परिपाठातील कृती भाग 3

अंगणवाडीतील परिपाठादरम्यान नियमितपणे करता येतील अशा काही कृती आपण या आधीच्या दोन ब्लॉग पोस्टस् मध्ये पाहिल्या. यातील बऱ्याचशा कृतींमधून मुलांच्या तोंडी भाषेच्या विकासाला आणि साक्षरतेच्या विकासाला कशी चालना मिळते हेही आपण अभ्यासले. परिपाठातली आजची कृती आहे हवेच्या नोंदी आणि चित्रालेख. या कृतीत मुले हवेच्या स्थितीच्या नोंदी करतात आणि मग त्या नोंदींच्या आधारे एक चित्रालेखही तयार करतात. आश्चर्य वाटलं ना वाचून? अंगणवाडीतली ही मुलं नुकतीच मोजायला शिकली आहेत. ती आलेख वगैरे बनवू शकतील? थोडी शंका वाटते ना ? मग आपण ही व्हिडिओ पाहू या.

व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला एक बाब नक्कीच जाणवली असेल की अंगणवाडीतल्या मुलांसोबत आलेख वगैरे तयार करण्याची कल्पना प्रथम ऐकल्यावर वाटते तितकी अव्यवहार्य नक्कीच नाही. मुले एकादा का 10 किंवा 20 पर्यंतच्या संख्या शिकली की त्या संख्यांचा वापर त्यांनी  रोजच्या जीवनात वेगवेगळ्या संदर्भात करायला हवा. हवेच्या नोंदी करण्यासारख्या  कृतीतून मुलांना ही संधी आपोआप मिळत असते. संख्यांचा असा वापर केल्यामुळे मुलांची संख्यांची समज दृढ  व्हायला मदत होते.

शिक्षणाच्या क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टीकोन असा शब्द अनेकवेळा आपण वापरतो. त्याची नेमकी व्याख्या काय हे जरा बाजूला ठेवले तरी निरीक्षणे करणे, निरीक्षणांच्या नोंदी करणे, नोंदींचे विश्लेषण करणे, त्या आधारे काही एक निष्कर्ष काढणे ही कौशल्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा एक भाग आहेत असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

या व्हिडिओतील मुले रोज आकाशात सूर्य किंवा ढग आहेत का, वारा वाहतो आहे का, थंडी किंवा पाऊस आहे का याचे परिपाठच्या वेळी जाणीवपूर्वक निरीक्षण करतात. केलेल्या निरीक्षणांच्या नोंदीही करतात आणि त्या नोंदींच्या आधारे काही अनुमान काढायचा प्रयत्न करतात. एकूणच या लहानशा कृतीत बऱ्याच गोष्टी शिकण्यासाठी वाव आहे.

मात्र यासारख्या कृतीतून मुले किती शिकणार हे पुन्हा सर्वस्वी अंगणवाडीताईवर अवलंबून आहे. कारण नोंदींचा चित्रालेख तयार झाल्यावर ताई कशा स्वरूपाचे प्रश्न विचारते यावर मुले किती शिकणार हे अवलंबून आहे. आता या व्हिडिओतल्या ताईंनी विचारलेल्या प्रश्नाचेच उदाहरण घेऊ या. त्यांनी प्रश्न विचारलाय, ‘या आठवड्यात सूर्य जास्त दिवस दिसत होता की ढग जास्त दिवस होते?’ या प्रश्नाचे उत्तरही मुलांनी योग्य दिले आहे. पण या सारख्या प्रश्नातून चित्रालेखात सहज दिसणारी माहितीच मुलांनी शोधली आहे. मुलांना थोडे वेगळे प्रश्न विचारून कदाचित काही पावले अजून पुढे टाकता आली असती.

अशी पावले पुढे टाकण्यासाठी प्रश्न कसे विचारायचे यावर बरेच काम करावे लागते. हे प्रश्न कसे असावेत याचा एक नमुना आता पाहू या. समजा ताईने विचारले असते की या नोंदींवरून पुढच्या आठवड्यात आकाश स्वच्छ राहील, रोज सूर्य दिसेल असे आपण म्हणू शकू का ? कशावरून? या सारख्या प्रश्नाचे उत्तर देताना सर्व नोंदींचा एकत्र विचार करावा लागेल. व्हिडिओतील आलेखात दिसणाऱ्या नोंदींचा असा एकत्र विचार केला तर पुढचाआठवडाभर रोज आकाश स्वच्छ दिसण्याची शक्यता बरीच कमी आहे असे आपण नक्कीच म्हणू शकू. या प्रश्नाचे उत्तर ठरवताना नोंदींकडे समग्र दृष्टीने पाहून अंदाज बांधणे, आपले म्हणणे शक्याशक्यतेची भाषा वापरून मांडणे, ते मांडण्यासाठी नोंदींचा वापर पुरावा म्हणून करणे या सारख्या अनेक मूलभूत बाबी मुलांना कराव्या लागतील. अर्थातच ही प्रक्रिया अत्यंत समृद्ध करणारी असेल. एका प्रश्नाला एकच बरोबर उत्तर ही चौकट सैल होऊन अनिश्चिततेच्या प्रांतात पाऊल ठेवायची संधी त्यांना मिळेल.

समजा ताईंनी विचारले असते की या आठवड्यात हवा ढगाळ होती, असे आपण या नोंदींवरून म्हणू शकू का ? या प्रश्नाचे उत्तर अगदी निश्चितपणे देता येणे अवघड आहे. कोणी म्हणेल या आठवड्यात सर्व दिवशी ढग दिसले म्हणून हवा ढगाळ होती असे आपण म्हणू शकतो. पण ते लगेच खरे मानता येणार नाही. कारण आकाशात सूर्य आणि थोडेफार ढग दिसत असतील तर त्याला ढगाळ हवा म्हणायचे का ? असा प्रश्न तयार होतील.

मग ढगाळ हवा म्हणजे काय हे आधी निश्चित करून मग परत नोंदी घ्याव्या लागतील. आकाशात ढग दिसत होते का हा प्रश्न बदलून कदाचित आकाशात सूर्य दिसणार नाही इतके ढग होते का? असा करावा लागेल. या साऱ्या प्रक्रियेत मुलांना विचार करायला, वाद घालायला भरपूर वाव मिळेल आणि त्यातून त्यांचे शिक्षण पुढे जाईल.

आता कोणी म्हणेल की इतकी सगळी गुंतागुंत इतक्या लहान मुलांना समजणे शक्य आहे का? या विषयात जे संशोधक काम करत आहेत त्यांच्या मते तरी ‘हो’. नोंदी करून माहिती मिळवण्याआधी  मुलांना आपला  प्रश्न नेटका करायला शिकवणे अगदी बालवयापासूनच शिकवायला हवे असे त्यांचे मत आहे. ‘आपल्या वर्गातल्या किती मुलांनी कोणत्या वाहनातून प्रवास केला आहे’, ‘वर्गातील मुलांना सर्वात आवडणारे दोन खाऊ कोणते आहेत’ अशा प्रकारच्या प्रश्नांवर चर्चा करून लहान लहान सर्वेक्षणे बालवर्गात करता येतात. या सर्वेक्षणातून आलेली माहिती दृष्यरूपात मांडायला आणि त्यातून आधी ठरवलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधायला मुलांना शिकवता येते हे या संशोधकांनी त्यांच्या कामातून दाखवून दिले आहे.

या  विदेशी संशोधकांच्या कामचा थोडाफार अभ्यास करून अंगणवाडीताईंकडून मी थोडी जास्तच अपेक्षा करतोय का ? मी म्हणेन, हो आणि नाही सुद्धा. बहुतेक अंगणावड्यांतील बालशिक्षणाची सध्याची स्थिती पाहिली तर माझी अपेक्षा फारच जास्त आहे असे म्हणावे लागेल. पण या व्हिडिओतील ताईंनी आपली अंगणवाडी ज्या स्तरावर नेली आहे, तो स्तर लक्षात घेता त्यांच्याकडून अशी अपेक्षा नाही करायची तर कोणाकडून करणार? तुम्हाला या बाबत काय वाटते आहे ब्लॉग खालील leave a reply ही सुविधा वापरून नक्की कळवा.

11 thoughts on “परिपाठातील कृती भाग 3

Add yours

  1. अतिशय छान उपक्रम आहे. पण असेचं अनेक उपक्रम राबवण्याची गरज आहे. संख्याज्ञानासोबत मुलांमध्ये एक प्रकारचा वैज्ञानिक दृष्टिकोनचं निर्माण होत आहे. जिथं आमचं विज्ञान पुस्तकातून सुरू व्हायचं, तिथं ह्यांच शिक्षण जिथून पुस्तकात येतं, तिथूनचं सुरू होतं. ही किती छान गोष्ट आहे! जे already ह्या विश्वात present आहे त्याचे observation करणे, analysis करणे etc. अश्या अनेक process नंतर finally conclusion वरती येणे हयातूनच तर विज्ञानाची development होत गेलेली आहे. आणि अगदी लहान वयातचं ही लेकरे त्या process चा भाग बनली आहेत. हया उपक्रमात इतकं काही दडलेलं असतानाही थोडासुद्धा किचकटपणा जाणवतं नाही. आणखीन एक गोष्ट म्हणजे ह्या मुलांचे अशा उपक्रमातुन निसर्गाशी असणारे नाते अधिक घट्ट बनेल. एकप्रकारे ह्या निसर्गाकडे बघताना ही मुले एका वेगळ्याच दृष्टिकोनातुन बघायाला सुरुवात करतील. आणि ह्यासाठी महत्वाचे आहे ते म्हणजे त्यांच्या अंगणवाडीतील ‘शिक्षिका’. त्यांची असे उपक्रम राबावण्याची तयारी, धडपड. मुलांमध्ये मुरवण्या अगोदर त्या बाईंमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असायला हवा. कारण त्या मुलांना प्रश्न पडणारचं हयात काहीच शंका नाहीये. पण त्यांची curiosity next level ला shift करण्या अगोदर त्यांना पडलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे तरी मिळायला हवीत. आणि हे काम त्या बाईंच आहे. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर घालण्याबरोबर, उपक्रमांशी related असणारी training ही द्यायला हवी. मी ज्या अंगणवाडीत शिकले त्यावेळी असण्याऱ्या माझ्या बाईंकडून मी ही अपेक्षा नाही करु शकतं. पण सध्या ज्या आहेत त्यांच्याकडून तरी नक्की करते. मला really असं वाटत की प्रत्येक गावात असे training programme’s राबवले पाहिजेत, की जे मुलांच्या knowlege सोबत त्याच्या curiosity ला सुद्धा trigger करतील.

    Like

  2. हे अत्यंत रोचक आहे. चित्रालेख बनवण्यापर्यंत प्रवास वैज्ञानिक दृष्टिकोन आणि निसर्गचक्र यांची सांगड घालणारा तर आहेच, पण त्यापुढे “शक्यता” अर्थात probability कडे या वयात विचार नेणे, प्रश्नांमध्ये नेमकेपणा आणणे आदी बाबी प्रत्यक्षात शक्य झाल्या तर मोठंच काम होईल. त्यासाठी अंगणवाडी शिक्षकांना/शिक्षिकांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे हे पटते.

    Like

  3. Wow’ great work…. साधं सोपं समजण्यासारखे . प्रत्यक्ष करून समजून घेऊन इतरांना समजावले.

    Like

  4. हवेच्या स्थितीच्या नोंदी व त्यावर आधारीत चित्रालेख तयार करणे हा अंगणवाडी ताईंचा उपक्रम खूपच छान आहे. खर म्हणजे तो आमलात आणण्याची पद्धत व त्यासाठी करावयाचे नियोजन खुपच उत्तम आहे. वयोगट कोणताही असला पण त्या साठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रम चे नियोजन सुस्पष्ट व अचुक असेल तर निश्चितच यशस्वी होतो.व ज्या उद्देशासाठी उपक्रम करावयाचा असतो तो ही साध्य होतो.
    सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्याना निरीक्षण करणे,अंदाज बांधणे,तर्क करणे,नोंदी घेणे,नोंदीचे विश्लेषण करणे म्हणजेच वैज्ञानिक जाणिव निर्माण होणे, निसर्ग चक्राची माहीती होणे अशा मूल्यांचा विकास होण्यास खुप उपयुक्त आहे.विशेष म्हणजे सहज शिक्षणातून हे साध्य होते,आणि प्रत्यक्ष अनुभूती घेतल्यामुळे ज्ञान हे चिरकाल टिकणारे राहते.वयोगट जरी लहान असला तरी दिलेल्या अनुभुती वयानुरुप असल्यामुळे आकलन व दृढीकरण सहज होते.व विद्यार्थ्याना याची सवय होते यातून स्वयंअध्ययनाची सवय होते .

    Like

  5. नमस्कार निलेश!!
    तुमचे उपक्रम खरंच शिक्षकांना खूप मार्गदर्शक ठरू शकतात. उपक्रमाला व्हीडीओची जोड आणि त्या मागची भूमिका सहतेने समजाऊन सांगण्यासाठी मागच्या बाजुचे तज्ञाचे संवादात्मक मार्गदर्शन!!
    त्याच बरोबर आणखी स्पष्ट होण्यासाठी थोडक्यात पण अत्यंत आवश्यक असं तुमचं टिपण. खरंच खूप उपयोगी वाटलं.
    मला एक कल्पना फक्त या विषयांशाबाबत सूचली. ती अशी की समजा मॅडमने लाल किंवा कोणत्याही भडक रंगाने मुलांनी रंगवलेल्या प्रत्येक चौकोनाच्या वरच्या बाजुने जाड रेघ काढली असती तर पायऱ्याप्रमाणे दिसणारा एका स्तंभालेखाचे तित्र तयार झाले असते आणि त्यावरून कमी अधिक वगैरे प्रश्न विचारता आले असते. हे काही मी तज्ञ म्हणून सांगत नाही तर केवळ आयत्या मला सूचलं एवढाच त्याचा अर्थ.
    हा ब्लॅाग केवळ अंगणवाडी/बालवाडी करीताच नाही तर वर्ग १ ते ३ च्या शिक्षकांना सुद्धा खूपच मार्गदर्शक ठरू शकतो याची मला खात्री आहे.

    Like

  6. खूप छान उपक्रम आहे,
    सध्या मुलं घरी आहेत आणि त्यांच्याकडे वेळही खूप आहे, अशावेळी फक्त पुढील इयत्तेच्या अभ्यासाची त्यांच्याकडून यापेक्षा करण्यापेक्षा त्याच्या निरीक्षण क्षमतेला आशा प्रकारे चालना दिली पाहिजे, मुलांचे निरीक्षण आणि त्याच्यातून निघणाऱ्या शक्यता, यातून मुलांना विचार करण्यास चांगली चालना मिळेल,
    वातावरणातील बदल असतील, एखाद्या झाडाची वाढ असेल, गॅलरीमधून दिसणारे पक्षी असतील, घरात दररोज बनवलं जाणार अन्न, रस्त्यावर दिसणारी दररोजची वाहने, अशा अनेक बाबींचा यात समावेश करता येईल,
    अशाप्रकारे केलेल्या निरीक्षणाचा उपयोग पगाक्त वैज्ञानिक दृष्टीकोणपर्यंत सीमित न राहता, मुलांच्या सर्वांगिंग विकासासाठी उपयुक्त होईल.
    आपण राबवित असलेल्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा!!!
    धन्यवाद

    Like

  7. अंगणवाडीतील ताई जर तयारीची असेल तर अपेक्षा रास्तच आहे. खर तर आपल्याला जर आपल्या शिक्षणाचा स्तर वाढवायचा असेल तर प्रत्येक ताईचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. तुमचा अभ्यास त्यांचा पाया मजबूत करून देईल. आपल्या मुलांची बौद्धिक क्षमता अफाट आहे.त्यास योग्य चालना अशा उपक्रमातून नक्कीच मिळेल.असे अनेक अभ्यासपूर्ण उपक्रम आपला शैक्षणिक स्तर उंचावेल . त्यासाठी अनेक शुभेच्छा !!

    Like

  8. एक ते वीस पर्यंतच्या संख्यांची समज आल्यावर त्याशी संबंधित या लेखात दिलेल्या गोष्टी करणे मुलांच्या प्रारंभिक शिकण्यात खूपच जास्त महत्त्वाचे आहे.

    Like

  9. योगीता प्रभाकरराव वानखेडे (अंगणवाडी सेविका) वऱ्हा ता तिवसा जिल्हा अमरावती
    हवामान तक्ता आणि हवामान आलेख हा उपक्रम खूपच छान आहे.मी जेव्हा अंगणवाडीत हा उपक्रम मुलांकडून करून घेतला तेव्हा मुलांना बाहेर जाणे, बाहेरच्या वातावरणाचे निरीक्षण करणे आणि आतमध्ये येवून मी मुलांना विचारले उदा.आज ऊन होती का? यावर काही मुले हो म्हणायचे तर काही मुले नाही म्हणायचे यात मुलांना गंमत वाटत होती पण यातून मुले निरीक्षण करायला शिकतात.या उपक्रमांद्वारे वातावरणात बदल कसे होतात हे मुले शिकतात.
    हवामान आलेख मध्ये मुले हवामान तक्ता वरुन किती दिवस ऊन, पाऊस , वारा , थंडी व ढगाळ वातावरण होते हे सांगतात. यातूनच मुलांच्या विचार क्षमतेत वाढ होते आणि भाषा विकास ही होते.

    Like

  10. परिपाठातील या विविध उपक्रमांची ओळख करून देणारे ३भाग खूप छान आहेत. अनेकोत्तम शैक्षणिक अनुभवांची ओळख होते आहे.
    पुढच्या लेखात काय असेल याची वाट पहातो नेहमी.

    Like

    1. धन्यवाद अपर्णा ताई पुढील काही लेख गोष्टी या विषयावर लिहिण्याचा विचार आहे.

      Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: