मराठीतील संख्यानामे

बालभारतीच्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकात दोन अंकी संख्यांच्या नामात केलेला बदल सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकवीस, बावीस या ऐवजी वीस एक, वीस दोन अशी पर्यायी संख्यानामे पाठ्यपुस्तकात सुचवली आहेत. अनेक जणांना हा बदल अजब वाटतो आहे. या संख्यानामांतील बदलामुळे मुलांना नेमके काय म्हणायला शिकवायचे या बाबत शिक्षक आणि पालक यांच्यात बराच गोंधळ उडालेला दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर हा बदल का करण्यात आला आहे हे समजून घेणे अगत्याचे ठरेल.

मराठी आणि बऱ्याचशा उत्तर भारतीय भाषांत शंभरपर्यंतच्या संख्यांच्या नावांमध्ये फारशी सुसंगती आढळत नाही. पुढील काही उदाहरणे ही विसंगती लक्षात यायला पुरेशी ठरावीत. एकक स्थानी २ असणाऱ्या या संख्यांची नावे पाहा. बावीस, बत्तीस, बेचाळीस, बहात्तर, ब्याण्णव. बारकाईने पाहिले तर लक्षात येईल की एकक स्थानची २ ही संख्या वाचताना आपण बा, बत्, बे, ब, ब्या असे वेगवेगळे उच्चार करतो आहोत. आता जी बाब  दोनाच्या बाबतीत आहे, ती इतरही संख्यांच्या बाबतीत खरी आहे हे सहजच लक्षात येईल. आपण बेचाळीस सारखी संख्या लिहिताना आधी चाळीसातील चार लिहितो आणि नंतर दोन लिहितो. मात्र तीच संख्या  वाचताना आधी दोन (बे) आणि मग चाळीस असे वाचतो. अजून एक बाब म्हणजे एकक स्थानी ९ आला की आपण पुढच्या दशकाचा संदर्भ घेतो. उदाहरणार्थ शेहेचाळीस ,सत्तेचाळीस ,अठ्ठेचाळीस या पुढे येणारी  संख्या मात्र नवचाळीस न राहता एकोणपन्नास होते. एकक स्थानच्या नवाचा हा  नियमही नेहमीच वापरला जातो असे नाही. सत्याण्णव, अठ्ठ्यांण्णव नंतर एकोणशंभर न येता नव्याण्णव येतात!

उत्तर भारतातील भाषांत अशी विसंगती का निर्माण झाली याचे स्पष्टीकरण प्राध्यापक मनोहर राईलकर यांनी त्यांच्या संख्यावाचन या लेखात दिले आहे. या बाबतचे त्यांचे म्हणणे त्यांच्याच शब्दांत समजून घेणे उचित ठरेल.

संस्कृतमध्ये संख्यावाचनाचा नियम ‘अंकानां वामतो गती’ म्हणजे ‘अंक उजवीकडून डावीकडे वाचावेत’ असा आहे. १४७ ही संख्या ‘सप्तचत्वारिशत् अधिक शतम’ अशी वाचतात. म्हणजे ‘सात चाळीस आणि एकशे’, म्हणूनच मराठीत आपण पाढे म्हणताना ‘सत्तेचाळासे’ असं म्हणत असतो. पण संख्यावाचनाचा हा नियमसुद्धा आपण, म्हणजे मराठीनं धडपणं पाळला आहे, असं दिसत नाही. पाढ्यांव्यतिरिक्त वरील संख्या आपण ‘एकशे सत्तेचाळीस’ अशीच वाचतो. याचा अर्थ, लिहिण्याचा क्रम १-४-७ तर वाचण्याचा क्रम मात्र १-७-४ असा. अधिक मोठ्या संख्यांच्या वाचनात तर हा गोंधळ आणखी प्रकर्षानं जाणवतो. उदा. ३५७४ ह्या संख्येच्या पस्तीसशे चौऱ्याहत्तर अशा वाचनातील अंकांच्या वाचनाचा क्रम ५-३-४-७ असा असल्याचं दिसून येईल. संस्कृतमधून घेतलेली ही ‘वामतो गती’ व्यवहारात आणि प्रत्यक्षात फक्त दोन अंकी संख्यांपुरतीच मर्यादित राहिली असल्याचं आढळून येते.

संख्यावाचन, मनोहर राईलकर

राईलकर सरांनी त्यांच्या लेखात मांडलेल्या काही मुद्यांची चर्चा करणारा ग्राममंगल संस्थेने तयार केलेला हा व्हिडिओ पाहा.

इंग्रजी किंवा दक्षिण भारतीय भाषांत संख्या ज्या क्रमाने लिहिल्या जातात त्याच क्रमाने वाचल्या जातात. उदाहरणार्थ 35437 ही संख्या आपण इंग्रजीत Thirty five thousand four hundred and thirty seven अशीच वाचतो. आता  या विवेचनानंतर एक बाब अगदी स्पष्ट आहे की मराठीतील संख्यानामांतील ही विसंगती लहान मुलांना  संख्या शिकताना अडचणीची ठरू शकते. या बाबतचा माझा अनुभव असा की बहुसंख्य मुले संख्यानामांत अशी विसंगती असली तरी त्यावर थोड्याफार प्रयत्नाने  प्रभुत्त्व मिळवतातच. मात्र ज्या मुलांची घरची भाषा शाळेच्या भाषेपेक्षा ( प्रमाण मराठीपेक्षा ) वेगळी आहे अशा आदिवासी मुलांसाठी संख्यानामांची  ही अडचण फारच मोठी ठरते. विशेषतः ज्या घरांतील पहिलीच पिढी शाळेत आली आहे किंवा ज्या घरांत पाठांतराची परंपरा नाही अशा मुलांना शंभर पर्यंतच्या संख्यांवर प्रभुत्त्व मिळवण्यासाठी फारच कष्ट करावे लागतात. अशावेळी ही मुले सामान्यपणे वर्गात मागे पडतात. माझ्या मते  गणिताची भीती किंवा नावड निर्माण होण्याचे हे एकमेव नसले तरी एक महत्त्वाचे कारण आहे. गेले काही महिने मी वीटभट्टीवर स्थालांतरित झालेल्या मुलांना गणित शिकवत आहे. या मुलांना ८० नी ४ विटा हे सहज समजते मात्र चौऱ्यांशी असे संख्या नाम सांगितले की ती गोंधळतात. मुलांच्या या अडचणी बाबत अनवट वाट वरील प्रगती या लेखात सविस्तर वाचायला मिळेल.  

मराठी व काही उत्तर भारतीय भाषांत असणारी संख्या नामांची विसंगती आणि त्यामुळे मुलांना संख्या शिकताना येणाऱ्या अडचणी हेच बालभारतीतील संख्यावाचनाची पद्धत बदलण्यामागचे कारण आहे. अर्थातच गणितातील अत्यंत पायाभूत अशा संकेतांमध्ये केलेल्या या बदलाचे परिणाम दूरगामी आहेत. दोन अंकी संख्यानामे नवीन संकेतांनुसार वापरायची झाली तर मोठ्या संख्या वाचताना त्या कशा वाचाव्यात याचे संकेतही निश्चित करावे लागतील. उदाहरणार्थ पस्तीस हजार सातशे बेचाळीस (३५७४२) ही संख्या तीस पाच हजार सातशे चाळीस नी दोन अशी वाचावी लागेल. या प्रकारे सांगितलेली संख्या समजून घेताना जुन्या संकेतांचा वापर करणाऱ्या अनेकांना फारच बिचकायला होईल. मात्र मुले लहानपणापासून नव्या संकेतांप्रमाणे वाचन शिकत असतील तर त्यांचे फारसे काही अडणार नाही.

मात्र अशाप्रकारचा बदल केवळ पाठ्यपुस्तकांत येणे पुरेसे नाही. कारण पाठ्यपुस्तकांचा संबंध केवळ शाळा, मुले आणि शिक्षक यांच्याशी आहे. त्या पलिकडील मराठीतून चालणारा गणित व्यवहार हा सामाजिक स्वरूपाचा आहे. नव्या संकेतांनुसार शिकणाऱ्या मुलाने दुकानात गेल्यावर ‘तीस सात किलो तांदूळ द्या’ अशी  मागणी केली किंवा कंडक्टरला ‘दोन तिकिटांचे दोनशे तीस नी आठ झाले ना? असा प्रश्न आज विचारला तर गोंधळ माजेल. कारण जुनी संख्यानामे समजून घ्यायला आपण इतके सरावलो आहोत की ती आपल्याला मुद्दाम विचार करून समजून घ्यावी लागत नाहीत. नवे संकेत मात्र आपल्याला पदोपदी विचार करायला भाग पाडणार आणि त्याचा आपल्याला त्रास होणार.

संकेतांतील हा बदल एखाद दोन नाही तर कोट्यावधी व्यक्तींनी स्वीकारायला लागेल. अशाप्रकारचे बदल करणे ही केवळ शैक्षणिक बाब नसून तो एक सामजिक आणि राजकीय निर्णय ही आहे. म्हणून या प्रकारचा बदल करण्याची गरज समाजातील बहुतेकांना पटल्याशिवाय तो प्रत्यक्ष व्यवहारात येणे अवघड आहे. भारताने  लांबीचे फूट हे एकक सोडून मीटर हे प्रमाणित एकक स्वीकारल्याला अनेक वर्षे झाली तरीही जाहिरातीतील  फ्लॅटचे दर आपल्याला प्रती चौरसफूटच दिलेले दिसतात. कारण जनमानसांत चौरसफूट या एककाचा एक ढोबळ अंदाज आहे. जाहिरातदाराने जरी स्पष्टपणे  चौरस मीटरचा दर दिला तरी तो चौरसफुटाचा आहे असा समज होऊन, ग्राहकाला तो जास्त वाटण्याची शक्यता आहे. म्हणून चौरस मीटरचा दर देण्याचा धोका कोणीही जाहिरातदार पत्करत नाही.

गणिताच्या संकेतांतील असे बदल शालेय अभ्यासक्रमात या आधी झालेलेच नाहीत असे नाही. एक पंचमांश या प्रकारचे व्यवहारी अपूर्णांकांचे वाचन बदलून ते एक छेद पाच किंवा एक अंश छेद पाच असे करावे हा बदल गेल्या काही वर्षांत केला गेला आहे. मात्र एकूणच व्यवहारी अपूर्णांकांचा वापर कमी होत असल्याने ( दशांश अपूर्णांकांच्या तुलनेत) त्या बाबत फार गदारोळ झालेला दिसत नाही. मात्र आता रोजच्या वापरातील १०० पर्यंतच्या संख्यांच्या नावात बदल करायचा म्हटल्यावर त्याला विरोध होणे साहजिकच आहे.

आता प्रश्न उरतो तो हा बदल करावा की नाही याचा. जर प्रत्येक मुलाला गणित यायला हवे अशी आपली इच्छा असेल तर या बदलाचे स्वागत करावे लागेल. कारण त्यामुळे पाठांतराची परंपरा नसलेल्या घरांतील मुलांना गणिताशी जमवून घेणे थोडे सुलभ होईल. मात्र हा बदल केवळ एका पाठ्यपुस्तकांत येणे पुरेसे नाही. यानंतर येणाऱ्या प्रत्येक पाठ्यपुस्तकाने तो विचार उचलून धरावा लागेल व नेटाने पुढे न्यावा लागेल.

नवे संकेत स्वीकारताना समाजातील जवळ जवळ प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात बदल करावा लागेल. नवे संकेत एखाद्या महिन्यात किंवा वर्षात समाजात रुळणार नाहीत त्यासाठी सांधेबदलाच्या काळात जुनी व नवी अशा दोन्ही संकेतव्यवस्था सुरू ठेवाव्या लागतील. नवे संकेत शिकणाऱ्या मुलांना काही काळतरी दोन्ही संकेतप्रणालींशी  जमवून घ्यावे लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे बदल टिकाऊ स्वरूपात होण्यासाठी समाजातील सर्वच व्यवस्थांना ते स्वीकारावे लागतील. उदाहरणार्थ शासनातील विविध विभागांत नवे संकेत कसे व कधी लागू करायचे याचा आराखडा तयार करावा लागेल किंवा आर्थिक क्षेत्रात बॅँकांनी चेकवर नव्या संकेतांनुसार लिहिलेली अक्षरी रक्कम मान्य करावी लागेल. बालभारतीने मुलांना केंद्रस्थानी ठेवून हा बदल करण्याचे धाडस दाखवले आहे. मात्र हे बदल टिकण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असणे अत्यंत गरजेचे आहे.   

14 thoughts on “मराठीतील संख्यानामे”

 1. खूपच छान दादा.
  खूप चर्चा चाललीये सध्या यावर.
  अभ्यास मंडळ या मागची पार्श्वभूमी आणि शास्त्रीयता शिक्षक व समाज यांच्यासमोर मांडण्यात यशस्वी ठरेल ही अपेक्षा करूया.
  लेख वाचून अनेक महत्वाच्या बाबी लक्षात आल्या.
  पण इतक्या सहज बदल करून हे सगळं व्यवस्थित स्वीकारलं जाईल याबाबत मी साशंक आहे.
  या बदलात अजूनही अनेक बाबी अस्पष्ट वाटतात. हे सगळं शिक्षकांसमोर अगदी सक्षमतेने पोचलं तरंच फायदा, नाहीतर पुन्हा घोळ.
  लेखात आपण सगळं अगदी छान मांडलं.
  सामाजिक व राजकीय पाठबळ नसलेला केवळ पाठ्यपुस्तकातील बदल किती स्वीकारला जाईल पाहूया.
  फक्त बदल करून भागणार नाही तर मुलाच्या गणित शिक्षण पथामध्ये याचा कुठे व कसा बदल होईल हे शिक्षकपर्यंत पोचणं अधिक गरजेचं वाटतं.

  Like

 2. हा बदल नक्कीच खूप सकारत्मक आहे असे मला वाटते कारण मी सुद्धा अश्या मुलांसोबत काम करते ज्या मुलांची बोली भाषा शाळेच्या भाषेपेक्षा ( मराठीपेक्षा ) वेगळी आहे. मला सुद्धा मुलांना शिकवताना संख्यानामांची ही अडचण खूप मोठी वाटते. संख्या ओळखण्यास आणि समजण्यास जो मुलांचा गोधळ होतो त्यासाठी हा बदल साह्य करणारा आहे.
  मुलांच्या संख्यानामाची समज वाढवण्यासाठी हा बदल महत्वपूर्ण वाटत आहे.

  Like

 3. बदला मागचं कारण एकदम मान्य,
  पण मंडळाने २१ ते ९९ पर्यंतच लिहिलंय.
  त्याच्या पुढचे काय:
  १४७ : एकशे सत्तेचाळीस
  का
  एकशे चाळीस सात?

  Like

  1. या बाबत स्पष्टता नाही ही मोठीच अडचण आहे. बदल केवळ एकाच वर्गाच्या पाठ्य पुस्तकात आला आहे व त्याच्या दूरगामी परिणामाचा विचार झाला आहे की नाही हे कळायला मार्ग नाही

   Like

 4. नव्या (व आवश्यक) बदलाचे उत्तम विवेचन करणारा लेख

  Like

 5. १ तुझ्या लेखातला ऐंशी *नि* चार यातला *नि* बालभारतीनं घेतलेला नाही. तो घेणं मराठीच्या दृष्टीनं महत्त्वाचं. त्यामुळे संख्यासंकल्पना स्पष्ट होतात आणि मराठीलाही धक्का ‌लागत नाही.
  २ ‘जोडाक्षरं अवघड जातात’ असं या बदलामागचं कारण बालभारतीत दिलं आहे ते वेडगळ आणि लंगडं आहे. उद्या जोडाक्षरविरहित पाठ्यपुस्तकं करण्याचीही टूम निघेल!
  मुळात, बोलताना मुलं जोडाक्षरं सहज वापरायला शिकत असतातच, कारण फोड करून आपण तार्किक पद्धतीनं ती त्यांना शिकवत नाही. आपण जोडाक्षरं वापरली ही जाणीवही त्यांना नसते, इतक्या सहजपणे हे घडतं. तितक्याच सहजपणे जोडाक्षरांच्या लिखित रूपांची ओळख मुलांना करून देता येते. यावर मी अनेक शिक्षकप्रशिक्षणं घेतली आहेत आणि महाराष्ट्राभरातल्या त्या त्या शाळांमधली मुलं सुरुवातीपासूनच जोडाक्षरं सहज लिहू लागली असा अनुभव आहे.
  इथे प्रश्न खरं तर जोडाक्षरांचा नाहीच आहे. मुलांना अवघड जाणा-या बावीस, तेवीस, पंचवीस, सेहेचाळीस… इत्यादी संख्यांच्या नावांमध्ये जोडाक्षरं आहेतच कुठे?
  ३ – सष्ट, – हत्तर …यांचं आणि बे-बा-ब्या/ ते- तेहे-त्र्या… यांचं नातं त्या त्या संख्येशी जोडून थोडासा सराव घेतला, तर मुलांना ( विशेष गरज असलेल्या मुलांनाही) संख्यांची नावं संकल्पनेशी जोडून शिकणं खूप सोपं जातं असा माझा अनुभव आहे.
  ४ मराठी भाषेची संख्यांच्या नावाबाबतची धाटणी मुलांना समजावून सांगितली तर समजते. भाषिकदृष्ट्या पुरेसे नियोजन करून pilot अभ्यास केला का? संदर्भ? नसेल, तर तो करण्याआधीच राज्यपातळीवर असा निर्णय घेणं अतिघाईचं आहे असं मला वाटतं.
  तू उदाहरणं दिलीच आहेस, तशा परिस्थितीत,
  मुळात अडचण येणा-या मुलांची अडचण आणखीच वाढण्याची शक्यताच यात दिसते.

  Liked by 2 people

 6. ज्या मुलांच्या घरांतून प्रमाण मराठी बोलली जात नाही अशा मुलांच्या घरांतून बोलल्या जाणाऱ्या कित्येक बोलीभाषा ह्या इतर शब्दांप्रमाणेच संख्यानामाच्या वापर व आकलनाबद्दल वैविध्य बाळगून आहेत. आज बोली भाषेत ८० नि ४ ची समज असणाऱ्या मुलांना चौऱ्याऐंशीचं आकलन जितकं अवघड ऐंशी चार ह्या रचनेचं आकलनही तितकंच अवघड असणार आहे. त्यामुळे ही कारणमीमांसा ह्या बदलासाठी पोकळ आहे असे वाटते. शिवाय इतर भाषांच्या वापरासारखंच मराठीचंही वळण असावं असा अट्टाहास संस्कृतानुगामी मराठीच्या चरणातही केला गेला. आता फक्त संस्कृतऐवजी इंग्रजीचं अनुकरण होत आहे एवढाच फरक दिसतो आहे.

  Liked by 2 people

 7. अमराठी शिकणाऱ्या मुलांना अवघड जाते म्हणून मराठी मुलांना हे असं शिकवण हा मराठी मुलांवर अन्याय आहे. यात आपल्या मराठी भाषेचं नुकसान आहे. मराठी लोक कर्नाटकात गेले आणि त्यांना कानडी आला नाही म्हणून काय कानडी शब्द बदलणार का? त्यापेक्षा ज्यांना मराठी शिकायचं नाही त्यांना शिकवण्याचा अट्टाहास सोडा आणि ज्यांना शिकायचं आहे त्यांना नीट शिकवा! सगळा अभ्यास शक्य तितका सोप्पा करायचं.. आठवीपर्यंत मुलांना नापास करायची नाही हे कसले नवीन नियम. नवीन पिढीवर अन्याय आहे हा!

  Liked by 2 people

  1. मी अन्य भाषिक राज्यातील मुलांबाबत बोलत नाहीये. मला महाराष्ट्रातील पावरी, भिली, कोरकू, आशा भाषा बोलणाऱ्या आदिवासी मुलांबाबत बोलायचा आहे.

   Like

   1. पण या आदिवासी बोली भाषांमधेही संख्यानामांबाबत एकवाक्यता आहे का? ती नाही म्हणूनच प्रमाण भाषेतील संख्यानामं गरजेची ठरली नं. आत्ता असलेली प्रमाण भाषेतील संख्यानामं ही प्रथम शिकणाऱ्या कुठल्याही माणसाला अवघडच वाटणार आहेत ती सोपी जावीत यासाठी ती प्रमाण संख्यानामंच बदलणं हा उपाय कसा योग्य? ज्या घरात प्रमाण भाषा शिकलेले असतात त्यांना घरच्यांच्या मदतीने कित्ता सोपा जातो हे मात्र नक्की

    Like

   2. okay sir,understood that this is not for non-marathi but also for those who not speak Marathi home.
    जे कारण दिलंय या बदलासाठी ते जरी चांगलं वाटलं तरी अशी किती मुले आहेत हे statistic कुठं आहे?? ८-१०% मुलांसाठी प्रमाण भाषा बदलत बसण्यापेक्षा सोपं गणित / standard गणित असे दोन विषय ठेवावेत ना आणि मुलांना निवडू दे हवी ती काठिण्य पातळी. दुसरीतच हे अंक लिहायचा हट्ट सोडून देऊ.. basic गणित घेणाऱ्यांना एक ते शंभर शिकायला दोन वर्ष देऊ.. असे काही करता आले असते?
    ज्यांना दुसरीच्या वर्गात गणित कठीण जातं त्यांना पुढे किती कठीण जाईल? पण म्हणून प्रत्येक यत्तेचं गणित असं सुलभ करणार की काय!
    जमणार नाही म्हणून आधीच सोप्पं करायचं हे चुकतंय. नवीन गोष्ट शिकताना आव्हानं येणारच. पण नवीन पिढ्या हुशार आहेत. त्यांना आव्हानं द्यायला हवीत आणि आता तर नापास होण्याचीही भीती नाही 🙂
    आपल्या भाषेत अंक वेगळ्या प्रकारे म्हणले जातात पण हीच तर भाषेची वैशिष्ट्य आहेत!

    Liked by 1 person

 8. नमस्कार आपल्या सर्वांची चर्चा आणि आपण लिहिलेली महत्वाचं आणि अनवट वाट या सदरातील संख्या नावातील बदल हा सुद्धा वाचला. काल दिवसभर प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने होत असलेली चर्चा आणि त्यावर येत असलेली मत-मतांतरे हे सुद्धा ऐकले आणि इयत्ता दुसरीचे पुस्तक आणखी काळजीपूर्वक बघितले आपल्या लेखातील व्हिडिओ सुद्धा बघितला निलेश सर यांनी म्हटल्याप्रमाणे कुठलाही बदल ज्यावेळी करायचा असतो त्यावेळी राजकीय इच्छाशक्ती याची फार मोठी भूमिका त्यामध्ये असते आणि माझे तर मत असे आहे की एखादा बदल करत असताना त्याबाबत जी स्पष्टीकरणे दिली जातात ती खूप विचारपूर्वक आणि सर्वांना समजतील सर्वांना विश्वासात घेऊन दिली जावी जसे की पाठ्यपुस्तकात एक स्पष्टीकरण असे आले आहे जोडाक्षर विरहित परंतु मुळात 70 50 यासारखी संख्या नामे जर आपण बघितली तर या जोडाक्षरांचा उल्लेख आहेत म्हणजेच जोडाक्षर विरहित हे कारण न पटण्यासारखं आहे आणि आज कितीही शिक्षक ओरडत असले तरी जी मंडळी इयत्ता पहिली दुसरी ला शिकवते त्यांना सगळ्यात मोठी अडचण जर कोणती असेल तर ती मुलांच्या लक्षात असणारे संख्या नावे संख्या नामे शिकवत असतांना शिक्षकांसाठी तारेवरची कसरत असते मान्य आहे काही मुले सहज शिकतात परंतु सर्वच मुले एक ते शंभर पर्यंत ची संख्या नावे शिकू शकत नाही आणि हा जो बदल याठिकाणी दिला आहे यातून निश्चितपणे जर शिक्षक या नात्याने समजून घेतला तर संख्या नावे शिकण्यासाठी मुलांना अडचण येणार नाही फक्त विनंती एवढीच असेल की यासंदर्भातील स्पष्टीकरणे ही व्यवस्थित मांडली जावी आज लोकमत पेपर मध्ये डॉक्टर जयंत नारळीकर यांचा सुद्धा यासंदर्भातील एक छानसा लेख या ठिकाणी आला आहे.
  आपण एका गोष्टीचा विचार जर केला जसे 19 29 39 49 59 69 79 89 या संख्या जर कोणत्याही व्यक्तीला वेगात लिहिण्यास सांगितले तर कितीही हुशार आणि पटाईत व्यक्ती असला तरीसुद्धा या संख्या लिहिताना त्याच्या मेंदूमध्ये एक वेगळी प्रक्रिया एक वेगळा विचार निर्माण होतो आपण काही सेकंद विचार करून मगच ही संख्या लिहितो आपण हा प्रयोग कोणावरही करून बघू शकतो आणि केल्यानंतर त्याला विचारावे की ही संख्या लिहिताना आपण किंचितसे थांबलो की नाही म्हणजेच जो संख्या नावातील बदल आहे तो करण्याची काय गरज आहे हे आपल्या लक्षात येईल.
  यासंदर्भात निलेश सर, वर्षा ताईने दिलेले स्पष्टीकरण हे सर्व वाचले की आपल्या लक्षात येते आणि व्हिडिओमध्ये तर स्पष्ट संख्येतील वाचनात होणारा बदल लगेच लक्षात येतो म्हणून माझी वैयक्तिक आपणा सर्वांना अशी विनंती असेल की राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असेल तेव्हा असेल परंतु निलेश सर वर्षाताई यासारख्या मंडळींनी या बाबतीमध्ये आणखी चांगल्यात चांगले लेख प्रसारित करून आम्हा शिक्षकांच्या डोक्यातील तसेच राजकीय मंडळींच्या डोक्यामध्ये यासंदर्भात कशी जागृती निर्माण होईल याचा विचार करावा.
  आणि आणि शेवटी एकच सांगेन की नवीन एखादा बदल जेव्हा केव्हा येतो तो स्वीकारण्यासाठी काही कालावधी जाणार जावा लागतो कारण आम्ही पारंपरिक पद्धतीमध्ये पूर्वीपासून शिकत आलो आहोत आणि त्यात जर बदल करायचा असेल तर आम्हाला कुठेतरी त्रास हा होणारच आहे म्हणून माझी सर्वांना विनंती असे की केलेला हा बदल आपण सर्वच सकारात्मक दृष्टीने विचार करून स्वीकारूया आणि या संदर्भामध्ये मी शिक्षक म्हणून या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून माझ्या वर्गातील मुले हे कशी लवकरात लवकर शकते याचा विचार करू या धन्यवाद.

  Like

 9. नमस्कार निलेश सर,
  एक शिक्षिका या नात्याने 2 री च्या पुस्तकातला हा बदल सकारात्मक रीतीने स्वीकारून बघायला हवा असे मला वाटते. आणि जेव्हा बदल करायचा आहे तेव्हा काहीतरी trial and error पद्धतीनं थोडं शिकवावे लागेलच . कारण मुलेही वेगवेगळ्या स्तरावरची असणार आहेत. आणि संकल्पना स्पष्ट होणे यावर भर दिला तर ही पद्धत चांगली उपयोगी पडेल असे वाटतेय. फक्त वर चर्चिल्या प्रमाणे हा बदल इतरांनाही स्वीकारायला हवा, तसेच सुरुवातीच्या काळात जुन्या आणि नव्या दोन्ही पद्धतींना मान्यता द्यायला हवी. उदा. संख्यानामांचे वाचन आणि लेखन. नाहीतर मुलांचा आणि शिक्षकांचा दोघांचाही खूप गोंधळ उडेल.तसेच हा बदल 11 ते 99 पर्यंतच मर्यादित ठेवला तरी चालू शकेल असे वाटते, कारण मुलगा तिसरीत जाईपर्यंत थोडी समज पण वाढेल आणि मग त्याला पारंपरिक पद्धतीने लिहिल्या जाणाऱ्या संख्यांचे ही आकलन होऊ शकते. शिवाय काही मुलांना जुन्या पद्धतीनं ही समजलेलं असूच शकतं. तेव्हा एका संख्येची दोन नावं आहेत असे सांगता येईल उदा. तीन अंकी संख्यांसाठी 147 ही संख्या एकशे चाळीस सात आणि एकशे सत्तेचाळीस ही दोन नावं सांगता येतील. परंतु एकशे सत्तेचाळीस हे लिहिणे/ वाचणे सोपे आहे अशी तुलना सांगता येऊ शकते…..शेवटी मुलांना संख्यांची संकल्पना व मूल्य समजणे महत्वाचं आहे हे मनात ठेवून बदल स्वीकारायला हवा!

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s