कॅम्पुटर

आम्ही राहुलसोबत नी अमितसोबत काम करतोय हे पाहून भट्टीवरची इतर मुलेही आमच्या आसपास घुटमळू लागली आहेत. आमच्याकडे असलेल्या कॅमेऱ्याचे नी मोबाईलचे त्यांना खूप आकर्षण वाटते आहे. आमचा ‘फोटू पाड’ असे आता त्यांनी सांगायला सुरुवात केली आहे. फोटो काढला रे काढला की लगेच त्यांना बघायचा असतो.  आज मी त्यांना त्यांचे फोटो दाखवायला लॅपटॉप नेला होता. मी लॅपटॉप चालू करता करता त्यांना विचारले, “हे काय आहे?” तर काही जण म्हणाली, “कॅम्पुटर”. “कॉम्प्युटर कशासाठी वापरतात?” तर म्हणाले, “फोटो पाहायला!” त्यांच्या हजरजवाबीपणाचं कौतुक वाटलं.

लॅपटॉपवर फोटो समोर येताच सगळी माझ्या भोवती गोळा झाली. आणि उत्साहाने फोटोत दिसणाऱ्या माणसांबददल सांगू लागली.

राधी म्हणाली, “ही मती. तिला आमच्या दादाला दिलीय. ती पन किशोर गुरुजीच्या शालंत जायची.” अमित म्हणाला, “हा भागोजीबाबा. तो भटकर आहे. भट्टी रचतोय.” मग पुढच्या दहा पंधरा मिनिटात फोटोत दिसणाऱ्या भट्टीवरच्या माणसांच्या अशा अनेक कहाण्या मला कळल्या. मग मी विचारले, “मी हे सगळं लिहितो. तुम्ही वाचाल का?”  तशी उत्साहाने सगळे हो म्हणाले. मग मी एकेक फोटो वर्ड मध्ये घेतला आणि त्या बद्दल मुले जे सांगतील ते लिहू लागलो.

राधीचे आई बाबा…
हे राजा आणि ह्या वंदना. ते आमच्या राधीचे आई बाबा आहेत. दोघे सकाळी चार वाजता उठले.त्यांनी खड्ड्यावरून चिखल आणून ढिकली मारली. मग त्यांनी साच्याला पाणी लावून त्यात चिखल आपटला. त्याला वरून पाणी लावले. पिठा टाकला. साचा उचलून विटा पाडू लागले. विटांची रांग तयार झाली. रांगेवर पिठा टाकला. नंतर पत्र्याकं विटा थापल्या. आता दहा वाजता त्यांचे चिखलकाम संपेल. मग ते साफसफाई करतील आणि जेवायला भोंग्यात जातील.

मी टाईप करू लागल्यावर अमित, राहुल, चंद्रिका आणि राधी यांनी वाचायला सुरुवात केली. अमित, चंद्रिका आणि राधी बऱ्यापैकी वाचत आहेत. राहुल अजून एकेक शब्द वाचतो आहे. किशोरने मला सांगितले की गेल्या वर्षी त्याने शिकवायला सुरुवात केली तेव्हा मुलांना अक्षर ओळखही नव्हती. वाचण्या लिहिण्याचा त्यांचा उत्साह म्हणजे भरती ओहटीचा खेळ. मनात असेल तर वाचतील नाहीतर ‘आलशी आली’ असे गुरुजीच्या तोंडावर सांगून निघून जातील. पण आजचा त्यांचा वाचनाचा उत्साह पाहून मला नी किशोरला एक बाब नीट समजली. पुस्तकातले धडे वाचायला जरी त्यांना कंटाळा येत असला तरी स्वतःच्या आयुष्यातले काही लिहिलेले मिळाले तर ते वाचण्यात त्यांना नक्की रस वाटतोय.

या अनुभवानंतर आम्ही ठरवले आहे की जमेल तितके त्यांचे आयुष्य कॅमेऱ्यात कैद करायचे आणि त्या फोटोंच्या आधारे केलेले लिखाण त्यांना वाचायला द्यायचे. ज्यांना अजून लिपी परिचयात गोडी वाटत नाहीये त्यांनाही त्यांच्या स्वतःच्या गोष्टी लिहून दाखवायच्या. अशाप्रकारचे लिखाण वाचायला मिळाले तर या मुलांची वाचायला शिकायची गोडी वाढेल असा आमचा होरा आहे.

12 thoughts on “कॅम्पुटर

Add yours

 1. खुप छान. स्थानिक व्यवहारातले शब्द, मुलांचा उत्साह व आपले निरीक्षण प्रभावीपणे मांडले आहे

 2. मुलांच्या भाविश्वापासून सुरुवात करणे भाषा शिकण्यासाठी फारच आवश्यक गोष्ट आहे. बऱ्याचदा हे कसं करायचं ते कळत नाही. या लेखातून ते खूप नीटपणे समोर आले आहे.
  जीवनातील अनुभवावर असे लेखन वाढले, पुस्तत रूपाने किंवा वाचन पाठ म्हणून पुढे आले तर त्याचा सर्वत्रच उपयोग होईल.

 3. एककेंद्री पाठयक्रम राबवण्यापेक्षा हा प्रकार अधिक सरस ठरेल.
  हे इतर परिसरातील मुलांना देखील वाचनाच्या सुरुवातीच्या टप्यासाठी महत्वाचे ठरेल..
  गुरुजी एक सांगू का हे सगळं वाचताना ‘दिल अभि भरा नही’ असं होतंय..
  जरा अधिकच इतर कुठेतरी लिहिता आलं तरी बघा ना plz

 4. खूप सूंदर लेख
  अरुण सर म्हणतात तसं दिल अभी भरा नही हे मात्र खरे.
  वाचन शिकण्याच्या सुरवातीच्या टप्प्यावर विद्यार्थ्याना पूरक वाचनासाठी वाचनपाठ असणे आवश्यक आहे . त्याच्यातील मजकूर मुलांच्या परिसरातील संबंधित असेल तर मुलं खूप आवडीने वाचतात
  पण नेमकं याच टप्प्यावर मुलांना वाचनासाठी काहीही उपलब्ध नाही. काही उपलब्ध असेल तर ते शिक्षक व पालकापर्यंत पोहचलेलं नाही
  मुलांचा वाचन टप्पा शिक्षकांना ठरवता यावा यासाठी शिक्षकांची तयारी करून घेणे आवश्यक आहे
  त्याच्या त्या टप्प्यावरून वर उचलण्यासाठी कोणते साहित्य वापरावे याच ही ज्ञान असणे आवश्यक आहे
  असं साहित्य विद्यार्थ्याना वाचायला मिळाल तर मुलांचा इंटरेस्ट कायम राहायला व वाचनाचा आवाका वाढायला मदत होते
  या बाबतीत quest च खूप छान व मार्गदर्शक काम चालू आहे
  विशेषतः या संबंधित व्हिडीओ खूपच मार्गदर्शक आहेत

 5. निलेशजी, “पोहायला शिकायचं ते प्रत्यक्ष ते पोहूनच तसं वाचायला शिकायचं ते वाचूनच” हे तुमचं वाक्य आता राज्यभर पोहोचवल गेलयं. वाचायला देण्यासाठी काय हवं तर ओळखीचा अनूभवातला मुलांनाआपला वाटेल असा आशय. हे थिअरी म्हणून कळत होतं. पण हाअसा आशय वेगवेगळ्या ठिकाणच्या शिक्षकांनी मिळवायचा कूठून ? या यक्ष प्रश्नाचं किती साधं पण सुंदर तरीही व्यवहार्य असं उत्तर तुम्ही शोधलयं.
  मला वाटतंय मराठीपेक्षा वेगळी भाषा बोलणार्‍या मुलांना मराठी वाचायला शिकवतानाही हे करून पाहता येइल.

  1. अगदी खरे आहे. घरीची भाषा वेगळी असणाऱ्या मुलांसाठी अशा प्रकारचे साहित्य स्थानिक पातळीवर तयार होऊ शकते मात्र त्यासाठी आरंभिक साक्षरता या विषयाची सैद्धांतिक समज असणाऱ्या संवेदनशील शिक्षकाची गरज आहे.

 6. मुलांच्या सुरूवातीच्या काळात त्यांच्या परिचयातलं त्यांच्या भाषेतलं वाचायला मिळालं की त्यांचा वाचनातला उत्साह टिकून राहतो. हे तुम्ही कोर्समध्ये शिकवलेलं सक्षमच्या प्रत्येक तासाला जाणवतं. जे काही वाचणार त्याचा पटकन अर्थ समजला तर मुलांना त्यात रस वाटू लागतो.स्थानिक भाषेतलं असं साहित्य निर्माण करणे हे मोठं आव्हान आहे. शिक्षकांना तशी दृष्टी निर्माण झाली तर ते शक्यही आहे. परवाचा एक अनुभव सांगतो, माझ्या मुलांना राधाचं घर ही सेरीज मी इंग्रजीतली वाचून दाखवली.मग तेच मराठीतलं वाचून दाखवलं.दुसर्या वेळी मात्र आम्ही इंग्रजीतलं ऐकणारच नाही असं त्यांनी मला ठणकावून सांगितलं.
  घरची भाषा शाळेहून भिन्न असणार्या मुलांची काय अवस्था होत असेल ? याची कल्पनाच करवत नाही. वि.जा.भ.ज.च्या मुलांबरोबर काम करताना मी जाणिवपूर्वक त्यांच्या भाषेतली छोटी वाक्ये, सूचनावजा त्यांना दिल्यावर त्यांना खूप अप्रूप वाटतं.त्यांचा स्विकारातला त्यांची भाषा आदराने स्विकारणे हा खूप महत्वाचा भाग आहे.
  हा बलाॕग माझ्यासारख्याला अधिक संवेदनशीलपणे , डोळसपणे काम करायला खूप उपयुक्त ठरत आहे.थँक्स !

 7. अनुभव वाचताना काम करताना फायदा होतोय, वंचित घटक प्रवाहात आणण्यासाठी आपण अगोदर जवळ जायला शिकलं पाहिजे हे कळतंय

 8. पाड्यावरच्या मुलांच्या भाव विश्वातील मांडणी त्यांना कदाचित अधिक जवळची वाटेल.फारच छान

 9. प्रत्येक मूल हे नेहमी त्याच्या परिसराशी खुप निगडित असते ,किंबहुना ते परिसरातूनच शिकत असते. मुलाना वाचनाची शिकण्याची गोडी लागन्यासाठी आवड़ निर्माण होण्यासाठी परिचित मजकूर चित्र असणे गरजेचे आहे हे लक्षात आले ,खुप छान सर

 10. वाचन लेखन शिकविण्याचा हा मार्ग उत्तम आहे.
  इथे सुध्दा विविध वयोगटातील मुलं आहेत. काही मुलं वाचण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहेत. आपण किंवा किशोर सर तिथून गेल्यानंतर जर काही मुलांना वाचावं असं वाटत असेल तर काय करता?

  1. सध्यातरी काही पुस्तके ठेवली आहेत तिथे. एका मुलीच्या घरी पेटी ठेवली आहे.पण म्हणावी अशी पुस्तकांची देवघेव चालू झालेली नाही. पाहू या काय घडते आहे ते.

Leave a Reply

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: