वर्ष 2020 मध्ये घडलेली अभूतपूर्व घटना म्हणजे कोविड 19 या रोगाची जागतिक साथ. या साथीमुळे देशातील बहुतांश शाळा आणि अंगणवाड्या जवळ जवळ गेले वर्षभर बंद आहेत. पाचवी ते दहावीच्या शाळा काही प्रमाणात उघडल्या असल्या तरी अंगणवाड्या मात्र अजूनही बंदच आहेत. या शाळाबंदीचा मुलांच्या आयुष्यावर आणि शिकण्यावर नेमका काय परिणाम झाला आहे याचा आदमास अजून पूर्णपणे कोणालाच आलेला नाही. पण या काळात मुलांचे शिक्षण सुरू राहावे या साठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याचे अनेक प्रयत्न शासकीय आणि अशासकीय पातळीवर सुरू झाले आहेत. अशाच एका प्रयत्नाचा हा धांडोळा.
पालवी हा क्वेस्टचा कार्यक्रम जवळ जवळ 1800 अंगणवाड्यांपर्यंत पोहचला आहे. अंगणवाडी सुपरवायजर आणि सेविकांसोबत काम करून अंगणवाड्यांतील बालशिक्षणाची सेवा मजबूत करणे, असे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. लॉकडाऊन नंतर हे काम जे ठप्प झाले ते अजून सुरू झालेले नाही आणि म्हणूनच अंगणवाडी बाहेर मुलांचे शिक्षण कसे चालू ठेवता येईल याचा विचार सुरू झाला.
अंगणवाडीच्या मुलांचा वयोगट लक्षात घेता त्यांच्या हातात मोबाईल किंवा तत्सम उपकरणे देऊन शिकवणे हे फारसे योग्य नाही. कारण एकतर इतक्या लहान वयात मुलांच्या हातात स्क्रीन दिल्यावर त्याचे काय दुष्परिणाम होतात हे अजून पूर्णपणे उमजलेले नाही. दुसरे म्हणजे स्क्रीन वर तयार केलेले शैक्षणिक अनुभव हे फारच मर्यादित असतात. खऱ्याखुऱ्या वस्तू वापरून मोठ्या माणसांच्या मदतीने घेतलेला अनुभव मुलांसाठी जास्त फायद्याचा आहे. याचा विचार करता पालकांच्या मदतीने मुलांचे शिक्षण घरीच सुरू कसे ठेवता येईल या दिशेने काम करण्याचा निर्णय झाला. काही दिवस विचार विमर्श झाल्यावर, आवश्यक ती आकडेवारी गोळा करुन पुढील योजना तयार झाली.
- घरच्या घरी मुलांना कसे शिकवावे हे समजावून देणारे काही व्हिडिओ तयार करायचे आणि ते मुलांच्या पालकांपर्यंत पोहचवायचे.
- अंगणवाडी ताईंनी ज्या पालकांकडे स्मार्ट फोन आहे अशा पालकांचे whatsapp गट तयार करायचे आणि या गटात व्हिडिओ पोस्ट करायचे. व्हिडिओ सोबत गरजेचे असल्यास काही सूचना लिहून पाठवायच्या. आणि पालकांना व्हिडिओ पाहून मुलांसोबत काम करण्याचे आवहन करायचे.
- ज्या पालकांकडे स्मार्टफोन नाहीत असे पालक अंगणवाडीत आहार घ्यायला येतील तेव्हा त्यांना अंगणवाडी ताईने व्हिडिओ दाखवायचा आणि मुलांसोबत कृती करण्याचे आवाहन करायचे.
गेल्या काही महिन्यात पालघर, परभणी, अमरावती, यवतमाळ या चार जिल्ह्यांत मिळून पालकांचे 87 गट तयार झाले आहेत आणि त्यात 1541 पालक सहभागी आहेत. बऱ्याच पालकांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दिला आहे. काही पालकांनी आपण मुलाला कसे शिकवले याचा व्हिडिओ करून परत गटावर टाकायला ही सुरुवात केली आहे. काही प्रमाणात का होईना मुलांचे शिक्षण घरच्या घरी सुरू झाले आहे.
एकास एक संगती या कल्पनेवर क्वेस्टने पाठवलेलेला व्हिडिओ –
मुलांच्या पालकांनी पाठवलेला व्हिडिओ प्रतिसाद
या व्हिडिओतील रुद्रला ‘काय जास्त काय कमी’ हे कसे ओळखायचे याचा बऱ्यापैकी अंदाज आला आहे. पण ‘कपांपेक्षा प्लेट जास्त’ हे तुलना दाखवणारे विधान करायला अजून जमत नाहीये. म्हणूनच काय जास्त आहे या प्रश्नाचे उत्तर त्याने बरोबर दिले आहे. पण तुलनेचे विधान करताना मात्र ‘कप जास्त, प्लेट जास्त’ असे केले आहे. एखादी बाब मुलाला समजलेली असली तरी ती नेमक्या भाषेत मांडणे मुलांना बऱ्याचदा जमत नाही. अशावेळी थोडीशी मदत मिळाली तर मुले सहज पुढे जातात. त्यातून त्यांच्या भाषा विकासाला चालना मिळते. अंगणवाडीतील गणिताचे शिक्षण भाषेच्या विकासाशी असे घट्ट जोडलेले आहे. म्हणूनच भाषेची मदत देणारा मोठा माणूस मुलांच्या आसपास हवा. मोबाईल किंवा तत्सम यंत्रे अशी मदत करू शकत नाहीत आणि म्हणूनच पालकांनी या बाबत पुढाकार घ्यायला हवा. दिवसांतून पंधरा मिनिटे जरी असे काम मुलांसोबत केले तरी त्याचा खूप फायदा होईल.
मुलांच्या पालकांनी असे व्हिडिओ पाठवायला सुरुवात केल्यावर अंगणवाडी ताईंचा उत्साहही वाढला आहे. अंगणवाडी माझ्या घरी या उपक्रमामुळे पालक या शब्दाची व्याख्या ही आम्हाला बरीच विस्तृत करावी लागली आहे. कारण हे व्हिडिओ पाहून मुलांचे आईवडीलच नाहीत तर मोठे भाऊ-बहीण, आजी आजोबा कधी कधी शेजारच्या घरातील शिकलेली ताई सुद्धा मुलांच्या शिक्षणात सहभाग नोंदवू लागली आहेत. एकंदरीत येत्या काळात ‘अंगणवाडी माझ्या घरी’ हा क्वेस्टच्या पालवी कार्यक्रमाचा अविभाज्य भाग होईल असे दिसते.