मुलांना लिहायला वाचायला कधी आणि कसे शिकवायचे असा प्रश्न बरेच पालक विचारतात. जेव्हा पालक असा प्रश्न विचारत असतात तेव्हा ते बहुधा असे विचारत असतात की मुलांना लिपी कधी आणि कशी शिकवायची. आपल्याकडे वाचन-लेखन शिकणे हे लिपी शिकण्याशी घट्ट जोडले गेले आहे. लिपी शिकणे हा वाचन-लेखन शिकण्याचा महत्त्वाचा पण ‘लहानसाच’ भाग आहे याची जाणीव बऱ्याचदा या क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही नसते. या क्षेत्रातील अनेक जाणकार बालवाडीत वाचन-लेखनाशी संबंधित कोणताही उपक्रम करण्याला विरोध करतात. याचे मुख्य कारण म्हणजे वाचन शिकवणे म्हणजे मुलांना अक्षरे व बारखडी शिकवणे ही समजूत. सध्या ज्या प्रकारे बालशाळांत मुलांना अक्षरे परत परत लिहायला लावली जातात किंवा ती स्मरणात राहावीत म्हणून सराव दिला जातो ते पाहता जाणकारांनी बालशाळेतील वाचन-लेखनाला विरोध करणे हे योग्यच आहे. पण साक्षर होण्याची व्याप्ती लिपी परिचयाच्या थोडी पलीकडे नेली तर अंगणवाडीत सघन साक्षरता कार्यक्रम असणे का गरजेचे आहे हे सहजच पटेल.
मुले आपल्या घरची तोंडी भाषा वेगाने आणि जवळ जवळ विनासायास अवगत करतात. साक्षरतेचे मात्र तसे नाही. चांगले वाचता येण्यासाठी लेखी भाषेशी संबंधित काही कल्पना मुलांना माहिती होणे आवश्यक असते. या कल्पना साधारणपणे पुढीलप्रमाणे आहेत.
- वाचनाचा आपल्या दैनंदिन जीवनात बराच उपयोग असतो आणि वाचनातून आनंद मिळतो.
- आपण जे बोलतो तेच लिहिता येते आणि लिहिलेले वाचता येते.
- आपण जसा बोलून संवाद साधू शकतो तसाच लिहून साधू शकतो.
- मराठीसारख्या भाषा वाचताना वाचक डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली वाचत जातो.
- पुस्तक वाचताना पाने उलटत पुढे वाचत जावे लागते.
- पुस्तकात चित्रे व मजकूर दोन्ही असतात आणि दोन्हीचा मिळून अर्थ लावता येतो.
मोठ्या माणसांना वाचताना किंवा लेखी भाषा वापरताना पाहून साक्षर घरातील मुले वरीलपैकी बऱ्याच बाबी शाळेत येण्याच्या आधीच शिकलेली असतात. ज्या मुलांना लहानपणी पुस्तके वाचून दाखवली जातात, ज्यांच्याशी लेखी भाषेच्या स्वरूपाबाबत आवर्जून बोलले जाते अशी मुले चटकन लिपी अवगत करतात. थोडक्यात, लहान वयापासून भरपूर लेखी भाषा मुलाच्या अवतीभोवती असेल तर मुलाचा वाचण्या-लिहिण्याचा प्रवास सुकर होतो.
मात्र ज्या घरांतील पहिलीच पिढी साक्षर होते आहे किंवा ज्यांच्या घरात लेखी मजकुराचा फारसा वापर केला जात नाही अशा मुलांना लेखी भाषेचा उपयोग समजून घेण्यासाठी अंगणवाडीवर अवलंबून राहावे लागते. म्हणूनच अंगणवाडीत एक लहानसे वाचनालय असणे अत्यावश्यक ठरते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दीपाताईंच्या अंगणवाडीतील वाचनालयाला भेट देण्याची संधी मिळेल.
व्हिडिओतून तुमच्या लक्षात आलेच असेल की मुलांना लहानपणापासून पुस्तके पाहायला, वाचायला मिळणे किती महत्त्वाचे आहे. पण मराठीसारख्या भाषांतील अजून एक अडचण म्हणजे या वयाच्या मुलांना आवडतील किंवा रुचतील अशी पुस्तकेच फारशी नाहीत. जी काही थोडीफार आहेत ती सहजासहजी मिळत नाहीत. शिवाय अनेकदा या पुस्तकांतले विषय शहरी भागांतील मुलांच्या भावविश्वातील असतात, त्यामुळे ग्रामीण मुलांना ती आपलीशी वाटतीलच असे नाही. दीपाताईंच्या अंगणवाडीत दिसणारे छोटेखानी वाचनालय तयार करणे हे वाटते तितके सोपे काम नाही.
या अडचणीवरही काही अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या कल्पकतेने मात केली आहे. त्यांनी चक्क आपल्या अंगणवाडीतल वाचनालयासाठी स्वतःच पुस्तके तयार केली आहेत. पुढे दिलेल्या स्लाईडशो मध्ये तुम्हाला असेच एक पुस्तक पाहायला मिळेल. तुम्ही मोबाईलवर ब्लॉग वाचत असाल तर पुस्तकाखाली दिसणाऱ्या ठिपक्यांच्या ओळींतील ठिपक्यांवर टॅप करून तुम्ही पुस्तकाचे एकेक पान वाचू शकता.
या पुस्तकातली भाषा काळजीपूर्वक वाचा. ‘रामूने सरकी डोबली’, ‘पराटीली फुले लागली’ अशी स्थानिक शब्दसंपदा लहान मुलांच्या पुस्तकांत येणे खूपच महत्त्वाचे आहे. कारण हे शब्द मुलांच्या अनुभवविश्वाशी घट्ट जोडलेले आहेत. म्हणून असे पुस्तक वाचून दाखवणे मुलांसाठी सर्वात अर्थपूर्ण ठरते. पण तरीही नेहमी केवळ अंगणवाडी ताईंनी स्वतः पुस्तके तयार करणे हे काही पुरेसे नाही. कारण अशा पुस्तकांची संख्या मर्यादित असणार. ग्रामीण भागांतील मुलांना आवडतील, त्यांच्या पालकांना परवडतील अशी पुस्तके निर्माण कशी करायची आणि ती मुलांपर्यंत कशी पोहचवायची हा मोठा प्रश्न आहे. अंगणवाड्यांच्या वाचनालयातून पुस्तके पालकांपर्यंत पोहचवायची असा एक मार्ग असू शकेल. पण मुळातच या वयोगटासाठी पुस्तके उपलब्ध नाहीत हा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. त्यासाठी लेखक, प्रकाशक तयार होणार का, त्यांचे आर्थिक गणित जमणार का असे अनेक प्रश्न आहेत. पण आपल्याला जर सार्वत्रिक साक्षरता खऱ्या अर्थाने गाठायची असेल तर या प्रश्नांची उत्तरे शोधण्याशिवाय पर्याय नाही. हे प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल या बाबतच्या तुमच्या कल्पना ब्लॉगला प्रतिसाद म्हणून नक्की मांडा.
आता व्हिडिओतील इतर मुद्यांकडे वळू या. लहानपणी भातुकली खेळणारी मुले आपण सगळ्यांनीच पाहिली असतील. लहान मुलांच्या विकासात या प्रकारच्या खेळांना फार महत्त्वाचे स्थान आहे. समवयस्कांसोबत खेळायचे हे खेळ मुलांच्या विकासाला मोठाच हातभार लावतात. या खेळातून सामाजिक-भावनिक विकास, भाषिक विकास यांना मोठीच चालना मिळत असते. या व्हिडिओतील अंगणवाडीताईची नक्कल करणारी मुलगी तुम्ही पाहिलीच असेल. तिला नेतृत्व करायला फार आवडते हे अगदी लगेचच कळते. काल्पनिक खेळादरम्यान मुलांचे निरीक्षण केल्यास मुलांची अशी वेगवेगळी स्वभाववैशिष्ट्ये अंगणवाडी ताईला कळू शकतात.
तुम्ही पाहिलेच असेल की व्हिडिओतील दुकानात ग्राहक झालेल्या प्रत्येक मुलाला दुकानदार आपल्याकडे लक्ष देईपर्यंत थांबावे लागले. खेळताना एखाद्याने मलाच सारे काही आधी मिळाले पाहिजे असे म्हणून चालले नसते. खेळता खेळता मध्येच एखादयाला दुकानदार व्हावेसे वाटले तरी दुसऱ्या मुलाचे खेळणे संपेपर्यंत थांबावेच लागले असते. थोडक्यात इतरांशी बरेच जमवून घेतल्याशिवाय दुकानाच्या खेळात भाग घेणे कोणालाच शक्य झाले नसते. मुले एकमेकांशी असे जमवून घेताना नकळतपणे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकतात आणि त्यातून त्यांच्या सामाजिक-भावनिक विकासाला चालना मिळते.
दीपाताईंनी तयार केलेल्या भौतिक सुविधा कशा वापरायच्या हे त्यांच्या अंगणावडीतील मुलांना आता चांगले कळले आहे. या सुविधांचा वापर मुले आता बहुधा स्वतंत्रपणे करतात. त्यामुळे दीपाताईंचे कष्ट बरेच कमी झाले आहेत. या साऱ्या सुविधा करणे फारसे खर्चिक नाही. ग्रामपंचायतीच्या निधीतून तरतूद करून त्या नक्कीच उभ्या करता येतात. फक्त त्या निर्माण करताना अंगणवाडी ताईंना बरेच मार्गदर्शन लागते. ते त्यांच्यापर्यंत पोहचवणे हे खरे आव्हान आहे. क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट या आमच्या संस्थेच्या मदतीने महाराष्ट्रातील जवळजवळ 2000 अंगणवाड्यामध्ये अशा सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. अर्थातच राज्यातील अंगणवाड्यांची लाखावर संख्या लक्षात घेता 2000 हा आकडा काही फारसा मोठा नाही. पण जे 2000 अंगणवाड्यांत घडू शकते ते सगळ्या अंगणवाड्यांत नक्कीच घडू शकेल असे म्हणता येईल.
वाचनाची अक्षरे ओळखण्या पलीकडील व्याप्ती , मूलभूत तत्वे, वाचनाच्या मजकुरात परिसराचे ठळक प्रतिबिंब असणे हे सर्व ठळकपणे स्पष्ट झाले आहे.प्रत्येक शिक्षकाला असे परिसरावर आधारित वाचन साहित्य तयार करण्याचे कौशल्य अवगत होण्यासाठी शासनाने अधिकृत उद्बोधन केले तर ते परिणामकारक ठरू शकेल.
LikeLike
नक्कीच शुक्ला सर. लहान लहान कार्यशाळातून स्थानिक विषयांवर पुस्तके कशी लिहावीत ती मुलांसोबत कशी वापरावीत हे शिक्षकांना सहज सांगता येईल त्याचा बराच मोठा फायदा होईल
LikeLike
खरंच, अंगणवाडीतील मुलांसाठी वाचनालय असू शकतं!?… हा विचारच खूप भन्नाट वाटला.
मूळात वाचनालय म्हटलं कि मोठंमोठी जाडजूड पुस्तकं हेच चित्र डोळ्यांपुढे येतं. बालसाहित्याचा विचार लवकर येत नाही. माझंही असंच काहीस होतं.
मला स्वतःला वाचायला आवडतात त्यामुळे शहरात जाणं झालं की wish list मधलं पुस्तक घेतो.
एकदा असंच पुण्याला गेलो होतो, अक्षरधारा इथुन पुस्तकं मिळाली आणि दुसर्या दिवशी शाळेत आलो. आमच्या वर्गाचा एक नियम आहे की कोणी कुठे बाहेरगावी जाऊन आलं की त्यावर चर्चा (संवाद)करतो. मुलं प्रश्न विचारत होती. नागेशन विचारलं की सर काय काय केलं? मी सांगीतलं फिरलो, पिक्चर बघीतला, पुस्तकं घेतली. मुलं म्हणाली, तु तर सर आहे मग आता कशाला पुस्तकं घ्यायची. मी सांगत होतो,अरे ही मस्त वाचायची असतात, भारी गोष्टी असतात, मज्जा येते. सचिन बोलला, सर आम्हाला पण द्या वाचायला. आणि इथुन लक्षात आलं की मुलांसाठी पुस्तकं आणायची!
बालसाहित्याचा शोध सुरू झाला. काही सापडली पण ती मुलांच्या भावविश्वाशी जवळीक साधनारी वाटली नाही.
मग फारूख सर आणि त्यांच्या साध्या, सोप्या, सरळ आणि मजेशीर गोष्टी सापडल्या. मुलांना आणि मलाही जाम आवडल्या!! त्यानंतर प्रथम ची, बालशिक्षण परिषदेत पानसे सराची, कधी मुलंही बस स्टॉप वर मिळणारी पुस्तकं घेऊन येतात. अशी यादी वाढत आहे…
हा आमचा प्रवास असा सुरु झाला. काल मी हा व्हिडिओ बघीतला आणि अजून नेमकी दिशा मिळाली. सर्वात छान म्हणजे पुस्तकांचा डॉक्टर!
– विशाल सर 🖋️
LikeLike
सविस्तर प्रतिक्रियेबाबत धन्यवाद ! मुलांना पुस्तके वाचून दाखवणे, पुस्तकांबद्दल त्यांच्याशी बोलणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या सगळ्यातून त्यांचा लिपी शिकण्याचा उत्साह वाढतो
LikeLike
निलेश सर ,नमस्कार , खूप खूप छान संकल्पना आहे ।
LikeLike
आमच्या सारख्या पालकांनी मुलांचे वाचन हे फक्त प्रश्नोत्तरे समजून घेण्यापर्यंत सीमित केले आहे. वाचनाने माहिती सोबत निखळ मनोरंजन आणि मुलांच्या भावविश्वाची व्याप्ती वाढण्यासाठीही खूप उपयुक्त आहे, हे पालकांपर्यंत पोहचवणे अपेक्षीत आहे. मुलांना एका मूलभूत साच्यात न बसवता त्याच्या व्यक्तिमत्वात प्रत्येक साचा एकरूप होऊ शकतो, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
शिक्षण म्हणजे केवळ इतरांशी गुणांची किंवा कौशल्याची तुलना करणे नव्हे तर प्रत्येक मुलाची स्वतःशी स्पर्धा करून upgrade होण्याची प्रक्रिया आहे, हे जर पालकांच्या निदर्शनास आणता आले तर शिक्षण प्रक्रिया अधिक गतिशील होईल आणि वाचनाकडे घरातूनच अधिक प्रोत्साहन मिळेल
LikeLike
तुम्ही फारच महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.वाचन आनंदासाठी करायचे असते केवळ प्रश्नोत्तरे समजून घेण्यासाठी नाही हा मुद्दा अगदी मनापासून पाटला.
तसेच दोन मुलांची परस्परांशी तुलना करणे अगदीच चुकीचे वाटते पण बरेच पालक हे सतत करत असतात. ते असे का करतात हे मात्र कळत नाही.
LikeLike
लिपी ओळखीची होण्याच्या आणि वाचन ,लेखनाच्या प्रवासास सुरुवात करताना भिंतीवरचं हे वाचनालय किती मोठी भूमिका बजावतं. मुळात येता जाता सातत्याने पुस्तके नजरेस पडणे , ती हताळण्याची मोकळीक असणे हेच फार छान वाटते. नाहीतर सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्या घरांमध्येही पुस्तकांना /मुलांच्या पुस्तकांना किती जागा असते हा प्रश्नच आहे.
परंतु दिपाताईंच्या वर्गातील वाचनालय आणि पुस्तकांचा दवाखाना दोन्ही मस्तच.
‘सरकी’ हे चिमुकलं पुस्तक खूप आवडलं. वाचताना नकळत मलाही नवीन शब्द शिकायला मिळाले ..
मुलांच्यासाठी तयार केलेली , त्यांच्या परीसराचा विचार, तशी भाषा आणि चित्र योजना आखून पुस्तके करणे गरजेचे. याआधीही मुलांना आपलीशी वाटतील अशी, त्यांच्या गरजा ओळखून केलेल्या पुस्तकांचा विचार विशेष मुलांचा अभ्यास करताना केला होता. शिक्षक,शाळा, अंगणवाडी यांनी एकत्र येऊन पुस्तक निर्मिती होऊ शकेल का असे वाटते. अंगणवाडी ताईंच्या मदतीने , त्यांच्याशी संवाद साधून मुलांचे भावविश्व जाणून घेऊन ही पुस्तक निर्मिती कमीत कमी खर्चात कशी करता येईल आणि मुलांना पुस्तके उपलब्ध होतील हे बघणे आवश्यक आहे.
मुलांसाठी पुस्तक निर्मिती, पुस्तकासाठी आशय तयार करणे/गोष्ट करणे, चित्र काढणे या अत्यंत आवडीच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयात माझी काही मदत होणार असेल तर मी निश्चित याकरता सहभागी होऊ शकते. फक्त परीसराशी, बोलीभाषेशी ओळख नाही एवढीच एक अडचण असेल.
उपयोगी आणि सुबक वाचनालयाचा अनुभव देणारा हा व्हिडीओ उत्तम !!
धन्यवाद सर .
– अपर्णा कुलकर्णी, पुणे.
LikeLike
🙏नमस्कार सर
सुरवातीला मी जेव्हा अंगणवाडी मधे मुलांना शिकवत होते तेव्हा मुलांकडून बाराखडी वाचून घेणे लिहायला सांगणे गाणं म्हणणे एखादा खेळ खेळणे आणि तोंडी गोष्ट सांगणे असा क्रम चालायचा.पण जेव्हा पासून पालवी मार्फत प्रशिक्षण झाले अंगणवाडीत भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या त्यानंतर अंगणवाडीच्या कामामध्ये खूप चांगला बदल झाला आता जेव्हा मुलांना मी फळांचे भाजीचे किंवा रंगाचे कार्ड मुलांना दाखवते दोन तीन वेळा वाचून झाले की ते मुल ते कार्ड ,पुस्तकातील गोष्ट जशीच्या तशी वाचून काढतात.सुरवातीला गोष्टीचे पुस्तक दाखवल्यानंतर जेव्हा मुख पृष्ठ दाखवून ही कशाची गोष्ट असेल असा अंदाज मुलांना घ्यायला लावायची तेव्हा बहुदा मुलांचा अंदाज चुकायचा मात्र काही दिवसांनी मात्र अगदी नवीन असलेल्या पुस्तकातील गोष्टीचा मात्र अंदाज बरोबर लावायचे अंगणवाडीत असलेल्या वाचनालयाचा मुलांना खूप फायदा झाला.
धन्यवाद सर🙏
LikeLike
🙏🏻नमस्कार नीलेश सर 🙏🏻
जर प्रत्येक अंगणवाडी ताई ने आपल्या गावातला, परिसरातला, वातावरणातील ,सामाजिक, शैक्षणिक मूल्य मापन करून जर एखादी कथा , काही प्रसंग, गाणी तयार केलीत तर सुरुवातीला वेगळी जास्तिची पुस्तके आणण्याची गरज राहणार नाही. तसेच ही पुस्तके मुलांच्या परिचयाची असण्याने जास्त एकरूप होऊ शकतात. व अंगणवाडीत येण्याची आवड निर्माण करायला मदत करू शकतात. कारण ग्रामीण भागात मुलांना बरेचसे चित्र व प्रत्यक्ष कृती पहायला मिळतात व त्यावर गोष्टी तयार करायला व समजावून दयायला वेळ लागणार नाही.
धन्यवाद🙏🏻
LikeLike
मा.निमकर सर,नमस्कार. आपला लेख वाचून खूप छान वाटले. अंगणवाडी तील वाचनलय ही संकल्पना आमच्या सोबत च आमच्या अंगणवाडीत येणाऱ्या मलांच्या पालकांनाही कळायला लागली आहे. हा सकारात्मक बदल आहे. परिवर्तनाची गती मंद आहे. वाचाल तर वाचाल ही बाब पालकांना समजावून सांगण्याच्या आमच्या कामात पालवी टीम आमच्या सोबत आहे. त्या करिता त्यांचे मनापासून आभार.
LikeLike