आनंदवाडी

देशातील 3 ते 6 वर्षे या वयोगटातील मुलांना केवळ शिक्षणच नाही तर आरोग्य, पोषण, लसीकरण अशा अनेक महत्त्वाच्या सेवा अंगणवाड्यांमार्फत पुरवल्या जातात. अंगणवाडी ताईचे काम जर नीट करायचे म्हटले तर अतिशय आव्हानात्मक असते. मध्यमवर्गात वाढणाऱ्या याच वयोगटातील मुलांचे शारीरिक आरोग्य सांभाळण्यासाठी डॉक्टर, नर्सेस असतात. त्यांचे पोषण बघण्यासाठी आहार तज्ज्ञ असतात. त्यांच्या शिक्षणाची काळजी प्रशिक्षित शिक्षक घेतात. बालसंगोपन करताना काही अडचण निर्माण झालीच तर पालकांसाठी समुपदेशक असतात. एकूणच मध्यमवर्गीय  मुलांच्या विविध गरजा भागवणारी एक व्यावसायिक व्यवस्था समाजात उभी आहे. बहिष्कृत वर्गातील मुलांसाठी मात्र या सगळ्या गरजा भागवण्याची एकच जागा असते. ती म्हणजे अंगणवाडी. एका अंगणवाडी ताईला तळागाळातल्या मुलांसाठी वर उल्लेखलेल्या साऱ्या भूमिका पार पडाव्या लागतात, यावरून या कामातील गुंतागुंत सहजच लक्षात येईल. अशा परिस्थितीत  तुटपुंज्या संसाधनात चालवल्या जाणाऱ्या अंगणवाड्यांमधील बालशिक्षणाची सेवा अनेकदा कमकुवत राहिलेली दिसते यात नवल ते काय?

नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अभ्यासक्रमाचा  आकृतीबंध बदलण्याची सूचना आहे. 3 ते 8 वर्षे वयोगटासाठी अभ्यासक्रमाचा पहिला पायाभूत टप्पा सुचवण्यात आला आहे. यातील 3 ते 6 वर्षे वयोगटाची मुले  अंगणवाड्यांत आहेत. अर्थातच अंगणवाडी कार्यकर्त्यांना आता अंगणवाडीतील बालशिक्षणाची सेवा मजबूत करावी लागेल. आपापल्या अंगणवाड्यांचे रूपांतर सक्षम बालशिक्षण केंद्रांमध्ये करावे लागेल.

अंगणवाडीचे बालशिक्षण केंद्रात रूपांतर करायचे तर सर्वप्रथम अंगणवाडीत चांगल्या भौतिक सुविधा करून घ्यायला लागतात. या सुविधा तयार करणे फार खर्चिक नसले तरी हे काम बरेच विचारपूर्वक करावे लागते. आजचा लेख आणि व्हिडिओ याबाबतचाच आहे. दीपाताई नावाच्या एका अंगणवाडीताईंनी आपल्या अंगणवाडीचे रुपडे कसे बदलले याची ही गोष्ट. 

अंगणवाडीतील भौतिक सुविधा भाग 1 (हा व्हिडिओ तयार करण्यसाठी एच. टी पारेख फाऊंडेशनचे अर्थसाहाय्य लाभले आहे.)


व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात आले असेलच की अंगणवाडीच्या मुलांना मोठ्यांसारखे वाचता आले नाही तरी त्यांच्या आसपास भरपूर लेखी मजकूर उपलब्ध असणे गरजेचे आहे. हा मजकूर त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमाचा भाग असायला हवा. अशा प्रकारे अंगणवाडीत  मजकूर लावून ठेवला तर त्यातून मुलांची लेखी भाषेची जाण वाढते. लिहिलेला मजकूर आपण वाचून समजून घेऊ शकतो, मजकुराचा रोजच्या जगण्यात उपयोग करायचा असतो हे मुलांना नकळत उमगते. त्यासाठी अंगणवाडीच्या भिंतींचा प्रभावी वापर कसा करावा याची एक झलक तुम्हाला या फिल्ममध्ये पाहायला मिळाली.

खेड्यापाड्यांत वाढणाऱ्या अनेक मुलांच्या आसपास लेखी भाषा फारशी नसते. ज्या घरांतील पहिलीच पिढी शाळेमध्ये येते आहे त्यांच्या घरी लेखी भाषेचा वापर करणारे कोणी नसते. परिणामतः शाळेत गेल्यावर लिपी शिकण्याचा जो अभ्यास करायला लागतो त्याचे प्रयोजनच मुलांना बराच काळ उमगत नाही. साहजिकच साक्षर होण्याचा त्यांचा प्रवास अधिक खडतर बनतो. या उलट ज्या मुलांना लेखी भाषेचा उपयोग माहिती आहे, वाचनातून मिळणारा आनंद काय असतो हे ज्यांनी मोठ्यांच्या मदतीने अनुभवले आहे अशी मुले चटकन साक्षर होतात. आज अंगणवाडीत येणाऱ्या अनेक मुलांच्या घरी साक्षरतेचे वातावरण नाही. म्हणून अशी मुले साक्षर होण्यात अंगणवाड्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. 

दीपाताईंनी तयार केलेल्या लहान लहान सुविधा त्यांनी मुलांना वापरायला कशा शिकवल्या या बाबत अधिक चर्चा आपण लेखमालेतील पुढील लेखात करणार आहोत. अंगणवाडीतील  बालशिक्षण सेवा मजबूत करण्याच्या दिशेने दीपाताईंनी टाकलेले हे पाऊल अगदी लहानसे आहे. पण त्यामुळे त्यांची अंगणवाडी ही आनंदवाडी झाली आहे. मुलं जिथे आनंदाने येतील अशी आनंदवाडी. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सुचवलेला अभ्यासक्रमाचा पायाभूत टप्पा प्रत्यक्षात आणायचा असेल तर राज्यभरातील लाखो मुलांना बालविकास सेवा पुरवणाऱ्या अंगणवाड्यांचे रूपांतर आनंदवाड्यांमध्ये  होणे अत्यंत गरजेचे आहे.

या व्हिडिओमध्ये आलेल्या पुढील दोन मुद्द्यांबाबत तुम्हाला काय वाटते ते नक्की कळवा.

  1. अंगणवाडीत लेखी मजकूर उपलब्ध केल्याने मुलांच्या साक्षरता विकासाला फायदा होईल हे म्हणणे तुम्हाला पटते का? या बाबतचा तुमचा काय  अनुभव आहे ?
  2. अंगणवाडीच्या भिंतींवर कार्टून किंवा चित्रे  कायमस्वरूपी रंगवण्याबाबत दीपाताईंचे काय मत आहे? ते तुम्हाला पटते का?

9 thoughts on “आनंदवाडी

Add yours

  1. Aangan vadi che nav aanand vadi kele he khup avadale. Donhi mudde barobar aahet.
    1.machakur samruddha vatavarnacha bharpur faayda mulana sakshar honyasathi hou shakto.
    2.tasech cartoon chi chitre kadhanyapeksha mulanchya bhovati tyanchya parisaratil aani bhavvishwatil chitre mulanchya manavar chan parinam kartat.
    He kam pratek zillyamadhe pohochanyasathi kay karta yeil?

  2. अंगणवाड्या या आधुनिक भारताच्या तांबड्या पेशी ठरणार आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. मुलांसाठी लेखी मजकूर आणि दृश्य चित्रे दोन्हींचा फायदा खूप आहे हे पटतेच. सूचनांप्रमाणे लहानसे विनोद, कोडी वगैरे गोष्टी लेखी मांडण्यासाठी एक कोपरा असेल तर मुलांच्या तो अधिक जवळचा ठरेल असे वाटते.
    मुलांना वेगवेगळ्या चित्रशैलींची ओळख व्हावी यासाठी मुलांनी तसेच काही मोठ्यांनी काढलेली वेगवेगळ्या शैलीतील चित्रं एका फलकावर असावीत आणि ती वेळोवेळी बदलली जावीत असंही वाटतं. ताईंचं मत सुयोग्य वाटलं. एखादी भिंत/कोपरा/दरवाजा वर्गाची ओळख म्हणून कायम स्वरुपी हाती काढलेल्या रीलेटेबल चित्राचा असला तरी पुरावे.

  3. खूपच छान निलेश दादा. हा लेख आणि व्हिडिओ अधिकाधिक अंगणवाडी ताईंपर्यंत जायला हवा असे वाटते…..

  4. अंगणवाडीतील मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी दीपाताई वाचनसमृद्ध वातावरण तयार करीत आहेत हे बघून आनंद झाला. परिसरातील अनुभव, भावविश्वाशी जुळलेली चित्र याचा मुलांना नक्की फायदाच होतो. भावनिक नाते निर्माण झाले की मग शिकणे सोपे होते. मनःपूर्वक शुभेच्छा दीपाताई व क्वेस्ट…

    1. इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा दृक श्राव्य माध्यम नेहमीच जास्त परिणाम कारक असते वाचता येत नाही म्हणून लेखी सूचना नकोत हे काही ठीक नाही उलटपक्षी मुलांना जेवढ्या जास्त प्रमाणात लेखनही वाचन करायला भाग पाडता येईल अशा पद्धती मुलांच्या विकासाच्या दृष्टीने जास्त परिणामकारक होतात. माझा स्वतःचा अनुभव याबाबतीत असाच आहे की लिहिलेला आहे म्हणजे वाचता आलं पाहिजे आणि लिहिलेलं दिसलं की आपोआप वाचायची इच्छा होते आणि आणि मुलं सहजसुलभतेने वाचू लागतात

      मुलांमधील कलागुणांच्या संदर्भात आपण विचार केला तर त्यांचे गुण व्यक्त होण्यासाठी त्यांना एक मंच उपलब्ध करून देणे आवश्यक आहे येथील भिंती हा त्यांचा मंच झाला आहे आहे. ज्या ज्या ठिकाणी मुलांना व्यक्त होण्याची संधी मिळाली आहे ते त्या ठिकाणी मुलांची सर्जनशीलता प्रकर्षाने समोर आली आहे

      शिवाय प्रत्यक्ष कृतीतून ज्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवले आहे म्हणजे वस्तू जागच्या जागी ठेवणे, स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि यातून आपोआपच येणारी स्वयंशिस्त ही जास्त परिणामकारक वाटली.

  5. अंगणवाडी ते आनंदवाडी असा प्रवास हा लेख वाचल्यानंतर दिसून येतो खरोखर ज्या मुलांसाठी अंगणवाडी आहेत त्या मुलांच्या घरी प्रिंट अवेअरनेस आहे का वाचन समृद्ध वातावरण त्यांना मिळते का याचे निश्चितच उत्तर नाही असते. आणि दीपा ताईंचे अंगणवाडी पाहिल्यानंतर आम्ही प्रारंभिक साक्षरता या विषयावर काम करत असताना याचा अनुभव घेतला आहे. हे केवळ अंगणवाडीतील मुलांसाठीच नाही तर नव्याने येणाऱ्या आमच्या सरकारी शाळातील पहिल्या वर्गासाठी सुद्धा लागू होते कारण आमच्या मुलांना हे माहीतच नसते कि जे बोलले जाते ते लिहिले जाते आणि जे लिहिले जाते ते वाचले जाते. याची जाणीव जर मुलांना करून द्यायचे असेल तर या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि छोट्या-छोट्या सूचनांच्या स्वरूपामध्ये मुलांकडून स्वतः कृती करणे आणि करून घेणे आणि हळूहळू मुले त्या सूचनासुद्धा पाहू लागतात नव्हे काही दिवसाने वाचू लागतात.
    तसेच आपला दुसऱ्या प्रश्‍नाचा विचार करता भिंतींवर कार्टून किंवा कायमस्वरूपी चित्रे असण्याचा तोटा काय आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येते कारण मुले एकच एक गोष्ट ही किती दिवस पाहतात कारण मुलांसमोर असणार साहित्य किंवा वर्गात जे काही आपण लावतो हे काही दिवसाने बदलावेच लागते कारण हे जर बदलले नाही तर काही दिवसांनी मुले त्याच्याकडे पहात सुद्धा नाही आणि हे बदलण्याची सोबतच जे काही साहित्य आपण वर्गांमध्ये लावू किंवा जे काही चित्र आपण वर्गामध्ये काढून त्यावर चर्चा होणे किंवा त्याविषयी बोलणे हे सुद्धा गरजेचे असते आणि दीपा ताईंनी हे सुद्धा केले. आपण म्हणतो मुलांना लिहिण्याचा कंटाळा असतो परंतु त्याचे कारण सुद्धा या ठिकाणी आपल्याला सापडते त्याठिकाणी फळांची जी रचना केलेली आहे त्यावर मुला हळू गेली भेटायला लागतात त्यांच्या कल्पना विश्वाला चालना मिळते आणि यातूनच लेखी मजकुराची जाण विकसित होते सोबतच मला तर स्पष्ट असे वाटते कि या पद्धतीने जर आमच्या अंगणवाड्या तयार झाल्या तर NEP मधील ठरलेल्या उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी तसेच आमच्या अंगणवाड्या समृद्ध होण्यासाठी हा लेख खूप उपयोगाचा आहे. तसेच अशा प्रकारचे व्हिडिओ हे सर्वत्र गेले पाहिजे असे मला वाटते.
    देविदास गोसावी
    बुलडाणा

  6. आनंदवाडी छान संकल्पना. अंगण आहे तिथे मोकळेपणा आहे,आनंद आहे.अशा आनंदी वातावरणात शिकण्यासाठी मुलाच्या रोजच्या छोट्या छोट्या क्रियांचा/कृतीचा वाचन समृद्ध मजकुराकरीता कसा उपयोग केला आहे ते समजले. आपल्याला जी गोष्ट शुल्लक वाटू शकते ती मुलं नव्याने शिकताना कशी सरावची करता येईल ते आणि जोडीने भाषा वाढीसाठी प्रयत्न करता येतो हे समजते.
    वर्गातील भिंतीवर काढलेली चित्रं आणि त्याविषयी व्हिडीओत आलेले उल्लेख /संवाद अगदी योग्य.
    चित्रांचा विषय, शैली मुलांच्या भावविश्वाशी जोडलेली,साधी आहे. सगळ्याच भिंती रंगवल्या नाहीत याचं एक कारण अन्य ठीकाणच्या भिंतींचा शैक्षणिक द्रुष्टीने साधन म्हणून वापर तर करता येतोच शिवाय अस्थेटिक्सचा विचार करता सगळीकडे भरगच्च चित्र काढली तर नजरेला एक शांत ,स्थिर वाटत, समतोल साधला जातो ते आवश्यक.
    आंगणेवाडी ताईंचे काम फार निकडीचे आणि कष्टाचे यात शंकाच नाही.

  7. ****वाक्यातील दुरुस्ती —भरगच्च चित्रं काढली तर समतोल राहत नाही, नजरेस स्थिर, शांत वाटत नाही असे म्हणायचे होते , टाईप करताना चुकले…

  8. अंगणवाडी मध्ये लेखी मजकूर लावल्याने निश्चितच खूप मोठा फायदा होईल कारण असा मजकूर मुलाच्या सतत डोळ्यासमोर राहिला अन ताईने काही दिवस त्याचे बोट ठेऊन वाचन घेतले तर निश्चित त्याचा फायदा मुलांच्या वाचनावर् होईल अक्षर व शब्दांचे आकार व उच्चार मुलांच्या लक्षात येतात परिणामी मुळाक्षरे ओळख होऊन त्याला अनुसरून अर्थपुर्ण वाचन करायला लागतो.हे करतांना काही सुक्ष्म बारकावे लक्षात घेणे गरजेचे आहे.जसे कि,जो शब्द ,जे अक्षर वाचन करायचे आहे त्यावरच बोट ठेवले गेले पाहीजे तसेच स्पष्ट उच्चार,व अर्थ समजेल असा आशय लावला पाहिजे
    . चित्र व शब्द हे जवळ व परिचयाचे असले पाहिजे,शक्ययतोवर ते मुलांच्या परिचयाचे व भाषेतील असावेत.याचा सकारात्मक परिणाम मुलांच्या अर्थपुर्ण वाचनावर होत असतो.

Leave a Reply

Powered by WordPress.com.

Up ↑

Discover more from The Road Less Travelled

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading