परिपाठातील कृती भाग 1

बालशिक्षण आणि अंगणवाडी  या विषयाबाबत आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली त्यातून एक बाब नक्कीच जाणवते, ती म्हणजे अंगणवाडी ताईचे काम लोकांना वाटते तितके सोपे नक्कीच नाही. अनेक प्रकारची व्यावसायिक कौशल्ये विकसित झाल्याशिवाय हे काम प्रभावीपणे करणे शक्य नाही. आजच्या ब्लॉगमध्ये आपण अंगणवाडी ताईला चांगल्या दर्जाचे नियोजन कौशल्य का लागते याचा विचार करणार आहोत.

गेली वीस वर्षे अंगणवाडी ताईंसोबत काम केल्यावर एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. ती म्हणजे प्रभावी नियोजन करण्याचे कौशल्य ही तशी हळू हळू विकसित होणारी बाब आहे. त्यासाठी अंगणवाडी ताईंना दीर्घ काळ बरीच मदत करावी लागते. नियोजन करताना बालशिक्षणाची सैद्धांतिक समज आणि अंगणवाडी चालवण्याचा अनुभव या दोन्ही बाबींचा कस लागतो. म्हणूनच सुरुवातीच्या काळात अनुभवी व्यक्तींनी केलेली नियोजने अंगणवाडी ताईंनी अभ्यासणे गरजेचे ठरते.

अंगणवाडीतील कार्यक्रमाचे वार्षिक-साप्ताहिक नियोजन नवे वर्ष सुरू होण्याच्या आधी करावे लागते. एका शैक्षणिक वर्षांत साधारणपणे 32 ते 34 आठवडे मिळतील असे गृहीत धरून हे नियोजन करता येते. खाजगी बालशाळांत शिशुगट, बालगट असे वयानुसार पडणारे गट असतात आणि प्रत्येक  गटासाठी वेगळी बालशिक्षिकाही असते. अंगणवाडीत मात्र हे दोन्ही वयोगट एकत्रच असतात. अशा वेळी नियोजन करणे अधिकच आव्हानात्मक बनते. तीन ते साडेचार वर्षे वयाच्या मुलांचा एक गट आणि साडेचार ते सहा वर्षे वयाच्या मुलांचा दुसरा गट मानणे नियोजनाच्या दृष्टीने सोयीचे होते. 

एकदा हे वर्षभराचे काम निश्चित झाले की मग दररोज दैनंदिन नियोजन तयार करून अंगणवाडीचा रोजचा बालशिक्षणाचा कार्यक्रम चालवणे शक्य होते. अंगणवाडीतील बालशिक्षणाचे दैनिक नियोजन फक्त ताईसाठी नसते. रोजचे नियोजन काय आहे, हे मुलांना समजावून देणे फायद्याचे ठरते. अंगणावाडीचे हे दैनिक नियोजन मुलांना नियमितपणे वाचून दाखवल्याने अंगणावाडीचे रूटीन कसे आहे याचा अंदाज मुलांना येतो आणि अंगणावडीचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी त्याचा खूपच फायदा होतो. हे नेमके कसे घडवायचे हे या व्हिडिओमध्ये पाहा.

रोजचे काम मुलांसाठी मोठ्या अक्षरांत नियोजन तक्त्यावर लिहून ठेवणे आणि ते मुलांना वाचून दाखवणे कसे महत्त्वाचे आहे हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहताना जाणवले असलेच. आता व्हिडिओतील अन्य मुद्यांकडे वळू या. वार, तारीख, महिना वर्ष यांसारखे संबोध बालवाडीतील मुलांना पूर्णपणे समजतात असे नाही. म्हणूनच वर्षाचे महिने पाठ करा, आठवड्याचे वार पाठ करा असे पाठांतर या वयातील मुलांना करायला सांगणे निरर्थक आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की मुलांना या संबोधांपासून लांब ठेवायचे आहे. येता जाता या संबोधांबाबत त्यांच्याशी बोलत राहिले तर ते हळू हळू मुलांना उमगायला लागतात. ‘काल शुक्रवार होता, म्हणजे आज शनिवार असायला हवा’ हे मुलांना हळूहळू त्यांच्या अनुभवातून उमगते. मात्र त्यासाठी त्यांच्याशी या बाबत नियमितपणे बोलायला हवे.

सर्वसाधारण अनुभव असा की एका बाजूला आपल्याला पाठांतरावर अवाजवी भर देणाऱ्या बालशाळा दिसतात. वर्षाचे इंग्रजी महिने, मराठी महिने, वर्षभरातील ऋतू, आठवड्याचे वार अशा एक ना अनेक बाबी क्रमाने बिनचूक म्हणणे याला या शाळा खूप महत्त्व देतात. तर दुसऱ्या बाजूला ‘या वयात मुलांना अमुक एक गोष्ट समजेल का?’ या चिंतेने ग्रस्त होऊन अनेक बाबी आमच्या शाळेत आम्ही अजिबात करत नाही अशी भूमिका घेणाऱ्या बालशाळाही आहेत.

माझ्या मते या दोन्ही भूमिका टोकाच्या आहेत.  कारण  बालशाळेतल्या  मुलांकडून कोणकोणत्या अपेक्षा करायच्या याची यादी करून त्या यादीबरहुकूम  शिकवण्याचे नियोजन करावे असा विचार या दोन्ही भूमिकांच्या मागे आहे. तसेच मुलांना शिकवलेले आले की नाही याची नियमित तपासणी करावी असा आग्रहही दोन्हीकडे आहे.

वर्गात शिक्षकाने भरपूर समृद्ध शैक्षणिक अनुभवांची रचना करावी, त्या समृद्ध अनुभवांची मजा घेत मुलांनी हळू हळू आपापल्या गतीने शिकत जावं असा लवचिक दृष्टीकोन घेणे खरे तर गरजेचे आहे. अनेक वेळा पालक, शिक्षक, संस्थाचालक यांच्यापैकी कोणालाच हा दृष्टीकोन पटत नाही असे माझे एक निरीक्षण आहे. वाचकांना या बाबत काय वाटतं हे समजून घ्यायला मी उत्सुक आहे. या ब्लॉग खाली असणारी leave a reply ही सुविधा वापरून तुमचे मत जरूर कळवा.

8 thoughts on “परिपाठातील कृती भाग 1

Add yours

 1. बालशाळेतील मुलांसाठी काय योग्य,काय अयोग्य, किती नी कसे हे सारे व्यवस्थित आपल्या या ब्लॉग्स द्वारे आमच्यापर्यंत येत आहे. व्हिडिओची जोड त्यातील वास्तव लगेच लक्षात आणून देतात. खूपच परिणामकारक आहे नीलेशदादा हे सगळं. धन्यवाद.

  Like

 2. हे धडे अंगणवाडीबद्दल जितके आहेत तितकेच ते मुलांच्या विकासाबद्दल आहेत. मला एका पालक म्हणूनही यातून बरेच समजते/शिकायला मिळते हे आवर्जून नोंदवावे वाटले. शेवटी दिलेला दृष्टिकोन अगदीच योग्य आहे, फक्त ब्युरोक्रॅटीक चौकटीत दर जून मध्येच नवीन वर्ष सुरू करायचे असल्याने हे अंगणवाडीत शक्य असलं तरी नंतरच्या शिक्षणात हे कसं करावं समजत नाही.

  Like

 3. तुम्ही खरच खुप महत्वाचे मार्गदर्शन केले आहे या ब्लॉग मधे. दैनिक नियोजनाचा खूपच उपयोग होतो . आम्हाला दिवसभर मुलांसोबत काय काय करायचे आहे समोर असल्याने काम लवकर व नीटपणे होते. नियोजनातला काही भाग राहीला तर मुले स्वतच आठवण करून देतात.. त्यामुळे अशाप्रकारे नियोजन केले तर खूपच फायदा होतो.
  रेखा गुर्जर ( कोलूरा अंगणवाडी सेविका , नेर यवतमाळ)

  Like

 4. खुपच छान!!! ताईच्या कल्पकतेने खुप गोष्टी एकाच वेळेस साध्य होतील हे निर्विवाद !!
  व्हिडीओ खुपच छान झालाय.

  Like

 5. वर्षा राजेंद्र घावडे अं से.चिखली, ता.नेर,जि.यवतमाळ says:

  नमस्कार सर,या लेखातून शिक्षकांचा मुलांना शिकवतांनाचा द्रुष्टीकोन कसा असावा याबाबत मार्गदर्शन मिळाले.नियोजनाचे वाचनामुळे लिहलेले वाचता ही येऊ शकते हे लक्षात येते. आणि एखाद्या कामात सातत्य ठेवल्यास ती लक्षात पण राहते.पालवी प्रशिक्षण बद्दल धन्यवाद. वर्षा राजेंद्र घावडे अं .से.चिखली, ता.नेर जि.यवतमाळ

  Like

 6. Very useful information shared through this video. Actually we visited WADA and few Anganwadi also. Really appreciated your work cleanliness everything.

  Like

 7. Hello..
  It’s indeed so important to empower teachers! The video is a very good example of this.
  It also supports the fact that children not only positively communicate and express themselves but also understand feelings of peers and other adults , when taught in a sressfree environment.

  Like

 8. माधुरी गुळवाले. अं.से. लोणी क्र. २ ,ता. पाथरी,जि. परभणी. says:

  खरच खूप महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे सरांनी या ब्लॉग मध्ये. दैनिक नियोजन हे खूप महत्त्वाचे आहे.
  दैनिक नियोजन केल्यामुळे आम्हाला दिवसभर मुलांसोबत काय काय करायचे आहे हे समोर असल्याने काम लवकर व नीट (सोपे) होते. आपण जर नियोजनाप्रमाणए रोज पाठ घेतला तर हे मुलांनापण समजते त्यांचा गोंधळ होत नाही. मग मुल काय करतात आपला जर नियोजनातला काही भाग राहीला तरमुले स्वतःच आठवण करून देतात. त्यामुळे अशाप्रकारे नियोजन केले तर खूपच फायदा होतो.

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: