व्यवस्था : नाक पुसण्याची

मुलांना स्वच्छतेच्या सवयी लागणे हे अंगणवाडीच्या बालशिक्षण कार्यक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी अंगणवाडीत तयार केलेल्या भौतिक सुविधांची मोठीच मदत होते. अंगणवाडीतील मुलांना सर्दी होऊन त्यांचे नाक गळणे ही  बाब काही नवीन नाही.  दीपाताईंच्या अंगणवाडीतली मुले याला अपवाद नाहीत. सुरुवातीला दीपाताई मुलांना नाक पुसण्यासाठी एक टॉवेल द्यायच्या पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की टॉवेलमुळेच इनफेक्शन पसरेल.  त्यांच्या अंगणवाडीतील बरीचशी मुले स्वतःचा  रुमाल घेऊन येत नाहीत. मग अशा वेळी  दीपाताईंनी या समस्येवर काय उपाय शोधला ते या व्हिडिओमध्ये नक्की पाहा. सध्याच्या साथीच्या दिवसांमध्ये दीपाताईंनी शोधलेला हा उपाय फारच महत्त्वाचा आहे.

अंगणवाडीत मुलांच्या शिक्षणासोबत पालकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करणे हे कामही महत्त्वाचे आहे. अशा वेळी अंगणवाडी ताईला पालकांची समुपदेशक म्हणूनही काम करायचे असते. मुलांची नखे नियमितपणे कापा असे या व्हिडिओतील दीपाताई  पालकांना वारंवार सांगतात. त्यांच्या अंगणवाडीतील सगळ्याच मुलांचे पालक त्यांचे हे म्हणणे ऐकतात असे नाही. काही जणांना इच्छा असूनही मुलांची नखे कापणे जमत नाही. मग काय करायचे? दीपाताईंसारख्या सेविका या अडचणींवरही कशी मात करतात ते या व्हिडिओमध्ये नक्की पाहा. पालक जरी कधी कधी प्रतिसाद देत नसले तरी दीपाताईंच्या अंगणवाडीतील मुलांना नखे कापण्याचे महत्त्व नेमके समजले आहे, हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर नक्की जाणवेल.  

चांगली  बालशाळा कशी असावी या बाबत पालकांच्या, लोकांच्या काही कल्पना आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर ज्या शाळेत बसायला बेंच किंवा डेस्क आहेत अशी शाळा बेंच नसलेल्या शाळांपेक्षा चांगली असे मत सर्वत्र पाहायला मिळते. शहरी भागाच्या जवळ असणाऱ्या अंगणवाड्यांना आज खाजगी बालशाळांसोबत स्पर्धा करावी लागते आहे. या खाजगी बालशाळांत  बहुधा असे फर्निचर विपुल प्रमाणात दिसते. मग पालक खाजगी शाळांप्रमाणेच अंगणवाडीतही फर्निचर असायला हवे याचा आग्रह धरतात. चांगल्या अंगणवाडीतील बैठकव्यवस्था बदलती आणि लवचिक असावी लागते, हे पालकांना पटवून सांगणे अनेकदा अंगणवाडी ताईला अवघड होऊन बसते.

पण खरे तर अंगणवाडीच्या कार्यक्रमात या साऱ्या फर्निचरची अडचणच त्याच्या उपयोगापेक्षा जास्त होते. खाजगी शाळांत फळ्यावरचे बघून वहीत लिहिणे यात मुलांचा बराच वेळ जात असल्याने त्या शाळांना या फर्निचरचा अडसरही वाटत नाही. पण अंगणवाडीत सर्वांगीण विकासाला चालना देणारा कार्यक्रम करायचा म्हटला तर मात्र फर्निचरची ही व्यवस्था बालविकासाच्या तत्वांच्या विरोधात जाणारी आहे असेच म्हणावे लागेल. कारण त्यामुळे मुलांच्या हालचालींवर प्रचंड मर्यादा येतात. तुम्हाला या बाबत काय वाटते हे नक्की कळवा.

एक अंगणवाडी  प्रभावीपणे चालवायची तर अंगणवाडी  ताईला पालक, गावकरी, पदाधिकारी या साऱ्यांचे  सहकार्य मिळवावे लागते. हजारो अंगणवाडी सेविका आपापल्या परीने ही जबाबदारी पार पाडत असतात. मात्र त्यांच्या व्यावसायिक विकासासाठी प्रयत्न करणारी सक्षम व्यवस्था आजही उभी नाही. किंबहुना अंगणवाडीचे काम हे व्यावसायिक काम आहे हेच समाजातील अनेकांना मान्य नाही.

या व्यवसायाची प्रतिष्ठा किती कमी आहे, हे लक्षात येण्यासाठी एक उदाहरण देतो. काही वर्षांपूर्वी मला एका मोठ्या संस्थेच्या बालशिक्षण विभागासमोर भाषण करण्यासाठी निमंत्रण आले होते. मी ते स्वीकारले आणि माझ्या परिचयात मी एक बालवाडी शिक्षक असून आदिवासी भागात बालशिक्षणाचे काम करतो असे कळवले. पण परिचय करणाऱ्याने मात्र इतर कुठून तरी माहिती मिळवून माझा लांबलचक परिचय करून दिला आणि वरून हेही सांगितले की आजच्या पाहुण्यांनी त्यांचा परिचय एक बालवाडी शिक्षक म्हणून करून द्या, असे कळवले होते. ‘बालवाडी शिक्षक’ हा परिचय पुरेसा प्रतिष्ठित न  वाटणे हे समाजातील या विषयाबाबतच्या अज्ञानाचे निदर्शक आहे. या क्षेत्राला व्यावसायिक प्रतिष्ठा नाही, त्यात पैसा नाही म्हणून त्याचे महत्त्व कमी होते असे नाही.

या व्हिडिओमधील दीपाताई हाच मुद्दा मांडत आहेत. त्यांचा हा ठामपणा त्यांच्या कामातून आणि अभ्यासातून आला आहे. आज आपल्या आसपास दिसणाऱ्या सगळ्या अंगणवाडी सेविका दीपाताईंच्या इतक्या ठाम असतीलच असे नाही. पण त्या तशा व्हाव्यात म्हणून प्रयत्न करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.  ती आपण केवळ अंगणवाडी सेविकांच्या भल्यासाठी नाही तर एकूण समाजाच्याच उज्ज्वल भवितव्यासाठी पार पाडायला हवी. हे नेमके कसे घडवायचे या बाबत आपल्याला काय वाटते? नक्की कळावा.

9 thoughts on “व्यवस्था : नाक पुसण्याची

Add yours

  1. निलेश दादा, हे विचार सर्वत्र रुजावेत म्हणून तुझे आणि तुझ्या टीम चे योगदान खूपच महत्वाचे आहे.

  2. व्हिडियो अनेकार्थने बोलका आहे. ब्लॉगमध्ये मांडले गेलेले मुद्दे महत्त्वाचे आहेतच. मुळात शिक्षण म्हणजे काय आणि ते कसे दिले पाहिजे याच्या व्यावसायिक कल्पनांना सतत छेद देऊन लोकांपुढे मांडत रहाणे हा एक उपाय मला दिसतो. अंगणवाडी ताईंच्या हस्ते (किमान एकदा) गावांतील झेंडावंदन होणे, ग्रामपंचायतीत अंगणवाडी ताईंचा सदस्य म्हणून स्वीकार अनिवार्य असणे अशा काही मार्गांनी त्यांचे महत्त्व अधोरेखित करता येईल असे अनभ्यस्त मत.

  3. स्वाती रविंद्र राऊत (अ. से.) दापोरी खुर्द ता.तिवसा जि. अमरावती says:

    अंगणवाडीतील भौतिक सुविधेमुळे ताईला मुलांना जास्त वेळ देता येतो.एकदा मुलांना सर्व वतुंचे महत्व पटले,ते कसे वापरायचे हे समजले की सर्व काम सोपं होत व अंगणवाडी सुरळीत चालते त्याशिवाय मुलांना चांगल्या सवयी सुद्धा लागतात व हा मुलांमधील बदल पालकांच्या लक्षात आला की त्यांनाही अंगणवाडी चे
    महत्व पटते.

  4. मुळात शिक्षण म्हणजे फक्त अभ्यास ही संकल्पना चुकीची आहे. ज्या ही कोणत्या गोष्टीतून शिकायला मिळत ते शिक्षण! म्हणून स्वतःची स्वच्छता हेसुद्धा शिक्षणाचाच भाग आहे. राहता राहिला प्रश्न बसण्याच्या व्यवस्थेचा, तर अंगणवाडीतल्या मुलांनी एका जागी बसून शिकावं ह्या अपेक्षा अवाजवी आहेत सोयीनुसार बसण्याची व्यवस्था हेच योग्य आहे. खुर्ची किंवा बाक मिळाल्याने शिक्षण जास्त चांगलं होतं ही संकल्पना योग्य नाही उपक्रम स्तुत्य आहे. शुभेच्छा आहेत!

  5. मी ज्यावेळी पालवी प्रकल्पतील अंगणवाडी पहिल्यांदाच पहिली त्यावेळी मला या कल्पनेबद्दल खूप आश्चर्य वाटलं होतं. इतका बारकाईने विचार अंगणवाडीतल्या सुविधाबद्दल सुद्धा होऊ शकतो हेच माझ्यासाठी नवीन होतं. अंगणवाडी ताईंच्या कामाला मिळणाऱ्या प्रतिष्ठा हा खूप कळीचा मुद्दा या blog मधे आला आहे. अंगणवाडीतल्या मुलांना शिकवणं काय सोपं आहे असं मलाही वाटायचं, पण स्वतः काही दिवस अंगणवाडीतल्या काही गोष्टी करून पाहिल्यावर त्याचं महत्त्व आणि गांभीर्य लक्षात आलं. इतर अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत या लहान मुलांना शिकवण्याचं काम करणाऱ्या या तया खरंच तारेवरची कसरत करत असतात. आपण नक्कीच त्यांच्या कामाची दाखल घ्यायला हवी!

  6. मा. नीलेश सर,
    तुमचा लेख वाचून आनंद झाला. इथे अंगणवाडी ताईंच्या कामाची दखल घेतली आहे. त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी सर्वांसमोर आल्या.पालवी प्रकल्पाच्या माध्यमातून अंगणवाडीत मिळालेल्या भौतिक सुविधा मुळे मुलांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजवायला मदत होते. आणि हळूहळू पालकांना ही त्याचे महत्त्व पटायला लागल आहे .या प्रकारे सर्व उत्साहाने काम करणारऱ्या अंगणवाडी ताईंना अधिक सक्षम करण्यासाठी पालवी टीमचे मनापासून आभार.
    धन्यवाद सर,
    वर्षा घावडे
    अंगणवाडी केंद्र चिखली, ता नेर जि यवतमाळ

  7. अंगणवाडी ताईंचे काम बालविकासात किती महत्वाचे आहे हे अधोरेखित झाले आहे जे खूप आवश्यक वाटते . एकूणच आपल्याकडे शिक्षण देणाऱ्यांचा ज्याप्रकारे विचार केला जातो आणि त्यानुसार त्याला समाजात प्रतिष्ठा दिली जाते ते सगळच अतर्क्य आहे,खुळचटपणा आहे.बालवर्गाला शिकवणारी व्यक्ती खरेतर अत्यंत महत्वाची पण आहे उलटेच , माध्यमिकमधे शिकवणारा प्राथमिक शिक्षकास कमी लेखतो , महाविद्यालयीन स्तरावरही हे आणखीनच गडद होत जाते, त्याला काही अंतच नाही.
    खरेतर बालशिक्षणात आई इतकीच कदाचित काकणभर अधिकच लक्ष देऊन सगळं काही करणारी बाल वर्गातली /अंगणवाडीतली शिक्षिका म्हटली पाहिजे. स्वच्छतेच्या सवयींपासून ते वागण्या -बोलण्याच्या, वाचनाच्या,लेखनाच्या ,उत्तम आहाराच्या सवयी इ. सगळे बालवर्गातील शिक्षिका करते.
    दीपाताईच्या वर्गात चकाचक भौतिक सुविधा नसतीलही ( इतका साधा आणि सुरेख वर्ग आहे की चकचकीत फर्निचरची उणीव भासतच नाही ) पण त्यांनी छोट्या छोट्या मुलांच्या गरजा ओळखून केलेल्या कल्पक सोयी कोणत्याही हायटेक बालवर्गातही अढळणार नाहीत.
    नुसते व्हिडीओत बघतानाही त्या वर्गात जाऊन मुलांबरोबर बसावेसे वाटून गेले.
    खूप छान अनुभव आणि महत्वाचा विचार मांडलात .
    धन्यवाद सर .
    – अपर्णा कुलकर्णी ,पुणे .

  8. नाक पुसण्याची व्यवस्था हा दिपाताईंचा उपक्रम खरच कौतुकास्पद आहे. बऱ्याच अंगणवाडी मध्ये अशा प्रकारच्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी दिसुन येते जसे कि हात धुणे,नख काढणे,तोंडपुसणे इ.परंतु असे उपक्रम ग्रामीण भागातील अंगणवाडी मध्ये दिसुन येत नाहीत. ताईंना प्रशिक्षण देणे,त्यांची मानसिकता अशा उपक्रमांच्या माध्यमातुन तयार करता येईल.खर तर बहुतांशी अंगणवाडी ताईंचा वेळ हा शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातुन येणारा आहार वाटप करणे,स्तनदा माता,किशोरवयीन मुली,गर्भवतीमहिला,शुन्य ते सहावयोगटाचा आहार वाटप करणे,त्याचे रेकार्ड मेंनटेन करणे,वजन,उंचीच्या नोंदी करणे असे आणि या सारखे अनेक गोष्टी करण्यात वेळ जातो.परिणामी अंगणवाडी चा मुळ उद्देश लांब राहतो.यावर उपाय म्हणुन ती काम स्वतंत्र यंत्रणेकडे देणे व अंगणवाडी ताईंना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे असे मला वाटते.

  9. दिपाताई खुपच छान मार्गदर्शन केले. आणि नाक पुसण्याची सवयपण खुप चागली लावली.

Leave a Reply to वर्षा घावडेCancel reply

Powered by WordPress.com.

Up ↑

Discover more from The Road Less Travelled

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading