अडथळ्यांची शर्यत

भट्टीवरचा  आमचा वर्ग एका जागी चालत नाही. कधी चिखलाच्या खड्ड्यापाशी, तर कधी विटांच्या हारोलीपाशी, तर कधी मुलांचा खेळ चालू असेल तिथे अशी भटकंती चालू असते. मुलांना त्यात काही अडचण नाही, पण मला मात्र आता जरा स्थैर्य यायला हवे असे वाटू लागले होते. तशी राधीच्या अंगणात बसायला जागा होती. पण तिच्या भोंग्याच्या बाजूला नवी वीट भट्टी रचायला सुरुवात झाली. डोक्यावर मापांची (कच्च्या विटांची) चवड घेऊन बाया आता अंगणातून ये-जा करू लागल्या. या ‘मापा टाकणाऱ्या’ बायांचा आमच्या वर्गाला बराच त्रास होऊ लागला. एक तर एका जागी बसून लक्ष एकाग्र कारायची या मुलांना फारशी सवय नाही. त्यात आता येता जाता बाया काही बाही बोलत गेल्या की मुलांचे लक्ष फारच विचलित होई. त्यामुळेआता वर्ग कुठे घ्यायचा हा नवा प्रश्न समोर येऊन ठाकला. 

दुसरी अडचण म्हणजे मुले बालघे राहण्याची. किशोरने मला परवा सांगितले की दुसरीतली मनाली आता शाळेत यायची बंद झाली. कारण तिला भाऊ झाला आणि ती बालघी राहू लागली. भट्टीवरल्या प्रतिकूल परिस्थितीत साधारण आठ दहा वर्षांच्या मुलांवर त्यांच्या लहान भावंडाना सांभाळायची जबाबदारी पडते. अशा लहान मुलांना सांभाळण्यासाठी घरी राहणाऱ्या मुलांना बालघे म्हटले जाते. भट्टीवर येऊन काम करणाऱ्या कुटुंबाना अनेक कामांत अशी मुलांची मदत घेतल्याशिवाय जगणेच शक्य होत नाही. पाणी भरणे, कपडे धुणे, कधीमधी रांधणे यासारखी कामे मुले सहजच करत असतात. शिवाय भट्टीवर पिठा चाळणे, हारोली रचणे असल्या कामांतही मुलांना मदत करावी लागते. पण बालघे राहणे मात्र त्यांना दिवसभरासाठी बांधून टाकते. स्वतःच्या बालपणाकडे दुर्लक्ष करून त्यांना आपल्या पालकांच्याच संसाराची जबाबदारी ओढावी लागते. तशी  किशोरच्या शाळेने या मुलांना आपल्या लहान भावंडांसह शाळेत येऊन बसायची परवानगी दिली आहे. जरा हिंडती फिरती झालेली मुले कडेवर घेऊन काही जण उत्साहाने शाळेत येतात. पण हा उत्साह सगळ्यांनाच नसतो. अशा परिस्थितीत त्यांचे शिक्षण न थांबले तरच नवल. 

भट्टीवरच्या आमच्या वर्गात अशी अनेक बालघी राहणारी मुले त्यांच्या लहान भावंडाना कडेवर घेऊन येतात.परवा सात आठ वर्षांचा अविनाश ऐकलेल्या गोष्टीचे  चित्र काढत बसला होता. त्याची आई डोक्यावर मापांची चळत आणि हातात एक दांडका घेऊन अचानक आली. तिने तारस्वरात किंचाळत त्याच्या पाठीवर दांडक्याने एक रट्टा हाणला. काय घडते आहे हे कळायच्या आत अविनाश त्याच्या भोंग्याकडे पळाला. अविनाशची लहान बहीण दुर्गा भोंग्यातल्या झोळीत रडत होती. तिला सांभाळायची जबाबदारी अविनाशची. ती रडते आहे आणि हा इथे खुशाल चित्र काढत बसलाय यासाठी त्याला हा रट्टा मिळाला होता. मला सगळे समजून मी काहीतरी बोलायच्या आत अविनाशची आई निघूनही गेली होती.

तसेही मी काय सांगणार होतो तिला? फार तर मारू नका वगैरे उपदेश केला असता, पण त्या परिस्थितीत असले काही अविनाशच्या आईने किती ऐकले असते कोण जाणे. मी एक उसासा टाकून परत शिकवायला सुरुवात केली. तेवढ्यात अविनाश दुर्गाला कडेवर घेऊन आला आणि तिला मांडीवर खेळवत परत चित्र काढायचा प्रयत्न करू लागला.

भट्टीवरल्या वर्गाचा नवा भोंगा

आता या बालघ्यांसाठी काहीतरी केल्याशिवाय पुढची मजल गाठणे कठीण आहे यावर किशोर आणि माझे एकमत झाले. मुलांचे बालघे राहणे आणि त्यांची शाळा तुटणे ही तशी फार जुनी समस्या आहे. शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांनी यावर एक नामी उपाय काढला होता. त्या आदिवासी मुलांसाठी पाळणाघर, बालवाडी व प्राथमिक शाळेचे काही वर्ग एकत्र चालवत. या विकासवाडीत मग सगळ्याच मुलांची सोय होई. मुलांच्या पालकांनाही बिनघोर कामाला जाता येई. बालघ्यांच्या समस्येवर आम्ही मग हाच काळाच्या कसोटीवर उतरलेला उपाय करायचे ठरवले. निदान भट्टीवरचा वर्ग चालू असेपर्यंत तरी या लहान मुलांचे पाळणाघर चालवावे असे ठरवले. गावतल्याच अंकिता नावाच्या मुलीला किशोरने या कामासाठी विचारले आणि ती तयारही झाली.

पण पाळणाघर चालवायचे कोठे? त्यासाठी स्वतंत्र जागा हवी. किशोरने मग पालकांना विचारले की आम्हाला बसायला एक भोंगा बांधून द्याल का? खर्चीच्या दिवशी नायतर सणाच्या दिवशी भोंगा बांधू या असा प्रस्ताव पुढे आला.  पुढच्या खर्चीला भोंगा बांधायचे ठरले. खर्चीच्या दिवशी उम्याचा बाबा ट्रॅक्टर घेऊन रानातून कसाड गवत आणि काठ्या आणायला गेला खरा, पण त्याच्या मदतीला कोणीच गेले नाही. थोडे फार कसाड गवत घेऊन तो परत आला. किशोरने या बाबत पालकांकडे चौकशी केली. तर त्यांचे म्हणणे नाही जमले आम्हाला जायला. आता काय करायचे या बाबत चर्चा सुरू असताना गुऱ्याचा बाबा म्हणाला की, रस्त्याच्या बाजूला माझा एक भोंगा आहे तो घ्या तुम्ही वापरायला – मी तो फारसा वापरत नाही. पडत्या फळाची आज्ञा घेऊन किशोरने तो भोंगा दुरुस्त करायला घेतला.

या कामी मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. त्यांनी भोंग्यावर कसाड गवत टाकले. जमीन माती टाकून चोपली, बाहेर बसायचे अंगण शेणाने सारवून तयार केले. किशोरने जुन्या साड्या आणून दिल्या होत्या त्याचे अंगणाला कुंपण घातले. आणि आमच्या वर्गाची नवी जागा तयार होऊ लागली. या भोंग्याच्या आत अगदी लहान बाळांसाठी झोळी बांधली. एका ट्रंकेत बालवाडीच्या मुलांना खेळता येतील अशी साधने आणून ठेवली. भोंग्याच्या आत आरसा, कंगवा, तेल, पावडर, बाहेर हात पाय धुवायला पाण्याची बादली अशा सगळ्या व्यवस्था लागल्या. भोंग्यांच्या बाहेर एक दोरी लावली आणि त्यावर वाचनालय सुरू झाले. भट्टीवरील मुले आता डोक्यावर तेल थापून तोंडाला पावडर फासून खाऱ्या शेंगदाण्यासारखी दिसू लागली.

तेल ,पावडर आमच्यासाठी
तान्ह्यांची सोय झोळीत …

या पाळणाघरामुळे आमच्या भट्टीवरल्या वर्गाला  बरेच रूप आले. लहान मुले अंकितासोबत खेळू लागली. तान्ह्यांची भोंग्यातल्या झोळीत सोय झाली. आणि मोठी आमच्यासोबत भोंग्याच्या अंगणात बसून शिकायला मोकळी झाली. सारे काही स्थिरावते आहे असे वाटत असतानाच परवा एक गंमत झाली. भट्टीवरच्या मोकाट कुत्र्यांनी आमच्या वर्गाच्या अंगणाला लावलेले साड्यांचे कुंपण फाडून टाकले.  त्या फाटलेल्या साड्यांच्या दोऱ्या करून मुलांनी मग झोपाळे बांधले. जरा स्वच्छ राहणारे अंगण पुन्हा भट्टीवरच्या कचऱ्याने भरले. आता पुनश्च हरी ओम् ! ताराबाई आणि अनुताई यांनी अनेक दशकांपूर्वी केलेले काम अजूनही कालबाह्य होत नाही याचे मला नवलही वाटते आहे आणि वाईटही.

दोरीवरचे वाचनालय

10 thoughts on “अडथळ्यांची शर्यत

Add yours

  1. आधी जाणिली अडचण
    मग साधिले निराकरण
    ध्येयव्रत कारण
    बालशिक्षण ।।

    Like

  2. नमस्कार
    आज अडथळ्यांची शर्यत हा लेख वाचताना केंव्हा या वीटभट्टीवर निघून गेलो ते कळलेच नाही लेख वाचून झाल्यावर कळले की आपण लेख वाचत आहोत आणि मग विचार केला की महाराष्ट्र मध्ये अनेक कार्यक्रम आले 100% मुल कसे शिकू शकेल?
    आणि या 100% मध्ये ही मुले आहेत का कारण या लेखांमध्ये जी सत्य परिस्थिती मांडली गेली जो अनुभव आपण अनुभवत आहात ज्या अडचणींना सामोरे जातात त्या अडचणींचा विचार केला तर असे वाटत नाही की महाराष्ट्रातील शंभर टक्के मुले कधी शिकवू शकतील? बालघे हा शब्दप्रयोग या ठिकाणी आला आणि एक विचार केला तर माणसाच्या गरजांची क्रमवारी जर लावली तर प्रथम क्रमांकावर पोटासाठी उपजीविका चालवणे हाच क्रम हे कारण माझे पोट भरले नाही तर त्या शिक्षणाचा उपयोग काय होईल म्हणून त्या पालकांसाठी प्रथम गरज म्हणून त्यांचे काम आणि कामात जर लहान मुले अडसर ठरत असतील तर त्यांना सांभाळण्यासाठी कोणीतरी लागते म्हणून मोठी भावंडे परंतु ही समस्या केवळ वीटभट्टीवर किंवा अशा ठिकाणच्या मुलांचीच नाही तर अनेक ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांना सुद्धा काही प्रमाणात या समस्येला तोंड द्यावे लागते आणि आपण उल्लेखल्याप्रमाणे ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांची पद्धती पाळणाघर, लहान मुलांसाठी ची व्यवस्था आजही किती गरजेचे आहे हे आपण काम करत असताना लक्षात येत आहे म्हणजेच काळ कितीही बदलला आणि शिक्षण व्यवस्थेने कोणतीही उंची गाठली तरीसुद्धा शिक्षणापासून वंचित असणाऱ्या घटक हा कुठे तरी आजही वंचितच आहे हे या लेखातून लक्षात येत आहे आणि आजही अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक यांच्या विचारांची गरज आणि त्याच्या पद्धतीची गरज या शिक्षण व्यवस्थेला आहे हे लक्षात आले
    आपली अडथळ्यांची शर्यत ही ही खरोखरच खूप अडथळ्यांची आहे हे लक्षात आले परंतु यातून एक गोष्ट मात्र निश्चित लक्षात येईल की महाराष्ट्रातील 100% मुले जर प्रगत करायचे असतील नव्हे शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे असेल तर सरकारलाच नव्हे तर संपूर्ण शिक्षण व्यवस्था व शिक्षण तज्ञांना या बाबींचा विचार करावाच लागेल तरच आम्ही आमच्या देशाने आमच्या राज्याने जे ध्येय समोर ठेवले आहे ते पूर्णत्वास जाईल आणि आपल्या या प्रवासात या कार्यातून आजच्या शिक्षण पद्धतीला एक दिशा मिळेल धन्यवाद

    Like

  3. मुलांना शाळेत येऊन शिकणे किती अवघड जाते,त्यामानाने आपण किती सुखवस्तू आहोत,याची जाणीव होण्यासाठी मी हा लेख घरात वाचून दाखविला.आपले लेख सुखवस्तू कुटुंबाला ही वेगळ्या अर्थने उपयुक्त आहेत,धन्यवाद

    Like

  4. आपल्याला नवीन भोंगा दिलाय यातच आपल्याला त्यांनी स्वीकारलं आहे हे स्पष्ट आहे. या कामात सतत काहीं ना काही अडथळे येत आहेत आणि येतच राहणार पण यावर मात करणार नाहीत ते निलेश सर कसले.
    एकाच कामातून शैक्षणिक, मानस शास्त्रीय आणि सामाजिक संशोधन दररोज चाललंय असं वाटतं. मी भोंग्याच्या आतली अंकिता ची अंगणवाडी लक्ष देऊन पहिली त्यातल्या साहित्याबरोबर मुलांना खेळताना पाहिलंय कदाचित त्यामुळे या येणाऱ्या पिढीला शाळेत जावंसं वाटेल असं वाटतंय पण त्यांना देखील किशोर सारखे गुरुजी मिळतील यात थोडीशी शंका वाटतेय.
    आपलं ह्या समस्यांवर उपाय करण्याचं तंत्र आम्हाला मात्र खूप काही शिकवून जातंय हे नक्की…
    घरी येऊन ह्या सगळ्यांचा विचार करून आपण खूप डिस्टरब होता ह्या सगळ्यांचा हे मी पाहिलंय पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच जोशान नव्या प्लॅन सह भट्टीवर जाताना देखील मी तुम्हाला पाहिलंय..
    आपण या कामाचं विस्तृत स्वरूपात लेखन करावं हा माझा बालहट्ट आजही कायम आहे.

    Like

  5. वास्तववादि सत्य आहे .माझ ही बालपण खेळण्या बगडण्यात न जाता विट भट्टिवर काम करण्यात गेल पण मि शिक्षण नाही साेडल

    Like

  6. आमच्या शाळांमध्येही ही अडचण असते.. माझी शाळा मुलींची आहे . त्यांनाही लहान भावंडांना सांभाळणे. त्यांची आजारपणे काढणे.. घरातली कामे ही करावी लागतात.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: