अश्विनीची अभिव्यक्ती प्रमाण भाषेतील नाही. तिची वाक्यरचना विस्कळीत आहे. जसे मनात विचार आले तसे ते कागदावर उतरवायचा प्रयत्न तिने केला आहे. लिखाणाचे फारसे नियोजन केले ही नाही. पण म्हणून काय झाले? आपल्या भावना लिहून दुसऱ्यापर्यंत पोहचवता येतात हे तिला नेमके उमगले आहे. सरांसाठी काहीतर करायची तिची भावना अगदी अस्सल आहे. अशावेळी तिच्या लिखाणातल्या चुका काढत बसणे अगदी करंटेपणाचे ठरेल.