शाळा तयार आहेत ?

आज भट्टीवर गेले असताना किशोरला मतीच्या भोंग्यातून विव्हळण्याचा आवाज आला. त्याने जाऊन पाहिले तर मतीचा नवरा तिला बदडत होता. किशोर आलेला पाहून तो थांबला. भांडणाचे कारण काय याची विचारपूस केली तर पाटलीण बाईने मतीला घरी कामाला बोलावले होते आणि नवऱ्याचे म्हणणे होते तू जाऊ नकोस. मती दोन वर्षांपूर्वी किशोरच्या शाळेत यायची. किशोरने तिला वाचते लिहिते करायचे खूप प्रयत्न केले. पण मतीला काही त्यात गोडी वाटे ना.

तशी मती फटकळ. तिला काही समजावून सांगायचे म्हणजे कठीण. तिच्या मनाविरुद्ध काही झाले तर लगेच रुसून बसणार आणि पुढचे काही दिवस शाळेचे तोंड बघणार नाही. काही काळाने तिने हळू हळू शाळेत येणे थांबवले. किशोर तिला शाळेत आणायला भट्टीवर जायचा पण ती ऐकायची नाही. आपण शाळेत इतर मुलांच्या तुलनेत फारच मागे पडलोय हे मतीला उमगले होते. त्या मुळे भट्टीवरचे बारीसारीक काम करून चार पैसे मिळवण्यात तिला जास्त रस वाटे. गेल्या साली तिचे लग्न झाले. शाळकरी मतीची मतीवहिनी झाली. मागचे दोर कापले गेले. आता याच वाटेवर पुढे जाण्यावाचून गत्यंतर नाही.

मतीची ही कहाणी भट्टीवरल्या इतर कोणत्याही मुलीची कहाणी होऊ शकते. शाळांत येऊनही न टिकणे याला मतीसारख्या मुलींच्या घरची परिस्थिती जवाबदार आहेच पण याचे दुसरे एक कारण शाळेतही आहे. शिक्षण हक्क कायद्यानंतर वीटभट्ट्यांवर चालवल्या जाणाऱ्या भोंगाशाळांसारख्या अनौपचारिक शिक्षणाच्या व्यवस्था बंद झाल्या आहेत. ते एक प्रकारे योग्यच आहे. कारण भट्टीसारख्या अत्यंत अस्थिर वातावरणात, अल्पशिक्षित, अप्रशिक्षित शिक्षकाकडून शिकण्याला प्रचंड मर्यादा येतात. तसेच एकदा शिक्षण हा मूलभूत हक्क म्हणून मान्य केल्यावर प्रत्येक मूल शाळेत असणे हे अनिवार्य आहे. पण प्रश्न असा आहे की आपल्या शाळा प्रत्येक मुलाला सामावून घ्यायला तयार आहेत का?

शाळेत आल्यावर आपल्याला काही येत नाही, काही समजत नाही हीच भावना निर्माण होणार असेल तर मुलांना शाळेबद्दल गोडी का वाटावी? मतीसारख्या मुलांना अपयशच येईल अशी शाळेची रचना आपण करून ठेवली आहे. शाळेची भाषा, तिथल्या पुस्तकांचा आशय, त्यातली चित्रे,  तिथले वातावरण, तिथले प्रगती मापण्याचे निकष, सारे काही मतीसारख्या मुलींना परके वाटते. प्रयत्न करूनही आपल्याला यातले काही जमत नाही ही भावना मनात घट्ट रुजते आणि मग या मुलांचे मागे पडणे सुरू होते.

या मुलांच्या गरजा लक्षात घेऊन शिक्षणाचे नियोजन करायचे म्हटले तर शाळेतला सारा शिक्षणव्यवहार लवचिक करायला लागणार. प्रसंगी शाळेची क्रमिक पुस्तके बाजूला टाकून मुलांचे जगणे थेट शाळेत आणावे लागणार, त्यांची प्रगती मापण्याचे निकषही डोळसपणे आणि स्थानिक पातळीवर ठरवावे लागणार. आणि महत्त्वाचे म्हणजे हे सारे ज्याने घडवायचे त्या शिक्षकाला सबल करावे लागणार. त्याच्यावर विश्वास ठेवायला लागणार.

किशोरसारख्या शिक्षकांच्या मते ही मुले शाळेत आल्यावर रुळायला जवळ जवळ वर्ष जाते. त्यांना व्यवस्थेत रुळायला वेळ लागतो. तो न देता आपण घाईघाईने त्यांच्या कपाळावर ‘यांना काही जमत नाही’ असा शिक्का मारला, तर त्यांनी शाळेत का टिकावे? असा शिक्का मारण्याचे मोठेच काम परीक्षा करतात. परीक्षेत नापास होणे हे एकप्रकारे या मुलांना शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर ढकलण्याचे साधन बनते. आणि शाळेतून बाहेर पडल्यावर मजुरी, लग्न आणि लहान वयात मुले होणे या चक्रात अडकण्याशिवाय पर्याय नसतो. शाळेमध्ये राहून मतीसारखी मुलगी कदाचित इतर मुलांपेक्षा थोडी कमी प्रगती करेल, पण शाळेमुळे पुढच्या दुष्टचक्रातून तिची सुटका होण्याची संभावना वाढते, हे काही कमी महत्त्वाचे नाही. नापास करू पाहणाऱ्या परीक्षा टाळल्याशिवाय, केवळ प्रमाणित चाचण्यांतील आकडेवारीवरून यशापयश जोखण्याचा मोह आवरल्याशिवाय आपल्या शाळा मतीसारख्या मुलांना कशा समावून घेतील?

11 thoughts on “शाळा तयार आहेत ?

Add yours

 1. होय हे वास्तव नाकारता येणार नाही की आपल्या शाळा तेथील संसाधने मती सारख्याना सामावून घेणारी नाहीत. यासाठी शाळांना त्यांचा पाठयक्रम स्थानिक पातळीवर ठरवण्याचे स्वतंत्र द्यायला हवे पण आपण म्हणता तसं ही बाब सुद्धा महत्वाची आहे की त्यासाठीचा शिक्षक खूप ‘सक्षम’ व्हायला लागेल. त्यासाठी वेळ ही भयंकर लागेल म्हणून आपण जे काम करताय ते जर व्यवस्थित पणे शिक्षकांपर्यंत पोचले तर काही शिक्षकांमार्फत तरी काही मती पुढच्या दृष्टचक्रपासून वाचतील…

 2. खर आहे सर
  या समाजातच नाही तर सगळीकडे थोड्याफार फरकाने असेच आहे . शिक्षण थांबले की रोजगार किंवा लग्न यात अडकवले जातेच …
  आपल्याकडे सर्व कायदे आहेत मात्र असे प्रश्न कायद्याने सुटणारे नसतात . …….

 3. खूप छान भावणारे लेखन .
  मुळात तिला काही तरी येते हे ही खूप महत्त्वाचं आहे,हे तिला स्वतः ला समजणे, शिक्षकांना समजणे, आणि हे वर्गातील इतर मुलांनाही समजणे यातून आत्मविविश्वस वाढणे,………. काम करण्याची गरज आहे

 4. वरील लेख वाचताना आम्ही आमच्या शाळेत, केंद्रावर मुलांचा आत्म सन्मान, आत्म विश्वास वाढवण्यासाठी करत असलेल्या उपक्रमातील अनेक प्रश्न समोर आले.
  सक्षम शिक्षक ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. तरच शिक्षणाची learning outcomes ( एका विशिष्ट वेळी- १०वी किंवा १२ वी) सार्वत्रिक राहून, आपण शिक्षण प्रक्रियाचे स्थानिकिकरण करू शकू.
  याची सुरुवात कोठून करू शकू?:-
  वर सरांनी उल्लेख केलेल्या सर्वच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यात प्राधान्य मूल्यमापन याला दिल्याचा उपयोग होईल वाटतं. या मध्ये मुल शिकलं/ विकसित झालं असं कधी म्हणायचं याचे निकष ठरवता येणे फार महत्त्वाचे आहे.
  कारण इतर बदल केले तरी पालक, समाज व्यवस्था व यात वाढलेल्या मुलांना इतरांच्या तुलनेत मी कुठे हा प्रश्न मोठा व जिव्हाळ्याचा वाटत असतो.( स्पर्धा व तुलना या विषयी आपले मत काय आहे… हा एक वेगळा मुद्दा आहेच)
  आणि किशोर सर व निलेश सरांनी केलेली सुरुवात सर्वात सोयीची. कारण ती स्वतः पासून होऊ शकते… 🙂

 5. yes, it’s a reality. becoming out of school is just not being “dropout”, it is being a “mother” very next year after a marriage.

 6. पहिलीच पिढी ज्या समाजात शिक्षित होते आहे तेथे शिक्षक खुप तयारीचा असायला हवा , कारण या मुलांना शाळेत टिकवून ठेवणे हीच मोठी तारेवरची कसरत असते. शिक्षण ही त्या पुढची पायरी आहे . जरा ईकडे तिकडे झाले की ही मुलं कुठल्याही क्षणाला शाळाबाह्य होऊ शकतात.

  1. तुम्ही बोलत ते बरोबर आहे किशोर सर, पण आपण पालक म्हणूनही शिक्षण केवळ स्पर्धेपुरते मर्यादीत न ठेवता, मुलांच्या शैक्षणिक, मानसिक आणि आता शारीरिक उन्नतीचा विचार व्हावा, एखादी शाळेत मागे राहिलेली ‘मती’ आपल्या घरात किंवा आपल्या आजूबाजूला तर नाही ना, याची काळजी घेऊन तिच्या शारीरिक मानसिक विकासाची जबाबदारी आपण घेतली पाहिजे.

 7. नमस्कार सर!….खूप छान विचार मांडले आहेत आपण! ……ग्रामीण भाग असो, आदिवासी भाग असो किंवा अगदी शहरी भाग असो, शिक्षक हा सक्षम च असायला हवा आणि ही सक्षमीकरणाची प्रक्रिया मला वाटत आजीवन चालणारी प्रक्रिया आहे!
  वरवर पाहता असे वाटते की शहरी भागातील मुलांना खूप सोयी सुविधा मिळतात आणि त्यामुळे त्यांचे शिक्षण होणे हे सोप्पे असते, पण खरे तर वस्तुस्थिती तशी नाही असे मला वाटते. कारण इतक्या सोयी मिळूनही dropouts चं प्रमाण हे खूप मोठे आहे असे दिसून येते. आणि मग त्याचे परिणाम समाजात आपल्याला दिसून येतात….. मग अशा वेळी ही शिक्षक आणि शाळा सक्षम बनवता आल्या तर?

 8. जर मती शाळेत असती तर कदाचित इतक्या लहान वयात तिला संसाराचा रहाटगाडा खेचण्याची गरज लागली नसती, मान्य आहे तुला शिक्षणात ती इतर मुलांच्या मागे राहिली असती, पण संसार सांभाळण्यासाठी ती शारीरिक मानसिक दृष्टीने तरी सक्षम झाली असती, किशोर तू आणि निमकर सरांनी या मुलांच्या सद्यस्थितीची जाणीव करून दिली. पण या न दिसणाऱ्या दुसऱ्या अंगाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद

 9. समज निर्माण करणारे शिक्षण अशा मुलांसाठी हवे आहे,साक्षर होणे महत्वाचे आहेच,पण समज असलेला समाज ही बाब मला त्यापेक्षा मोठी वाटते.

 10. मतीसारखी बरीच मुलं आहेत. वेगवेगळ्या वातारणात असणारी त्यांना आधी समजून घेणं सहत्वाचं.
  ही मुलं शाळेत असली नसली तरी १० ते १२ वर्षाचे वय झाले की त्यांने पैसे मिळवले पाहिजे, आणि याच वयात त्यांनी लग्न केले तरी फार काही बिघडत नाही असा समज आहे लहान वयात पैसे मिळवणे (बालमजूर) आणि लग्न करणे (बालविवाह) या दोन गोष्टीतून मुक्तता व्हायला अजून वेळ लागेलच बालविवाह, बालमजूरी या दोन्ही गोष्टीसाठी लोगजागृती, मुलांचे समूपदेशन शाळा शाळांमधून रोज व्हायाला हवे.
  आपल्याला यातलं काही जमत नाही असं म्हणणारी, किंवा काहीच न बोलणारी मुलं कितीतरी आहेत, जी रोज शाळेत येतात. शाळेत आल्यामुळे काही प्रश्नांतून सुटका होण्याची शक्यता आहे पण फार कमी… अशा मुलांसाठी आणि पालकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करायला हवे.
  आहे त्या व्यवस्थेत रुळणे, रुळल्यावर तिथे टिकणे, या दोन्ही गोष्टी फार अवघड आहेत पण….

Leave a Reply

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: