ऊ टू ची गोष्ट

गोष्टी किंवा कथा यांना मानवी संस्कृतीत फारच महत्त्वाचे स्थान आहे. जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी तिथल्या तिथल्या स्थानिक गोष्टी आपल्याला सापडतातच, इतका तो मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लहान मुलांच्या जीवनात तर गोष्टींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे मुलांसोबत काम करणाऱ्या प्रत्येकाने या विषयाचा अभ्यास करणे फारच गरजेचे आहे. या अभ्यासाची सुरुवात आपण शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या ‘ऊ टू ची गोष्ट या लेखापासून करू या. 

सौजन्य महाराष्ट्र बालशिक्षण परिषद

अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेने ‘गोष्ट सांगणाऱ्यांसाठी चार गोष्टी‘  या नावाने एक छोटेखानी पुस्तिका छापली होती. या पुस्तिकेत शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांनी लिहिलेल्या ‘गोष्टी’ या विषयावरील 6 लेखांचे संकलन केले होते. पुस्तिकेत येण्याआधी हे लेख शिक्षण पत्रिका या मासिकात प्रसिद्ध झाले होते. ऊ टू ची गोष्ट हा लेख याच सहा लेखांपैकी एक आहे. लेखात चर्चेला घेतेलेली ही गोष्ट आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल. पण इंग्रजी माध्यमात शिकून मोठ्या झालेल्या आजच्या काही आई-बाबांना ती माहिती नसण्याचा संभव आहे. त्यांच्या सोयीसाठी म्हणून ही लहानशी गोष्ट पुढे दिली आहे.

ऊ टू ची गोष्ट

एक होती ऊ, तिला झाली टू.

ती गेली खेळायला.

तिला मिळाला पैसा.

आई आई पैशाचं काय आणू ?

भाजी.

चिरू कशी? चरा चरा.

शिजवू कशी? रटा रटा.

खाऊ कशी? मटा मटा.

निजू कशी? डाव्या कुशी.

आणि पादू कशी? ढम् दिशी.

या गोष्टीचा शेवट होतो ‘पादू कशी, ढम् दिशी’ या वाक्याने. ही गोष्ट मुलांना फार आवडते. आता निरर्थक आणि काही जणांना असभ्य वाटू शकेल अशी ही गोष्ट केवळ परंपरेने चालत आली आहे, ती मुलांना फार आवडते म्हणून शाळेत सांगायची का हा प्रश्न ताराबाईंनी या लेखात चर्चेला घेतला आहे. ताराबाईंचे या बाबत काय म्हणणे आहे ते त्यांच्याच शब्दांत ऐकणे सर्वात प्रभावी ठरेल म्हणून लेखातील काही भाग ऑडिओच्या रूपात पुढे देत आहे.

आपली भूमिका मांडताना  ताराबाईंनी चांगल्या बालकथेचे निकषच मांडले आहेत. अगदी लहान मुलांच्या गोष्टीसाठी  विषयाची निवड, गोष्टीची शैली, तिच्यातील शब्द प्रयोग कसे असायला हवेत याचा विचार ताराबाईंइतका बारकाईने फारच थोड्या जणांनी केलेला दिसतो. ‘ऊ टू ची गोष्ट’ ताराबाईंच्या या निकषांत बसते असे म्हटले तरी तिच्या अर्थाचा प्रश्न उरतोच. अर्थाच्या दृष्टीने या गोष्टीत फारसे काही नाही. मग असली निरर्थक गोष्ट मुलांना का सांगायची या बाबत ताराबाई काय म्हणत आहेत हे पुढच्या ऑडिओत ऐकू या.

काय मंडळी, कशी काय वाटली ताराबाईंची मांडणी? मुलांना गोष्टी सांगण्याचे मुख्य उद्दिष्ट  ‘मुलांचा आनंद’ हे असायला हवे; ‘बाकी साऱ्या बाबी गौण मानाव्यात’ हा ताराबाईंचा मुद्दा तुम्हाला पटतो का? तुमचे मत नक्की कळवा. गोष्टीचा विषय, शैली, तिचा अर्थ या बाबत विचार मांडून झाल्यावर ताराबाई पुढे या लेखात गोष्ट कशी सांगावी या कडे वळतात. शाळेत केल्या जाणाऱ्या गोष्टींच्या सादरीकरणाबाबत त्यांची काय मते आहेत हे त्यांच्याच शब्दांत ऐकू या.

गोष्ट सांगण्याबद्दल ताराबाई जे सांगत आहेत ते आजच्या परिस्थितीला जसेच्या तसे लागू पडते. ओढून ताणून गोष्ट सांगणाऱ्या शिक्षकांबाबत ताराबाईंनी या लेखात पुढे जाऊन अगदी कठोर शब्दांत टीका केली आहे. ती समजून घेण्यासाठी या ब्लॉगच्या शेवटी लेखाची लिंक दिली आहे, त्यावर जाऊन तुम्हाला संपूर्ण लेख वाचता येईल. 

खरे तर ‘ऊ आणि टू’ सारख्या गोष्टी हा मराठी भाषेतला ठेवा आहे. तो चित्रमय पुस्तक रूपात इतर भाषांतील मुलांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मध्यप्रदेशातील एकलव्य या संस्थेच्या प्रकाशन विभागाने केला आहे. ‘ऊ आणि टू ची गोष्ट’ पुस्तकरूपात आता वेगवेगळ्या भाषांत प्रसिद्ध झाली आहे. ती अजूनही भाषांत भाषांतरित होईल अशी आशा करू या. 

आता जाता जाता एक गमतीची बाब. ताराबाईंचा हा लेख 1933 साली मराठीत प्रसिद्ध झाला. त्याचा आधी तो गुजराती शिक्षण पत्रिकेत प्रसिद्ध झाला होता. आज 80-85 वर्षांनंतर आजच्या परिस्थितीत  आपल्याला तो तितकाच प्रस्तुत वाटतो. मी जेव्हा जेव्हा हा लेख वाचतो तेव्हा तेव्हा मला एक प्रश्न सारखा सतावतो. काळाच्या पुढचे पाहाण्याच्या ताराबाईंच्या ताकदीने आपण भारावून जायचे, की आठ दशकांत परिस्थितीत फारसा काहीच फरक पडला नाही म्हणून अस्वस्थ व्हायचे?

आपण सुरू केलेला गोष्टींचा हा अभ्यास दोन मार्गांनी पुढे नेता येईल. गोष्टी कशा सांगाव्यात याचे प्रात्यक्षिक आपण काही व्हिडिओंच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो किंवा या लेखासारखा ताराबाईंचा अजून एखादा  लेख चर्चेला घेऊन सैद्धांतिक बैठक पक्की करू शकतो. कोणत्या मार्गाने पुढे जायचे या बद्दलचे आपले मत जरूर नोंदवा.

उ टू ची गोष्ट हा लेख वाचण्यासाठी येथून डाऊनलोड करून घेऊ शकता. Click here

14 thoughts on “ऊ टू ची गोष्ट

Add yours

 1. सर खूप छान. लेख व त्यात असलेले ऑडिओ हे मिक्सिंग पण छान वाटले

 2. सर, केवळ अवतरण देण्यापेक्षा आपण केलेला ऑडिओचा वापर लेखाला खूप जिवंत आणि बोलका करतो आहे.ताराबाईंचे अजूनही लेख नक्की अभ्यासासाठी पुढे येण्याची आणि त्यावर चर्चा करण्याची आज गरज आहे.

  1. Audio चा वापर छान झाला आहे, आणि गोष्ट म्हणजे निखळ आनंद, मज्जा,

  2. सुदामती वाघमारे सर ऊ टू ची गोष्ट ही खरच मुलांना आनंद देण्यासारखीच आहे आम्ही प्रतयेक क्षात मुलांना शिकवतांना पाहिले की मुल किती आनंदी आसतात व पुन्हा पुन्हा तीच गोषट सांगा असे म्हणतात बालशिक्षण णा सोबद आनंद ही खूप म्हत्वाचे आहे

 3. लेख त्यातल्या ताराबाईंच्या भाषेतल्या आॕडिओज मुळे खूपच रोचक झाला आहे. गोष्ट कशी असावी याचा वस्तुपाठ म्हणजेच हा लेख👍🏻

 4. सर, लेख आणि अधून मधून आलेला ऑडिओ हे मिक्सिंग खरंच खूप छान आहे. मला असं वाटतं की ताराबाई मोडक यांचा गोष्ट कशी सांगावी याविषयीच्या लेखांचा अजून अभ्यास करणे गरजेचे आहे.

 5. आहाहा, मजा आली. मी माझ्या आजीकडून, माझ्या मुलांनी त्यांच्या आजीकडून, त्यांच्या मुलांनी त्यांच्या आजीकडून ऐकलेली पिटुकली गोष्ट😘
  यातली लय, ताल, गेयता यामुळे ही कालातीत आहे.
  धन्यवाद.

 6. शक्य असेल तर दोन्ही पद्धतीने जाने प्रभावि होइल

 7. अर्थ, बोध याबाबत लहान मुले फारसे मनावर घेत नसतात. आनंद, विनोद, म्हणन्यास सहज सोपी रचना त्यांना नेहमी आवडते आणि हेच वरील गोष्टी चे साध्य असावे.

 8. सर या लेखातून असे लक्षात येते की,
  गोष्टीत… गेयता ,ताल लय असल्यास मुलांना ती आवडते.
  गोष्ट सांगण्यासाठी तसेच लिहिण्यासाठी उपरोक्त लेख मार्गदर्शक आहे.

 9. गोष्टच तर असते. एक दोन सांगितल्या की गप बसून जेवेल तरी, अस म्हणून झालेली गोष्ट या संकल्पनेची ओळख, हळू हळू बदलत आहे आणि अजून बदलत राहील. ताराबाईंच्या या विचार धारेचा अत्यंत प्रभावीपणे विचार करायची गरज आहे. नेमकं मूल शिकणार आहे तर त्याच्या वाढत्या वयात त्याला नेमकं काय गरजेचं आहे? नीती तत्वांच्या आड आपण उगाच एका फुग्यात किती दिवस राहणार?

  बाईंच्या या विचारा मध्ये मूल आणि त्याचा आनंद ही स्थाई भावना वाचताना थोडासा त्रास होतो आणि आनंदही.

  अजून लेख समजून घ्यायचे आहेत सर..

 10. गोष्ट ही आपल्या कल्पनाशक्तीला शब्दरूपी मिळालेले व्यासपीठच आहे. त्यामुळे ती सांगताना ज्या काही आपल्या खऱ्या खऱ्या भावना आहे जे शब्द उच्चारल्यावर आपल्याला मजा येते ते सारं व्यक्त होणे खूप महत्त्वाचा आहे. ते सर्वांनाच जमतच नाही, पण सरावाने ते नक्की जमते. त्यामुळे हा लेख वाचून खूप छान वाटलं. गोष्ट सांगताना नक्की त्याचा उपयोग होईल.

Leave a Reply

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: