या जात होते…! ह्या पालकसभा अंगणवाडी सेविकाताई मार्फत भरवल्या जात असे. यामध्ये पालकांचा प्रतिसाद सुद्धा खूप छान प्रकारे मिळत होता…!
    परंतु जेव्हा हा lockdown सुरू झाला तेव्हापासून ह्या पालक सभा घेणं सुद्धा आपोआप बंद करावं लागलं…!
    आता सुरू झालं कोरोना पर्व तर सगळीकडेच बंद…
    मग सुरू झालं KG to PG ऑनलाईन शिक्षण…
    त्यात अंगणवाडी तरी कशी मागे राहणार… पण आपल्याला पालकांपर्यंत कोणत्या माध्यमातून सहज पोहचता येईल यासाठी एक सर्वे करण्यात आला. त्यातून स्मार्टफोन हा एक जवळचा आणि बहुतांश लोकांकडे उपलब्ध असणारा पर्याय निवडला गेला. मग ऑनलाईन कामास सुरुवात झाली.
    सर्व टीम मिळून बालशिक्षणातील आकार अभ्यासक्रमानुसार 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी उपक्रम, खेळ, गाणी आणि गोष्टी लिहिणं, त्या रेकॉर्ड करून, त्यामध्ये चित्र घालून त्याचा व्हिडिओ बनवून तो youtube ला अपलोड करत आहोत. मग त्या व्हिडिओ ची लिंक Supervisor च्या Whatsapp ग्रुपला पाठवत आहोत. Supervisor ती लिंक आपापल्या बिटनुसार अंगणवाडी सेविकांना पाठवत आहे. तर अंगणवाडी सेविका त्यांनी बनवलेल्या पालकांच्या Whatsapp ग्रुपवर त्या व्हिडिओ ची लिंक पाठवत आहे. अशा साखळीपद्धतीने हा संवेदनशील पालकत्व कार्यक्रम पालकांपर्यंत वा मुलांपर्यंत पोहचत आहे.
    सध्या हाच Caregiving Parenting program म्हणजेच संवेदनशील पालकत्व जाणीव जागृती कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये पुणे आणि पालघर जिल्ह्यातील 1027 अंगणवाड्यामध्ये West Bengal Based Vikramshila Education Resource Society, Kolkata ही संस्था पहिल्यांदाच महाराष्ट्रात काम करत आहेत आहे. या संस्थेचे राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांत अंगणवाडी सोबत कामं सुरू आहे.
    सप्टेंबर 2020 पासून हाच प्रकल्प विक्रमशिला संस्था बघत आहे. या संस्थेच्या माध्यमातून supervisor आणि सेविकांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रशिक्षण घेऊन त्यांच्याकडून या प्रकल्पाबाबत feedback घेतला. त्यानुसार…
    1) तुम्ही जे उपक्रम पाठवता ते खूप छान आहे आम्हाला आवडतात. तसेच पालक सुद्धा मुलांसोबत रोज ऍक्टिव्हिटी घेत आहे. उपक्रमात सहभागी होऊन त्याचे फोटो नि विडिओ सेविकांना पाठवत आहे.
    2) काही ठिकाणी हिंदी, बंजारा, भोजपुरी, मारवाडी, तामिळ, तेलगू, कन्नडी आणि गोसावी इ. असे बहुभाषिक पालक असल्याने आपण पाठवलेले मराठीतले उपक्रम त्यांना समजत नाही.
    3) साधारणपणे बहुतांश अंगणवाडी मध्ये 20 ते 40% पालकांकडे स्मार्ट फोन नाही.
    – काही पालकांकडे साधा बटनचा फोन आहे.
    – काहींकडे स्मार्टफोन आहेत पण मोबाईल मध्ये रिचार्ज नाही.
    – काही पालक अशिक्षित असल्याने त्यांना उपक्रम कसा घ्यायचा तेच समजत नाही.
    – घरी एकच मोबाईल आणि घरातील दुसऱ्या मुलांचा सुद्धा ऑनलाईन अभ्यास असतो त्यामुळे रोज उपक्रम घेणं शक्य होत नाही.
    – ज्या पालकांकडे मोबाईल आहेत ते पालक कामासाठी बाहेर जातात तर रात्री घरी येतात. त्यानंतर त्यांना शक्य असेल तेव्हा उपक्रम घेतात. किंवा पालक सुट्टीच्या दिवशी एकत्रच सर्व दिवसांचे उपक्रम घेतात.
    – बहुतांश बाबा पालकांकडेच मोबाईल असतो.
    – काही वेळेस पालकांना कंटाळा येतो उपक्रम घ्यायचा तर अशा वेळेस सेविका ताई गृहभेटीच्या वेळेस पालकांच्या घरी किंवा अंगणवाडीत आहार वाटप करता वेळेस पालकांना उपक्रमाचे महत्व पटवून सांगतात. तसेच ज्यांच्याकडे मोबाइल नाहीत त्यांना ताई हे उपक्रम कसे घ्यायचे हे प्रत्यक्ष करून दाखवतात किंवा त्यांना स्वतःच्या मोबाईलवरून उपक्रम दाखवतात…
    4) काही मोजके उपक्रम हिंदी किंवा इंग्लिश मध्ये असायला हवे अशी काही पालकांची इच्छा आहे.
    5) साधारणपणे प्रत्येक अंगणवाडीतून 60 ते 80 टक्के पालकांपर्यंत आपले उपक्रम पोहचत आहेत.
    ■ कार्यक्रम राबवतांना काही अडचणी सुद्धा आल्या त्यावर मात करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले त्याविषयी थोडक्यात :- बरेच पालक घरी उपक्रम घेण्यासाठी तयार नव्हते, त्यांचा प्रतिसाद मिळत नव्हता. विशेष म्हणजे बाबा पालकांचा सहभाग नव्हता, सेविकांना हा कार्यक्रम म्हणजे असलेल्या कामात आणखी भर, जास्तीच्या कामाचा ताण असे वाटत होते, त्यांना हे अधिकचे काम वाटत होते. तसेच काही सेविकांना Googl form सुद्धा भरता येत नाही अशा अडचणी समोर असतांना त्यावर वेगवेगळ्या प्रकारे मात केली जसे की, सेविकांना MPR मिटिंग मध्ये संवेदनशील पालकत्व कार्यक्रमाचे महत्त्व पटवून सांगितले त्याची बालविकासाच्या दृष्टीने किती गरज आहे, google form कसे भरायचे, ते प्रत्यक्षात भरून दाखवले, पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी बऱ्याच अंगणवाडीत लसीकरण आणि खाऊ वाटपाच्या वेळेस सेविका आणि मुख्यसेविका ह्या कार्यक्रमाबाबत पालकांचे प्रबोधन करत आहे. ज्यांना भाषा समजत नाही त्यांच्यामधीलच एका पालकांना ज्यांना हिंदी, मराठी आणि भोजपुरी समजते त्यांना हे उपक्रम इतर पालकांना समजावण्यासाठी सांगत आहे. यामुळे थोडेफार का होईना पण पालक उपक्रम घ्यायला लागले. तसेच जास्तीत पालकांपर्यंत पोहचण्यासाठी किंवा त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी सेविकांचा whatsapp ग्रुप तयार केला, त्यामध्ये वेळोवेळी followup घेत आहेत. तसेच पालकांसाठी जे ग्रुप बनवले होते त्यामध्ये सुद्धा सेविकांना update करून त्याचा followup घ्यायला सांगितल्या जात आहे. तसेच उपक्रमाची लिंक आणि त्या उपक्रमाची दिनदर्शिका नियमितपणे सेविकांच्या ग्रुप ला पाठवत आहे. सेविका ती लिंक पालकांच्या ग्रुप ला पाठवत आहे. यामुळे पालकांचा सहभाग वाढत आहे. त्यांनी मुलांसोबत घेतलेल्या उपक्रमाचे फोटो आणि विडिओ ते ग्रुपला पाठवत आहे. ज्यांनी घरी घेतलेल्या उपक्रमाचे विडिओ पाठवले त्यांचे कौतुक केले जात आहे, त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे त्यामुळे बाकीचे पालक आणि सेविका ही पुढाकार घ्यायला लागल्या. नाही 100% पण अधिक चांगला बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणून तर खऱ्या अर्थाने पालकांना आपल्या पाल्यांबाबत हा कार्यक्रम संवेदनशील बनवत आहे. हे पदोपदी बघायला मिळत आहे. यामधून पालकांना बालशिक्षणाचे महत्व समजत आहे. असा काम करतांना काहीसा अनुभव येत आहे आणि तो मी शब्दातीत करण्याचा प्रयत्न करत आहे.
    Nivrutti Bodkhe
    Block Coordinator (Kothrud Block, Pune)
    Vikarmshila Education Resource Society, Kolkata
    Mobile: +91 9158095704/8208652035
    Email :- nivruttibodkhe@gmail.com
    Website: https://www.vikramshila.org

    Like

   2. कार्यक्रमाविषयी सविस्तर लिहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही मांडलेल्या अडचणी क्वेस्टच्या कार्यक्रमालाही येत आहेत. पण तरीही काम करत राहणे गरजेचे आहे.

    Like

 3. फारच छान. मला हे वाचता बघताना Klaus सिनेमाची आठवण होत होती. मुलांना केवळ Klausला पत्र पाठवायचे असते त्यातून अख्खे गाव सुस्थित होण्याचा प्रवास त्यात आहे.

  A true selfless act always inspires another. असा एक संवाद त्यात आहे त्याची प्रचिती येत असेल हे सगळं करताना.

  —–

  बाबा पालकांना अधिक सहभागी कसे करून घ्यावे याचं माझ्यासारख्याच्या डोक्यात येणारे उत्तर म्हणजे बाबा आणि मूल यांच्यात सामायिक वेळ वाढवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आहे. शक्य असल्यास मूल बाबाच्या कामाच्या ठिकाणी आठवड्यातून एकदा तरी नेणे किंवा जवळचे काही मुलं मुली आणि फक्त त्यांचे बाबा यांनी गावाजवळच्या एखाद्या मोकळ्या ठिकाणी घेऊन जाऊन मुलांसोबत एकत्र त्यांचे खेळ घेणे. यातून बंध अधिक बळकट होईल आणि आपणही हे शिकवण्यात वगैरे सहभागी होउ शकतो असं बाबांना पटू लागेल असं वाटतं. अर्थात यातही अनेक अडचणी असतीलच. पण माझ्या शहरी मेंदूला आणखी काही सुचेना

  Like

 4. भाग २ मस्त ! बाबा लोकांचा सहभाग मिळवण ही ग्रामीण असो वा शहरी दोन्ही ठीकाणी अवघडच जाणारी गोष्ट . शेतातल्या बांधावर एका बाबांनी घेतलेला गणिताचा उपक्रम फारच मस्त , इच्छा असेल तर मार्ग सुचतोच हे दाखवून दिले त्यांनी …
  मूल आणि बाबा जेवढे एकत्र खेळतील तेवढे बाबाला मूल आपल्या इतर गोष्टींमधेही सहज सहभागी करून घेईल असे वाटते …

  Like

 5. खूपच छान कल्पाना आहे सर ! आम्ही सुध्दा ” पालकांची साद आणि बालकांचा प्रतिसाद ” हा उपक्रम ‘पहिले पाउल’ या प्रकल्पाच्या माध्यामातून ० ते ६ वयोगटातील मुलासाठी हा उपक्रम घेतला होता. आपले काम सुधारण्याची संधी मिळते. अडचणीवर मात करत आपला उद्देश साध्य करण्याची जिद्द निर्माण होते. या सर्व उपक्रमातून बदलत्या काळात नव्या, जीवनशैलीत, नव्या शिक्षण पद्धतीत , रुळण्यासाठी पालकांमध्ये ज्या प्रकारची सामाजिक किवा कौटुबिक भान निर्माण होण्याची आवश्यकता आहे. ते तसे निर्माण होण्यास सुरुवात झाली.

  Like

 6. राजेश हरिभाऊ बनसोडे (तेजल बनसोडे हीचे वडील) says:

  प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा/मुलगी वर्गात सर्वांपेक्षा हुशार असावी ,त्यादृष्टीने इयत्ता 1ली नंतर बरेच पालक आपल्या पाल्यांना अतिरिक्त शिकवणी वर्ग वगैरे लावतात आणि अचानक माझा पाल्य सर्वपेक्षा हुशार व्हावं अस त्यांना वाटतं.. मी अचानक हा शब्द मुद्दाम होऊन वापरला कारण विद्यार्थी अचानक हुशार होत नसतो त्यासाठी त्याला त्याच्या अंगणवाडी जीवनापासून छोट्या छोट्या गोष्टी शिकण्याची सवय लावावी लागते..आणि यामध्ये अंगणवाडी ताईबरोबरच पालकांची भूमिका पण खूप महत्त्वाची आहे,सर्व पालकांना विनंती आहे आपण देखिल आपल्या पाल्याचा घरी अभ्यास घेऊन अंगणवाडी ताईच्या उपक्रमांना सहकार्य करावे …🙏🙏🙏

  Like

  1. राजेश भाऊ प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या सारख्या पालकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बाकीचे पालकही या कार्यक्रमाचा नक्की लाभ घेतील अशी आशा वाटते. तेजलचे शिक्षण घरच्या घरी करताना काय काय अनुभव आले ते इथे अधून मधून जरूर लिहून कळवा.

   Like

   1. खूप छान उपक्रम आहे सर.. मला या उपक्रमात सहभागी होता येईल का? माझा मुलगा 4व वर्षांचा आहे..

    Like

 7. स्वाती रविंद्र राऊत (अ. से.) दापोरी खुर्द ता.तिवसा जि. अमरावती says:

  “अंगणवाडी माझ्या घरी”या उपक्रमामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी मजूर वर्ग असे पालक आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मुलांना शिकवण्याचे काम आई करत असते.वडिलांनी मुलाला वेळ देण्या बाबत जर गृहभेटी दरम्यान जेव्हा सांगितल्या जाते तेव्हा अनेक अडचणी समोर येतात.

  Like

  1. स्वाती ताई असे होणे अगदी स्वाभाविक आहे. शहारी मध्यमवर्गीय घरांतून सुद्धा अजून इतकी जागृती दिसत नाही. वडिलांनी मुलांसाठी वेळ देणे ही कल्पनाच आपल्याकडे खूप नवीन आहे. त्यामुळे ती रुजायला वेळ लागेलच. पम तुम्ही गृहाभेटी देऊन जे प्रयत्न सुरू केले आहेत ते सोडू नका कारण त्यातून काहीतरी बदल नक्की घडेल. असा बदल जाणवला तर इथे ब्लॉगवर नक्की लिहून कळवा.

   Like

 8. खरं तर उपक्रम खूपच छान आहे.लॉकडाऊन च्या काळात सर्वच वयोगटातील मुलांच्या शिक्षणाची वाताहात झालेली आहे.विशेषत:ग्रामिण भागातील मुलांची खुप मोठी हानी होत आहे यावर पर्याय म्हणुन आनलाईन शिक्षण च्या माध्यमातुन उपयुक्त असे शैक्षणिक व्हिडिओज तयार करुन लहान मुलांपर्यंत पोहोचविणे खुप गरजेचे आहे.त्या साठी शाळा ,अंगणवाडी स्तरांवरुन ग्रुप तयार करून ते मुलांपर्यंत पोहोचणे,त्याचा फिडबॅक घणेही तितकेच गरजेचे आहे, तसेच यासाठीं पालकांचे उदबोधन व प्रशिक्षण होणे तितकेच आवश्यक आहे.कारण ग्रामीण भागात बाल्यशिक्षणाकड पालकांचा पाहीजे तेवढ लक्ष राहत नाही किंवा त्यांना तितकासा वेळ मिळत नाही .म्हणुन शाळा व अंगणवाडी स्तरावरुन पालक सभांच्या माध्यमातुन पालकांमध्ये मोबाईल चा शैक्षणीक वापर करण्याविषयी जागृती होणे आवश्यक आहे. हे काम आपला शिक्षक बांधव व अंगणवाडी ताईनिश्चित करतील याबाबत शंका नाही .त्या साठी हे दोनही घटक मनाने तयार असणे गरजेचे आहे. मग उपक्रम यशस्वी होणेसहज शक्य आहे.
  सर आपण सुरू केलेले कार्य खरच स्पृहणीय आहे .हा ब्लाॅग जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: