परिपाठ म्हणजे अंगणवाडीत रोज नेमाने करायच्या कृती हे आपण मागच्या ब्लॉगमध्ये पाहिले. या ब्लॉगमध्ये आपण अशाच दोन कृतींची माहिती घेणार आहोत. पहिली कृती आहे हजेरी तक्त्यावर सही करण्याची. या कृतीचा मुख्य उद्देश असा आहे की लेखनाचा एक उपयोग मुलांच्या लक्षात आणून देणे. रोजची हजेरी नोंदवण्यासाठी अंगणवाडीत एक हजेरी तक्ता लावला जातो. या तक्त्यावर सही करून अंगणवाडी ताई, मदतनीस आणि मुले आपली हजेरी नोंदवतात. ही कृती जरी लहानशीच वाटत असली तरी मुलांच्या साक्षरता विकासाच्या दृष्टीने खूपच महत्वाची आहे.
मुलांचा साक्षरता विकास कसा होतो यावर प्रकाश टाकाणारा अंकुरती साक्षरता ( Emergent Literacy ) नावाचा सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार तोंडी भाषा, लेखन आणि वाचन यांचा विकास हातात हात घालून होत असतो. यातील कोणत्याही एका घटकाच्या विकासाची दुसऱ्या घटकाला मदत होत असते. मुलांनी आधी बोलायला शिकायचे, मग वाचायला शिकायचे, नंतर लिहायला शिकायचे या पारंपरिक दृष्टीकोनापेक्षा हा दृष्टीकोन बराच वेगळा आहे.
मुलांनी औपचारिक रीत्या लिपी शिकण्याच्या आधीपासूनच मुलांना आपल्या मनातल्या कल्पना ‘लिहायला’ मिळायला हव्यात असे या दृष्टीकोनात मानले जाते. कारण लिहिणे म्हणजे मनातील कल्पना काही चिन्हे वापरून कागदावर उतरवणे, मग भले ती चिन्हे परंपरेने ठरलेल्या लिपीतील असोत किंवा मुलाने स्वतःच्या मनाने निवडलेली असोत. मुलांनी स्वतःच्या मनाने निवडलेल्या चिन्हांचा वापर करून लिहिलेल्या मजकुराला स्वलिपीतील लेखन असे म्हटले जाते. बऱ्याचदा मोठ्या माणसांना जरी हे लिखाण म्हणजे गिरगटणे वाटले तरी मुलांनी त्या गिरगटण्याशी काही अर्थ जोडलेला असतो. कागदावरच्या काळ्या आकारांना काही अर्थ असतो हे भान येणे मुलांच्या साक्षरता विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे.
व्हिडिओतील स्वरा, वेदान्त, आणि संस्कृती या वेगवेगळ्या मुलांची सही नीट पाहा. स्वराला पारंपरिक लिपी तिचे नाव लिहिण्याइतकी का होईना नीट येते आहे. संस्कृतीला तिच्या नावात असणाऱ्या अक्षरांचे आकार काही प्रमाणात लक्षात आले आहेत, तर वेदान्तला त्याच्या नावातल्या अक्षरांसारखी चिन्हे सही करताना वापरावीत असे अजून वाटत नाहीये. पण तरीही सगळेच जण साक्षरतेचा प्रवास सोबत करत आहेत.
सही करण्यासारख्या साध्या कृतीतून मुलांना लेखनाचा रोजच्या जीवनात काय उपयोग असतो याचा एक पैलू कळतो. एकूणच मुलाची लेखी भाषेची जाण विकसित होण्यासाठी ही कृती हातभार लावते.
‘दिनविशेष’ ही व्हिडिओतील दुसरी कृती तोंडी भाषेच्या विकासासाठी हातभार लावणारी आहे. दिसायला साधी वाटणारी ही कृती प्रत्यक्षात करणे बरेच अवघड आहे. अनेकदा कार्ड घेऊन मुलांसमोर बसले की काय बोलावे हे सुचत नाही. अशा वेळी कार्डाच्या मागे लिहिलेल्या प्रश्नांचा आधार घेऊन काही प्रमाणात ही कृती करता येते. पण तरीही ही कृती म्हणजे प्रश्नोत्तरांचा तास नव्हे. मुले काय बोलत आहेत याचा अंदाज घेऊन त्यांचे बोलणे वाढवण्यासाठी मदत करणे हे बरेच कौशल्याचे आणि संयमाने करायचे काम आहे. या व्हिडिओतील ताईंनाही ते अजून पूर्णपणे साधलेले नाही. त्यांनी प्रयत्न खूप चांगला केलाय, पण ही कृती करताना मुलांच्या बोलण्याचा विस्तार करण्याच्या अनेक शक्यता त्यांनी वापरलेल्याच नाही. उदाहरणादाखल पुढील काही शक्यता पाहा.
तुमच्या लक्षात आले असेलच की गप्पागोष्टींच्या दरम्यान मुले बऱ्याचदा अगदी एकेका शब्दात उत्तर देत आहेत आणि ताई ते उत्तर स्वीकारून पुढच्या प्रश्नाकडे वळत आहेत. खरे तर ‘तुमच्या पैकी कोणी कोणी कलिंगड खाल्लंय आणि कुठे खाल्लंय हे मला सांगा’ असा प्रश्न विचारून ताईंनी थोडे थांबायला हवे. मुलांनी एका शब्दात उत्तर दिले तर ‘तुला काय म्हणायचे आहे ते पूर्ण वाक्यात सांगशील का?’ असे विचारून मुलांना बोलण्याचा अवकाश द्यायला हवा.
गप्पागोष्टीच्या दरम्यान स्वराने जेव्हा सांगितले की ‘कलिंगडाच्या ‘बी’ला चव नसते,’ तेव्हा ताईने तिला विचारायला हवे होते की तू कलिंगडाच्या बिया कधी आणि का चावल्यास? असा प्रश्न विचारून तिला अधिक बोलते करता आले असते. किंवा प्रणवने कलिंगडाच्या बिया लावल्याचा अनुभव सांगितल्यावर ताईने विचारायला हवे होते की तू बिया कशा लावल्यास, त्यासाठी काय काय तयारी केलीस ते जरा सगळ्यांना सांग. असे सांगितले असते तर प्रणवला आपले म्हणणे तीन-चार वाक्यांत मांडण्याची संधी मिळाली असती. या त्रुटी राहिल्या असल्या तरीही या व्हिडिओतील ताईंनी जशी ही कृती केली त्यातूनही मुलांना बोलण्याची काही एक संधी मिळाली असे नक्की म्हणता येते.
या साऱ्या शक्यता वापरून मुलांच्या तोंडी भाषेच्या विकासाला चालना देणे हे तसे गुंतागुंतीचे कौशल्य आहे. अंगणवाडी ताईंना ते अवगत करायला बराच कालावधी लागतो असे माझे निरीक्षण आहे. अंगणवाडी चालवण्याचे काम गुंतागुंतीचे आणि व्यावासयिक स्वरूपाचे आहे हे पालुपद मी या लेखमालेच्या सुरुवातीपासून आळवतो आहे. हे व्हिडिओ पाहून आणि ब्लॉग वाचून तुम्हाला ते पटू लागलंय का ? तुमचे मत ब्लॉगखालील leave a reply ही सुविधा वापरून नक्की लिहा.
आता थोडे पुढच्या ब्लॉग विषयी…
अंगणवाडीच्या वयातील मुलांकडून नेमक्या काय अपेक्षा कराव्यात या बाबत बरीच भिन्नता दिसून येते. खाजगी शाळांत 100 पर्यंतच्या संख्या शिकणे, पाढे पाठ करणे, वर्णमालेतील अक्षरे लक्षात ठेवणे आणि बाराखडी शिकणे अशा अपेक्षा केल्या जातात. बालविकासाचा विचार करता त्या योग्य आहेत का? बालशाळेतील मुलांकडून आणि पर्यायाने त्यांच्या शिक्षकांकडून कोणत्या अपेक्षा कराव्यात? पुढच्या आठवड्यातील ब्लॉग अशाच एका ‘अपेक्षे‘ विषयी आहे. पण तो वाचण्याआधी तुम्ही पुढे दिलेली लहानशी केस वाचा आणि तुमचे मत नक्की नोंदवा.
अतिशय छान उपक्रम …
LikeLike
हजेरीवर् सही करणे आणि दिनविशेष हे दोन्ही उपक्रम खूप छान आहेत्.काही वर्षांपूर्वी प्राथमिक शाळांमध्ये अशा प्रकारच्या उपक्रमांना सुरवात झालेली आहे त्याचे परिणाम निश्चितच चांगले दिसुन आले आहेत .तसेच अंकुरती साक्षरता चा विचार केल्यास वाचन, संभाषण व लेखन या क्रिया एकमेकांनसोबत खुपच प्रभावीपणे घडुन येत असतात हे अनुभवाअंती सिद्ध झाल आहे. कमी वेळात वाचन लेखन भाषण विकास अशा उपक्रमांच्या माध्यमातुन सहज साध्य होतो.अशा लेखांचा शिक्षक व अंगणवाडी ताईला निश्चितच मार्गदर्शन होऊन
बालकांच्या विकासाच्या दृष्टीने लाभदायक ठरेल यात शंकाच नाही.
LikeLike
नीलेशदा अंकुरती साक्षरता हा राज्यातील प्रत्येक अंगणवाडी साठी लागू होणे अत्यन्त आवश्यक आहे. यासाठी आपल्याला काय करता येईल?
LikeLike
जे के दा यासाठी बरेच नियोजन लागेल. अंगणवाडीचे रूपांतर चांगल्या बालशाळेत करणे ही प्रक्रिया सुमारे तीन वर्षे टप्प्या टप्प्याने चालवावी लागते. आता राज्यातील सुमारे 1 लाख अंगणवाड्यांसाठी ही प्रक्रिया खऱ्या अर्थाने करायची म्हटली तर निदान पाच एक वर्षांचे नियोजन लागेल. सुमारे तेहतीस हजार अंगणावाड्यांत एका वर्षी या प्रमाणे काम करण्याचे नियोजन लागेल.
कार्यक्रमासाठी लागणारी मानवीय आणि आर्थिक संसाधने उपलब्ध होणे हा मुद्दा तर आहेच. मात्र त्याही पेक्षा पाच वर्षे एक कार्यक्रम विचारपूर्वक नियोजन करून अमलात आणण्याचा धीर लागेल.
या कार्यक्रमासाठी लागणारे साधन साहित्य तसे ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगाच्या तरतुदीत सहज बसण्यासारखे आहे. अंगणवाडी ताईंना द्याव्या लागणाऱ्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणावर मात्र वेगळा खर्च करावा लागेल.
बालविकास प्रकल्पाधिकारी आणि मुख्य सेविका यांच्या बालशिक्षण विषयक व्यावसायिक विकासावर काम केले तर सर्व अंगणवाड्यांत हा कार्यक्रम करणे अशक्य नाही. क्वेस्ट सारखी अगदी लहानशी संस्था देखील अमरावती, यवतमाळ, परभणी, पालघर, ठाणे अशा पाच जिल्ह्यांतील 2000 अंगणवाड्यांपर्यंत असा कार्यक्रम पोहचवण्यात यशस्वी झाली आहे. त्यामुळे शासकीय पातळीवर नीट नियोजनपूर्वक काम केले तर हे नक्की घडू शकेल.
LikeLike
अतीशय चांगला अनुभव या अगदी सध्या कृतीमधून मला आला. सुरवातीला मुलांना आज कोणता वार आहे तुझं नाव कुठ लिहिलंय मग तिथे सही कर अस म्हणावं लागत होत पण आठवड्याभरात मुल बरोबर त्यांच्या नावासमोर सही करत होते .काही मुल स्वतःच नाव लिहत होते तर काही एखादा अंक किंवा एखाद अक्षर किंवा fkt आडवी रेषा अशी सही स्वतःच्या नावासमोर करायचे.
दिनविशेष मधे मुलांशी चर्चा करण्यासाठी अबोल मुलालाही बोलत करण्याकरिता खूप उपयोग झाला.
धन्यवाद सर🙏
LikeLike
स्वाक्षरी करणे यामागील साध्य उद्देश बालकांना जरी समजत नाही पण पालकांना उमजते की आपले अंकुर कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे
LikeLike
योगीता प्रभाकरराव वानखडे ( अं . से) वऱ्हा
ता. तिवसा जि. अमरावती
हजेरी तक्ता ही कॄती पालवी
(क्वेस्ट) मधील खूप छान आहे.मी याचा खूप छान अनुभव घेतला आहे.आजचा दिवस कोणता हे मुलांना माहीत होते .१५ दिवस मुले जेव्हा अंगणवाडी मध्ये आले तेव्हा प्रथम हजेरी तक्तावर सही करायला शिकविले तेव्हा काही दिवस मुले विचारायची मॅडम सही कुठे करु, मला नाही करता येत याप्रमाणे मुलांचे प्रश्न असायचे .पण हळूहळू काही मुले त्यांच्या नावातील पहिलं अक्षर लिहायचे, काही मुले आडव्या -उभ्या रेषा काढायचे तर काही मुले पुर्ण नाव लिहायचे. रोजचा नित्यक्रम झाल्यावर ज्यावेळेस मुलं सही करायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच हावभाव असायचे. यातूनच मुलांच्या तोंडी भाषा , लेखन आणि वाचन यांचा विकास होण्यास मदत होते.
दिनविशेष या कृतीतून मुलांच्या तोंडी भाषेचा विकास होतो. एखाद्या फळाविषयी चर्चा केली तर मुले त्यांच्या मनातील सर्व गोष्टी सांगतात.या कृतीत न बोलणारे मुले पण एक तरी बाब त्यांच्या मनातील सांगतात यांचा अनुभव मला कार्ड वाचून घेतांना आला.
LikeLike
मुलांच्या विकासा करिता चांगला उपक्रम आहे
LikeLike
Commendable….!
LikeLike